खेळत होता बाळ अंगणीं इकडूनी तिकडे
मेघनृत्य ते बघत असतां दृष्टी लागे नभाकडे
उलटी सुलटी कशी पाऊले घनांची पडत होती
लय लागून हास्य चमकले त्याच्या मुखावरती
तोच अचानक गडगडाट झाला एक नभांत
दचकून गेले बाळ तत्क्षणी होऊन भयभीत
धावत जावून घरामध्यें आईला बिलगले
वाचविण्या त्या भीतीपासून पदराखालीं दडले
जरी थांबला गडगडाट भीती कायम होती
आवाजाचे नाद अद्यपि कानीं त्याच्या घुमती
भीतीने नजिक चिकटला आईच्या जवळीं
धडकन ऐकूं आली त्याला पुनरपि त्यावेळीं
गडगड धडधड आवाजाचा धसका घेवूनी मनीं
तोंड लपविले हळूंच जाऊन गादीमध्यें त्यानी
पिच्छा न सोडी आवाज अजूनी बसली ज्याची भिती
श्वास वाढूनी, स्वह्रदयाची धडकन होती ती
तगमग बघूनी बाळाची ती थोपटे मांडीवर आई
निद्रेच्या तो अधीन झाला ऐकून मधूर अंगाई
— डॉ. भगवान केशवराव नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply