यू ट्यूब वर राज्य सभा चॅनेलवरील “विरासत “हा एस डी वर (बर्मनदा ) बनविलेला कार्यक्रम बघत होतो. एकदम एस डी -आर डी ही पिता -पुत्रांची जोडी आठवली. कार्यक्षेत्र एक पण स्पर्धा नाही, कारण दोघांची संगीतावर स्वतंत्र नाममुद्रा ! प्रत्येकाचे गाणे ओळखू येते. नातं रक्ताचं असलं तरी रचना परक्या !
अशीच एक जोडी – बाबुजी आणि श्रीधर फडकेंची ! श्रीधर मान्य करतात की त्यांनी संगीताचे औपचारिक शिक्षण घेतलेले नाही. पण कर्तृत्वात पराकोटीचा गोडवा आणि वडिलांना अभिमान वाटावा असं कार्य ! बाबूजींची शाबासकी मिळवणं सोपं नाही. पण “फिटे अंधाराचे जाळे ” (वडिलांनी मुलाच्या संगीत दिग्दर्शनाखाली आज्ञाधारकपणे गाणे), ” सांज ये गोकुळी ” आणि अशा अनेक निवडक रचना श्रीधरची वेगळी वाट दाखवतात. वडिलांचे छत्र असेल पण ऊन स्वतःचे ! “ऋतू हिरवा ” ही त्यांची स्वतंत्र ओळख !!
पंडित जितेंद्र अभिषेकी आणि पंडित शौनक अभिषेकी ही आणखी बाप -लेकाची जोडी ! शास्त्रीय /नाट्य/अभंग गायन सगळी अंगणं पादाक्रांत केलेली .
वारसा समर्थपणे पुढे नेणारी पण कोठेही पित्याशी स्पर्धा नाही. उलट पित्याच्या कर्तृत्ववान हिमालयापुढे सदैव विनम्रपणे झुकणारी कृतज्ञ मंडळी !
राहुल वसंतरावांचा पुत्र नाही – आहे नातू पण तोही तितकाच बळकट! वसंतरावांची परंपरा (दीनानाथांकडून उगम पावलेली) पेलायला तितकेच ताकतवर स्वरयंत्र हवे.
या सगळ्यांनी गानयज्ञ सुरु ठेवला आणि घराणी पुढे नेली.
फक्त दोन जण तितकेसे यशस्वी झाले नाहीत .
अमितकुमार (किशोर पुत्र) आणि नितीन मुकेश (मुकेश चिरंजीव) ! पण त्यांना निसर्गदत्त मर्यादा आहेत.
” एक उनाड दिवस ” मध्यें अशोक सराफ, फैयाज च्या समोर बसून तिला विनंती करतो आणि सलीलच्या गीताचा ( “हुरहूर असते तीच उरी “) एकटाच मनःपूत आस्वाद घेतो, तसे माझे स्वप्न आहे – पंडित शौनकजी / राहुल देशपांडे/ श्रीधर फडके माझ्यासाठी गातील कां ?
मान्य की ही फारच असंबद्ध आणि कधीच पुरी न होणारी अपेक्षा आहे, पण सध्याच्या “भाकड “दिवसांमध्ये अशा “उनाड” विचारांची काल्पनिक का होईना संगत बरी वाटते.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply