आमच्या गावात विहीरीला बाव असे म्हणतात. कदाचित बावडी शब्दापासून बाव बोलले जात असावे. मी विहीरीवर जाऊन येतो असं बोलण्यापेक्षा मी बावीवर जाऊन येतो असे बोलले जाते.
आमची बाव नेमकी कधी बांधली ते माहीत नाही पण बाबा सांगतात त्या प्रमाणे सुमारे 55 ते 60 वर्षांपूर्वी आमच्या आजोबांनी बावीच्या तळाशी असलेला कातळ सुरुंग स्फोटांनी उडवून खोली वाढवली आणि पक्कं बांधकाम करवून घेतलं होते. कातळ फोडल्यावर खालून एक मोठा झरा लागला होता. त्या झऱ्यातून येणाऱ्या पाण्याला एवढं प्रेशर होते की मी लहान असताना सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी मे महिन्याच्या अखेरीस सुध्दा जेव्हा पाण्याची पातळी खाली गेलेली असायची तेव्हा त्या झऱ्यातून पाण्याला उकळी फुटली आहे असे वाटावे एवढे पाणी येताना दिसायचे.
वीस वर्षांपूर्वी याच विहरीवर आमच्या भाजीपाल्याच्या मळ्याला पाच एच पी च्या पंपाने पाणी पुरवठा करू शकत होतो. परंतु गावातील एका टँकर माफियाने सुरवातीला काही शेतकऱ्यांच्या विहिरी भाड्याने घेतल्या आणि त्यातील पाणी टँकर द्वारे आमच्या गावा शेजारील एमआयडीसी मधील कंपन्यांना विकायला सुरवात केली. रोजचा लाखो लिटर पाणी उपसा दिवस रात्र होऊ लागल्याने प्रत्येक वर्षी विहरीतील पाणी पातळी खालावत गेली. काही वर्षांनी कंपन्या वाढल्या आणि पाण्याची मागणी सुध्दा वाढली. त्याचप्रमाणे गावातील टँकर माफिया ज्याने नीतिमत्ता सोडून विहरीवर टँकर भरायचे सोडून एका ठिकाणी 400 ते 500 फूट चार ते पाच बोअरवेल मारल्या आणि ते पाणी एका खड्ड्यात जमा करून दोन किलोमीटर अंडर ग्राउंड पाईप लाईन द्वारे अनधिकृतरित्या कंपन्यांना विकायला सुरुवात केली. गावातील लोकांनी व शेतकऱ्यांनी या विरुध्द आवाज उठवला पण टँकर माफिया तोपर्यंत निर्ढावला होता. बापाची जागा वारसा हक्काने पोरांनी घेतली आणि अधिक जोमाने पाण्याची लुटमार करू लागले. शासन आणि सरकारी यंत्रणांनी कारवाई केली तरीसुध्दा गावातील टँकर माफिया जनाची आणि मनाची लाज सोडून पाणी चोरी करतच राहिलेत.
आता लोकप्रतिनिधी आणि गावकरी पाणी अडवा पाणी जिरवा आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग च्याच मागे लागले आहेत. पाणी चोरी करून मोठे झालेल्या माफियांना अडवा आणि त्यांची जिरवा हे कोणालाही जमत नाही.
पाऊस पडल्यावर सगळ्यावर पाणी पडते आणि जेव्हा जानेवारी महिन्यात विहरी सह बोअरवेल चे पाणी संपते पुन्हा मग कुजबुज आणि पाणी माफियाच्या नावाने शिव्याशाप सुरू होऊ लागतात. जिथे जिथे शहरीकरण आणि औद्योगिकीकरण झालंय अशा प्रत्येक गावोगावी हीच शोकांतिका आहे. पाऊस पडेपर्यंत पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरी आता जानेवारीत आटायला लागल्यामुळे भविष्यात पावसाळा संपल्यावर किती महिने झाले हे मोजण्यापेक्षा किती दिवसात विहीर आटते हे बघण्याची नामुष्की न येवो म्हणजे झाले.
