कतरिना कैफ चा सिनेमा पाहात असताना गुंतवणूक क्षेत्राचा विचार करणे ही अरसिकपनाची कमाल मर्यादा असेल . पण ते पाप करायचेच झाले तर कतरिना कैफ आणि सिद्धार्थ मल्होत्राचा अलीकडेच प्रदर्शित झालेला ” बार बार देखो ” हा सिनेमा अनेक संदर्भात गुंतवणूक क्षेत्राची आठवण करून देत राहतो .
सगळ्यात पहिले म्हणजे काही काही गुंतवणूकीच्या संधी या पक्क्या चिरतरूण असतात . अगदी या सिनेमा मधल्या कतरिना सारख्या . तुमच्या आणि त्यांच्या तरुणाईत त्या स्वतः बेभान होत छान नाचतात आणि सॉलिड सुंदर दिसतातच .शिवाय तुम्ही त्या संधीचे नायक असूनही आणि तुम्ही तुमच्या कळत – नकळत Time Machine मधे बसलात तर त्याही तशाच बसल्या आहेत असं वाटत राहाते . आणि तुम्ही कालानुरुप म्हातारे वाटत असताना त्या कतरिना रूपीचिरतरूण गुंतवणूकीच्या संधी मात्र परिपक्व आणि जास्त – जास्त आकर्षक होत जातात . वाढत्या वयानुसार त्यांचा अवखळपणा कदाचित कमी होत असेलही , पण सार्वकालिक निर्भरता मात्र वाढत राहते . अगदी तुमच्या आयुष्याला पुरूनउरेल अशी . एशियन पेंटस , केस्ट्रोल , एचडीफसी , एचडीएफ सी बँक , हिंदुस्तान लिवर , आयटीसी , कोलगेट , लार्सन टूब्रो , स्टेट बँक , रेलीस , हवेलस , टीसीएस , अशा शेअर्स सारखी .
दूसरे म्हणजे , तुम्ही अगदी कतरिनाच्या सहवासात असलातरी या सिनेमामधल्या सारिका सारख्या स्वतःच्या जुन्या वैभवाच्या खुणा जपलेल्या काही गोष्टी , संधी , व्यक्ति , बाबी तुमच्या आयुष्यात असतात . त्या एकाचवेळेस तुमच्यावरमाया ही करत असतात आणि दिल्यावेळी काय करावे हे सांगत असतात . त्याला ” डोळस मायेचा अनुभव ” असे म्हणतात . असा अनुभव मग आई असूनही या सिनेमातल्या सारखा तुम्हांला सांगता होतो कि ” हनीमूनला गेला आहेस तरबायकोबरोबर मजा कर ; आईला फोन करण्यात वेळ घालवू नकोस ” . एकंदरीतच काय तर Things on hand , Deeds at hand always need attention , if not full concentration हे प्रेमात , मधुचंद्रात , वैवाहिकआयुष्यात , व्यावसायिक जीवनात , आणि गुंतवणूकीतही कार्यरत असताना ( आता इथे कामात किंवा काम – मग्न असताना कस म्हणू ! ) महत्वाचे असते .
तिसरे म्हणजे गुंतवणूक काय आणि वैवाहिक आयुष्य काय , ही क्षेत्रे निव्वळ Calculations , Solutions , Formulations यावरच चालत नसतात . Meaningful Attention ही गोष्टही या दोन्ही ठिकाणी अत्यावश्यक असते .
