ना गपूरचे सुप्रसिद्ध गायक श्री. शरद मुठे माझ्या वडिलांचे मित्र होते. शरद मुठे हे उत्तम कवीदेखील होते आणि लहान मुलांची अनेक गाणी त्यांनी लिहिली होती. लहान मुलांची गाणी असलेले त्यांचे ‘फुगेवाला’ हे पुस्तक आणि इतर पुस्तकेही प्रसिद्ध झालेली होती. मुठेकाकांना लहान मुलांचे शिबिर घेऊन ठाण्यात गाणी शिकविण्याची इच्छा होती. डॉ. बेडेकर विद्यामंदिर या शाळेचे मुख्याध्यापक श्री. अशोक चिटणीस हे माझ्या वडिलांचे एक जवळचे मित्र. त्यांनी पुढाकार घेतला आणि मे महिन्याच्या सुट्टीत शाळेतच हे शिबिर आयोजित केले. या शिबिराच्या उद्घाटन समारंभासाठी मुठेकाकांनी एक अभिनव कल्पना मांडली. ते म्हणाले,
“या लहानग्यांच्या शिबिराच्या उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणेही छोटी मुलेच असतील.” झाले! या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका छापली गेली. या समारंभाचे अध्यक्ष होते अनिरुद्ध जोशी (वय वर्षे सात) आणि प्रमुख पाहुण्या होत्या मुग्धा चिटणीस (वय वर्षे पाच). मुग्धाने पुढे जाऊन कथाकथनकार आणि चित्रपट अभिनेत्री म्हणून खूप नाव मिळविले. बालगीते ही संख्येने फार कमी असतात. त्यामुळे नेहमी अनेक मुले तीच तीच गाणी म्हणताना आपण ऐकतो. मुठेकाकांनी या शिबिरात आम्हाला अनेक नवीन बालगीते शिकवली. ती लोकांसमोर सादर कशी करायची हे देखील शिकवले. अशा किती घटनांमधून आपण कसे घडत जातो, हे त्यावेळी आपल्याला कळत नाही, पण पुढील आयुष्यात त्याचा अगणित फायदा आपल्याला मिळत असतो. या शिबिरात साथीसाठी वाद्ये नव्हती. मुठेकाका एक लाकडी स्टूल समोर घेऊन ताल धरीत असत आणि आम्ही गात असू. कोणत्याही वाद्याच्या साथीशिवाय उत्तम गाणे सादर करता येऊ शकते, हे मुठेकाकांनी आम्हा लहान मुलांच्या मनावर कोरून टाकले. त्यामुळे पुढे कार्यक्रम सादर करताना असे अनेकदा घडते, की हवे असलेले वादक उपलब्ध नसतात. कधी कधी अनेक वाद्ये साथीला घेणे शक्य होत नाही आणि मग गायकावरील दडपण वाढते. मी मात्र अशा प्रसंगी कधीच डगमगत नाही. याचे सारे श्रेय मी मुठेकाकांच्या शिबिराला देतो.
– अनिरुद्ध जोशी
Leave a Reply