पोटाचे प्रश्न माणसाला अस्वस्थ करतात.शांत झोपू देत नाहीत. प्रत्येक जीवाला जसे जगण्यासाठी अन्न लागते तद्वतच मानवासही ते लागते.समाज पोटाचे प्रश्न सोडविण्यासाठी व्यवस्था निर्माण करतो. त्या व्यवस्थेप्रमाणे कार्यकर्तृत्व करण्याचा माणूस प्रयत्न करतो. कमीअधिक प्रमाणात पोटाचे प्रश्न सुटतातही . तसे भाकरीच्या प्रश्नावर अनेकदा राजकारण होते. चळवळी उभ्या राहतात. समाजकारण होते.क्रांती होते. परिवर्तन होते.’ भाकरी मिळत नसेल तर केक खा’ असे ऐतिहासिक वाक्य प्रसिद्ध आहे. अन्न , वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मुलभूत गरजा पुर्ण करण्यासाठी कष्ट करावे लागतात. या कष्टाचे प्रमाण सर्वांसाठी सारखेच नसते.काहींना कितीही कष्ट केले तरी उपजिवीका भागविणे कठिण जाते तर काहींना कमी कष्टात सहजसाध्य असे अमाप मिळते.यामुळे असमानता निर्माण होते.
शेतकरी वर्ग हा वर्षानुवर्षे याच गर्तेत अडकून पडलेला. निसर्गाच्या लहरीपणावर त्याची मदार असते. जमिनीत बियाणं रूजविण्यापासून सुरू होणारा, पीक आडतीवर नेईपर्यंतचा प्रवास अनाकलनिय असतो.जमिन तयार करणे. महागडी बियाणे खरेदी करणे, रासायनिक खत खरेदी करणे. पिकांना पाणी देणे, निगा राखणे . ते आडतीवर जाते तेव्हा पडलेले भाव . या सर्व व्यवस्थेचे प्रश्न गहन तर आहेत. त्याचबरोबर ते पिढी बरोबर आलेले आहेत . कृषक समाजाच्या व्यथा आजच्या काळात तीव्र बनल्या आहेत. आधुनिकीकरणांमुळे ग्रामजीवन उध्वस्तेकडे वाटचाल तर करत नाही ना ? याचा विचार करण्याची गरज आहे. जमिनीचे झालेले तुकडे .नापिकी होत असल्याने आलेले नैराश्य. त्यातून होणारी आत्महत्या . निर्माण झालेले गुंतागुंतीचे प्रश्न. उध्वस्त झालेले कुटूंब. कष्टाच्या मोबदल्यात न मिळणारी मिळकत . आरोग्य आणि शिक्षणाचे निर्माण झालेले प्रश्न.याचा विचार होणार की नाही? सारं रान पडिक आणि बांध कोरण्याची प्रवृती कधी नष्ट होईल? अंतर्गत मतभेदामुळे उत्पन्न झालेले मनभेद. भावाभावात , गावागावात आणि जावाजावातील वाद कधी संपणार ? जातीभेदातून आणि मातीभेदातून निर्माण झालेले वाद. सुरक्षा व्यवस्थेकडून होणारी पिळवणूक . प्रशासन व्यवस्थेची सापत्न वागणूक . समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन . या बाबी चिंतनीय आहेत. वरिष्ठ नोकरी , मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती. असे काहिसे बदललेले चित्र पहावयास मिळते. सणउत्सवाच्या परंपरा असतील किंवा लग्न विधींसारखे प्रसंग असतील.आत्मप्रौढीतून भरमसाठ होणारा खर्च .यातून बहुजनांचे अहितच साधले जाते.प्रत्येक हुशार, चाणाक्ष घटकांकडून शेतकरी वर्गाची अडवणूक, पिळवणूक आणि छळवणूकच होते. तद्वतच साहित्य , लेखन यांमध्येसुद्धा कृषक समाजाचे दुःख वेदना मांडले जात नाही. वेदनांचे प्रतिबिंब आवश्यक त्या प्रमाणात दिसत नाही. जिथे मांडले जाते. त्याची दखल घेतली जात नाही.शेती आणि शेतजीवन आज अस्थिरतेच्या उंबरठ्यावर आहे. मुलांचे शिक्षण, धान्यादी मालाचे भाव, रोजगार , उत्पन्न यांची सांगड घालणे कठिण आहे.भोंदूबाबा, कैवारी भेटतात ते फक्त मतदान रूपाने. पाच वर्षाच्या पारायणासाठी ! तेही लूप्त – अलूप्त स्थितीत.भावना आणि घोषणा यांच्या भोवती फिरत असलेली सल घेऊन. मग प्रश्न उभा राहतो की सालाबादप्रमाणे हेही वर्ष असेच ! असे वर्षानुवर्षे चालत आलेले रहाटगाडगे , दुःखाची धग, प्रश्नाची सल लेखनात उतरली पाहिजे. त्या लेखनाची दखल घेतली जावी. समाजमन तसे घडावे. शेतकरी शोषणाचा आलेख लेखकांनी मांडावा ते गरजेचेही आहे. ते बोलीतही आले पाहिजे . कृतीतून आचरणात आले पाहिजे. आमच्या एका कवितेतून तो आशय आला आहे.
बाप रगत ओकतो,दुष्काळा पोटात घेतो
कणगीला आभावल्ली,धान्य बरकत्ता मागतो
बाप रगत ओकतो, हुकलेली सालचंदी
कापूनशी कणसांचा, मळा वाटे चोरामंदी
बाप रगत ओकतो, बरडाच्या गराड्यात
म्हशी कळप वळीतो,खाट्या भाकड काळात
बाप रगत ओकतो, जगण्याच्या आशेपोटी
लेकराच्या तोंडावरी, मूठभर मासासाठी
बाप रगत ओकतो, भेगा भूईच्या सांधतो
खरबड्या हातातली, माया गाली फिरवितो
बाप रगत ओकतो, धोतराच्या तडूपाला
उमेदीने जगण्याच्या, नवा आशावाद दिला
बाप रगत ओकतो, काटी शेताला लावतो
मात्रे खळ्याचे स्वतःस, रास जगाला चारतो
जगाच्या पाठीवर शेतकरी असा वर्ग आहे की जो जगाचे हीतच साधतो. पण त्या बदल्यात त्यास अपेक्षित फलश्रुती मिळत नाही . हे दुर्दैव म्हणावे लागेल.जगाचा पोशिंदा माझा बाप खडकावर राबताना आसवं तरळतात . त्या आसवांची किंमत पृथ्वीवरील इतर कोणत्याही तत्वज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे. सतत इतरांचा विचार करणारा शेतकरी बाप खंगलेला, भंगलेला आणि दुष्काळास पोटात सामावून नव्या आशावादी उमेदीने जगणारा आहे.तो जगला तर देश जगेल. तो उभा राहण्यासाठी पाठबळाची गरज आहे.
— विठ्ठल जाधव
शिरूरकासार जि.बीड
मो.9421442995
Leave a Reply