चौथे म्हणजे आयुष्याचे जरी गणित असले आणि गणिताला जरी आयुष्य असले तरी आयुष्य म्हणजे गणित नसते . आयुष्याचे गणित केवळ सुसह्यच नव्हे तर सुखद ही करण्यासाठी हे ग्रुहितक सदैव ध्यानात ठेवावेच लागते . असं ग्रुहितकअस्तिवात नसेलही , पण आचरणात आणावेच लागते . अर्थशास्त्रीय सिध्दांत मांडताना नाही का असली ग्रुहितके असतात . Law of Diminishing Margiinal Utility चे ग्रुहितक काय तर म्हणे सगळेच आंबे एकसारख्याच चवीचे ,रंगाचे , आकाराचे , वासाचे . . . . तुम्हांला एकापाठोपाठ एक मिळाले . . . . एखाद्याची थट्टा करायची म्हणजे किती . . . ? या न्यायाने उद्या ग्रुहितक म्हणून सांगाल कि दीपीका , कतरिना , अनुश्का , प्रियांका एकाचवेळेस प्रेयसी म्हणूनमिळाल्या तर . . . मग लक्षात येते कि हे प्रत्यक्षात होणार नसते म्हणूनच त्याला ग्रुहितक म्हणायचे असते .
म्हणून तो सिध्दांत ही Law of Diminishing Marginal Utility असतो ; Law of Equi – Marginal Utility नाही .
पाचवा मुद्दा म्हणजे या सिनेमात असणारा एक संवाद . त्यात या सिनेमाच्या नायकाला त्याचा वरिष्ठ स्वतः ही गणिताचा प्राध्यापक असूनही सांगतो की कोणत्याही क्षेत्रातील समीकरणात BALANCE हा असलाच पाहिजे . वैयक्तिकआयुष्य आणि व्यावसायिक आयुष्य यांत तर हे संतुलन असलेच पाहिजे . गुंतवणूक क्षेत्र त्याला अपवाद कसे असेल ?
सहावे म्हणजे या सिनेमातील एका द्रुश्यात तो गुरुजी – भटजी – पुरोहित सिनेमाच्या नायकाला एक छान उदाहरण देतो . त्या पुरोहिताच्या हातात चेनवाले घड्याळ असते . ते तो दोन हातात त्या चेनची दोन टोंक असे धरतो आणि सांगतोकी यातले एक टोक हा भूतकाळ आहे . कितीही ईच्छा असली तरी आपल्याला तो जरासुध्धा आता बदलण्याची संधी , शक्यता नसते . या चेनचे दुसरे टोक म्हणजे भविष्य – काळ . पण तो प्रत्यक्षात कसा आहे हे या क्षणाला आपल्यापैकीकोणालाच माहीत नसते . अशावेळी आता हातात असलेले वर्तमानाचे घड्याळ योग्य रित्या उपयोगात आणले पाहिजे . अगदी कितीही नकारार्थी छटा असल्या तरीही ” वापरले पाहिजे ” हाच शब्द – प्रयोग अगदी समर्पक आहे.
अशावेळी विंदा करंदीकर यांची
” इतिहासाचे अवजड ओझे
डोक्यावर घेऊन ना नाचा
करा पदस्थल त्याचे आणिक
त्यावर चढूनी भविष्य वाचा ”
या काव्य – पंक्ति आठवायला लागतात . अगदी त्याचा अर्थ या सन्वादापेक्शा वेगळा असूनही . .
सातवीं गोष्ट म्हणजे असे केले नाही तर या सिनेमात एकदा नायिका नायकाला ” अपने कल भी तो बेमतलब हो सकते हैं ” असं म्हणते . योग्य वेळी योग्य गुंतवणूक केली नाही तर आपलेही भविष्य असेच बे – मतलबी झाल्या – शिवायराहील काय ?
आठवी बाब म्हणजे , या सिनेमात पहिल्यापासून शेवट पर्यंत अनेकदा नायिका नायकाला विचारत राहाते की तुझं माझ्यावर प्रेम आहे ना आणि ते का आहे . अर्थातच तो दरवेळी अगदीच साहजिकच प्रेम आहे असे उत्तर देतो . पण असं प्रेम असण्याचे कारण मात्र हा सिनेमा जस – जसा पुढे जात राहतो , तस – तसे बदलत जाते . ” तू माझी मैत्रिण आहेस ” , ” तू माझी बायको आहेस ” , ” तू आपल्या दोन मुलांची आई आहेस ” असॆ टप्पे हे उत्तर घेत राहते .
