अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर काकासाहेब चितळे वडील बाबासाहेब चितळे व भावंडांसोबत चितळे उद्योग समूहामध्ये कार्यरत राहिले.
सुप्रसिद्ध चितळे डेअरी ही दुग्धोत्पादक संस्था सांगलीतील पलूस तालुक्यातील भिलवडी गावात १९३९ मध्ये सुरू झाली. भास्कर चितळे यांनी हा व्यवसाय सुरू केला होता. त्यांच्यासोबतीला दुसऱ्या पिढीतीले भाऊसाहेब चितळे यांनी हा व्यवसाय आणखी वृद्धींगत केला. भाऊसाहेब चितळे यांनी १९५० मध्ये चितळे बंधू मिठाईवाले या कंपनीची स्थापना केली.
काकासाहेब चितळे यांच्या मार्गदर्शन आणि कार्यपद्धतीमुळे व आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे चितळे उद्योग समूह वाढला. व्यवसाय फक्त डेअरीपुरता मर्यादित न ठेवता दूध, दही, लोणी, तूप, श्रीखंडासोबतच लाडू, मोदक, करंज्या व बर्फी आदी पदार्थ बाजारात आणले. चितळ्यांच्या खमंग बाकरवडीची चव साता समुद्रापारापलीकडे गेली आहे. काकासाहेब चितळे हे सांगलीतील भिलवडी येथील चितळे डेअरीचे कामकाज पाहात होते.
काकासाहेब चितळे जायंटस् वेल्फेअर फाऊंडेशन, मुंबई या संस्थेचे मध्यवर्ती समिती सदस्य, जायंटस् वेल्फेअर फाऊंडेशनचे माजी अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. भिलवडी सार्वजनिक वाचनालयाचे गेल्या २७ वर्षांपासून अध्यक्ष, भिलवडी शिक्षण संस्थेचे विश्वस्त व संचालक, मुंबई माताबाल संगोपन केंद्राचे आश्रयदाते, विवेकानंद नेत्र चिकित्सालय, लायन्स नॅबचे आश्रयदाते अशा विविध संस्थांच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, नेत्रदान, रक्तदान, औद्योगिक चळवळीत त्यांनी मोठे योगदान दिले होते.
काकासाहेब चितळे यांचे ८ फेब्रुवारी २०२० रोजी निधन झाले.
Leave a Reply