ज्येष्ठ साहित्यिक, चित्रपट गीतकार, लेखक आणि कवी बी के मोमीन कवठेकर यांचा जन्म. दि. १ मार्च १९४७ मु. कवठे (येमाई) तालुका शिरुर, जि. पुणे येथे झाला.
पडद्याआड तर कधी पडद्यापुढे आत्मविश्वासाने वावरलेले ज्येष्ठ साहित्यिक बी. के. मोमीन कवठेकर म्हणजेच बशीर कमरुद्दीन मोमीन यांनी आजपर्यंत गद्य आणि पद्य अशा दोन्ही प्रकारात विपुल असे लिखाण केले होते. मोमीन कवठेकरांनी लोककलावंतावर लिहिलेले पुस्तक संदर्भ म्हणून अभ्यासकांकडून वापरले जात असे. बशीर कमरोद्दिन मोमीन (कवठेकर) यांचे नववीपर्यंतचे शिक्षण झाले होते. त्यांना शालेय जीवनातच शाहिरी आणि काव्य लेखनाचा छंद असल्याने पुढे त्यांनी लावण्या, कलगीतुरा, वगनाट्य, पोवाडे, नाट्यछटा व इतर विषयांवरही लेखन केले. तसेच त्यांनी ‘बाईने दावला इंगा’, ‘इस्कानं घेतला बळी’, ‘तांबड फुटलं रक्ताचं’, ‘भंगले स्वप्न माझे’, ‘भक्त कबीर’ व ‘सुशीला, मला क्षमा कर’ अशी सहा वगनाट्ये लिहिली व ती वेगवेगळ्या लोकनाट्य मंडळांनी सादर केली.
वेडात मराठे दौडले सात, लंका कुणी जाळली या ऐतिहासिक नाटकांचे त्यांनी लेखन केले आहे. त्यांना साहित्य लेखनाचे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांनी गीत लेखन केले आहे. त्यांची ‘सोयर्याला धडा शिकवा’, ‘दारू सुटली चालना भेटली’, ‘मनाला आळा, एडस टाळा’, ‘दारूचा झटका संसाराला फटका’, ‘हुंड्यापाई घटलं सारं’, ‘बुवाबाजी ऐका माजी’ ही लोकनाट्यं आकाशवाणीवर प्रसारित झाली आहेत. दारूबंदी, गुटखा, हुंडाबंदी इत्यादी शासनाच्या योजनांच्या प्रचारात काम केले असल्यामुळे त्यांना व्यसनमुक्ती पुरस्कार प्राप्त झाला.‘नेताजी पालकर’, ‘भ्रमाचा भोपळा’ व ‘भंगले स्वप्न माझे’ या वगनाट्यात त्यांनी भूमिका केल्या आहेत. मोमीन कवठेकर यांनी दत्ता महाडिक पुणेकर, काळू-बाळू लोकनाट्य, रघुवीर खेडकर लोकनाट्य मंडळ, गंगाराम बुवा कवठेकर अशा नामांकित लोकनाट्य मंडळात वेगवेगळ्या भूमिका पार पाडल्या आहेत. तमाशा क्षेत्रातील कलावंतांमध्ये त्यांची साहित्यिक अशी ओळख होती.
बशीर कमरोद्दिन मोमीन कवठेकर यांच्या साहित्यावर पुणे विद्यापीठात पीएच.डी. करण्यात आली असल्यामुळे पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाकडून त्यांना गौरविण्यात आले आहे. नवसाची यमाई भाग 1’, ‘नवसाची यमाई भाग 2’, ‘कलगी तुरा, ‘अष्टविनायक गीते’, ‘सत्वाची अंबाबाई’, ‘वांग्यात गेली गुरं’, ‘रामायण कथा’, ‘कर्हा नदीच्या तीरावर’, ‘येमाईचा दरबार’ हे त्यांचे भक्ती गीत व लोक गीतांचे अल्बम प्रकाशित झाले आहेत. ‘देशभक्त बाबू गेनू’, ‘कृतघ्न’ या आगामी चित्रपटासाठी त्यांनी गीत लेखन केले आहे. असा त्यांचा आजपर्यंत ४००० हून अधिक गीतांचा लेखन प्रपंच आहे.
ते कलावंत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहिले होते. यामार्फत त्यांनी अनेक लोककलावंतांना शासनाचे मानधन मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला. त्यासाठी विविध पातळ्यांवर संघर्ष करावा लागला. बी. के. मोमीन कवठेकर यांना छोटु जुवेकर पुरस्कार मुंबई (१९८०), ग्रामवैभव पुरस्कार (१९८१), राज्य शासनाचा जिल्हा व्यसनमुक्ती प्रचार कार्य पुरस्कार, पद्मश्री विखे पाटील जीवनगौरव पुरस्कार (२०१२), लोकनेते गोपीनाथ मुंडे जीवनगौरव पुरस्कार (२०१८), असे अनेक पुरस्कार मिळाले होते.
मोमीन यांना लोककलेतील त्यांच्या ५० वर्षांच्या योगदानाबद्दल २०१८ मध्ये महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘विठाबाई नारायणगावकर’ हा सर्वोच्च असा ५ लाख रूपयांचा जीवनगौरव पुरस्कार मिळाला होता. बी. के.मोमीन कवठेकर यांचे १२ नोव्हेंबर २०२१ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संक्षिप्त परंतु माहितीपूर्ण असा हा लेख आहे. काही अदयावत माहिती यात जोडली तर लेख परिपूर्ण होईल.
१. ‘भंगले स्वप्न महाराष्ट्रा’ या छत्रपती राजाराम महाराज आणि संताजी-धनाजी यांच्या संघर्षावर आधारित ऐतिहासिक नाटकाचा उल्लेख लेखात जोडावा. २६-जानेवारी-१९७७ ला या नाटकाचा पुण्यातील भरत नाट्य मंदिरात शुभारंभाचा प्रयोग झाला तेंव्हा प्रमुख पाहुणे म्हणून महापौर शिवाजीराव भोसले, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे उपस्थित होते.
२. ‘वि आय पी गाढव’ आणि ‘भाऊंचा धक्का’ या दोन मराठी चित्रपटांसाठी सुद्धा त्यांनी गीतलेखन केले आहे.