आणि मग एका टप्प्यावर तो तीला उत्तर देतो की माझे तुझ्यावर प्रेम आहे कारण ” तुम मेरा बीता हुआ कल हो , तुम मेरा आनेवाला कल हो ; और तुम मेरा यह , अब , इस वक़्त का पल हो ”
हे उत्तर तो नायक त्या नायिकेला या सिनेमात अनेकदा देतो . पण हे उत्तर तो तिला अगदी पहिल्यांदा देतो तेंव्हा ती त्याला मिस्किलपने विचारते की हे उत्तर द्यायला तुला इतका वेळ लागला ?
आपण आणि आपली गुंतवणूक यांत असंच होतं असतं ना . .
नववा मुद्दा म्हणजे या सिनेमात ” ड्राइवर ” कोण आणि ” पेसेंजर् ” कोण असा एक संवाद दोन – तीनदा नायक – नायिकेमधे आहे . आपणही तो प्रश्न आपल्या एकंदरीतच आयुष्याला , आणि आपल्यातल्या गुंतवणूकदाराला सतत विचारत राहिले पाहिजे . कारण प्रवाहात पोहणे , प्रवाहाबरोबर पोहणे आणि प्रवाहपतित होणे या निश्चितच वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि साहजिकच त्यांचा परिणाम ही वेगवेगळा असतोच असतो .
अशावेळी या सिनेमाच्या नायक आणि नायिकान्ची नावं अनुक्रमे ” जय ” आणि ” दिया ” आहेत हेही कीती सूचक वाटू लागते ना !
अजून एक गोष्ट हा सिनेमा पाहात असताना सतत जाणवत राहाते की काळाच्या ओघात माणूस बदलतो . सुधारतो . बिघडतो . पण बदलतो . त्यात सहवासाचाही भाग असेल ! काजोलच्या सहवासात आल्यानंतर अजय देवगनचा , दीपीका पदुकोनच्या सहवासात आल्यावर रणवीरसिंगचा , रनबिर कपूरच्या सहवासाच्या काळात कतरिना कैफ चा अभिनय सुधारला . राजनीति मधे कतरीना बाहुली वाटते ; तीच कतरिना ” बार बार देखो ” हा सिनेमा तारून नेते . त्या न्यायानेगुंतवणूक क्षेत्राच्या सहवासात आपण बदलणार ना , काळाच्या ओघात आपली गुंतवणूक ” केली आहे झालं ” ते ” तारणहार ” असा मुद्दा आहे . अगदी प्रश्न नसला तरी !
आता हा सिनेमा त्याच्या नावाप्रमाणे ” बार बार देखो ” असा आहे की नाही हे ठरवणे आणि या लेखात म्हणाल्या प्रमाणे आपल्या गुंतवणूकीचा असा ” बार बार देखो ” हा विचार करायचा की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्ण .
तुम्ही या प्रश्नाचे उत्तर तुमचे तुम्हांलाच देई पर्यंत कतरिना पडद्यावर दिसत असूनही गुंतवणूकीचा विचार करण्याचे जे अरसिकतेचे पाप माझ्याकडून घडले आहे त्याचे पाप – क्शालन कसे करावे ते बघतो .
” अरसिकेशू कवित्व निवेदनम , सिरसि मा लिख लिख ” असॆ कोणी कधी म्हणायला नको ! !
— चंद्रशेखर टिळक
C – 402 . राज पार्क
मढवि बंगल्या जवळ, राजाजी पथ .
डोम्बिवलि ( पूर्व ) ४२१२०१ .
मोबाईल . . . . ९८२०२९२३७६ .
एमेल . . . tilakc@nsdl.co.in
१६ सप्टेंबर २०१६
Leave a Reply