आमच्या सगळ्या शेतीच्या मधोमध असणारी आमची बाव आजोबांनी जेव्हा बांधली तेव्हा तिचे पाणी सगळ्या शेतीला देता येईल अशीच जागा निवडली. आमची बाव काही खूप मोठी नाही पण तेवढी लहान देखील नाही. मध्यम आकाराच्या विहरीचा कातळ असलेला भागावर दगडाचे पक्के बांधकाम आणि त्यावर विटांचे बांधकाम. खाली उतरण्यासाठी पायरी म्हणून फक्त एक एक दगड झिगझॅग स्वरूपात अडीच ते तीन फुटांवर वरपासून खालपर्यंत लावले आहेत. मुसळधार पाऊस सतत तीन दिवस पडला की विहीर पूर्णपणे भरून जाते. जमिनीत पाणी मुरले की विहरित असणारे वरचे झरे सुद्धा वाहायला लागतात. स्वच्छ आणि नितळ पाणी भर उन्हाळ्यात देखील थंडगार असते.
माझी आमच्या बावी सोबत आमच्या शेती आणि माती सारखीच लहानपणापासूनच नाळ जोडली गेलीय. चुलत भावाच्या खांद्यावर बसून गावातल्या घरातून शेतावर आलो की विहारीवर चक्कर मारल्याशिवाय आम्ही कोणी घरी जात नसत. आपल्या बावीत किती पाणी आहे ते वाकून बघितल्याशिवाय चैन पडत नसे. चुलत भावाने एका दिवशी आम्हा लहान भावंडांना पोहायला शिकवण्यासाठी विहरीत उतरवले तेव्हा डिसेंबर महिना असल्याने विहीर अर्धीच भरलेली होती. भीतीने आम्हा शिकणाऱ्या भावंडांची गाळण उडाली होती. रडा रड आणि आरडाओरडा करून शेवटी पोहायला शिकणे पुढे ढकलण्यात आले. पण पुढच्याच पावसाळ्यात बाबांनी आमच्या कमरेला दोरी बांधली आणि दिले ढकलून. तुडुंब भरलेल्या विहरीमध्ये माझा छोटा भाऊ शिकला पण मी काही तेव्हापण नाही शिकलो. दहावी झालो तरी पोहायला येईना. पुढे अलिबागला बाबांची बदली झाली तेव्हा अकरावीत असताना आमच्या गवर्नमेंट क्वार्टर समोरील हिराकोट तलावात पोहायला शिकलो. माझ्या अलिबागचा जे एस एम ज्युनियर कॉलेजचे मित्रांनी मला प्रोत्साहन दिले त्यामुळे मी पोहायला शिकलो तरी. पण सोळाव्या वर्षी पोहायला शिकल्यावर आणखी आठ नऊ वर्षात आपल्याला जहाजावर काम करायला लागेल याची कल्पना देखील नव्हती. शेवटी शेतावर आमची विहीर असताना मला अलिबागला हीराकोट तलावात का होईना पण पोहता येवू लागले. त्यानंतर आमच्या विहरिमध्ये पावसाळ्यात तुडुंब भरल्यावर कितीतरी वेळा उड्या मारायला मिळाल्या त्या डिग्री होईपर्यंत .
विहीर भरल्यावर त्यात पोहण्याची इच्छा नेहमी होते. काल किती वर्षांनी विहरित पोहलो ते माहीत नाही पण जेवढी धमाल आणि मस्ती काल विहरित पोहताना केली तेवढी यापूर्वी कधीच केली नव्हती. विहरीच्या बाजूला असणाऱ्या झाडावर चढून , फांदीला लटकून ती फांदी मोडे पर्यंत मनसोक्त उड्या मारल्या. लहानपणी भीती वाटायची म्हणून पोहण्याची मजा घेता नाही आली पण आता मोठेपणी लहान होऊन तुडुंब भरलेल्या विहरीत डुंबायची आणि वेड्यावाकड्या उड्या मारण्याची मजा घेता आली.
आमच्या वीहारीच्या नितळ आणि स्वच्छ पाण्यावर केवळ भाजीपाल्याचा मळा फुलवला जातो असे नाही. भाताच्या रोपाला आवण म्हणतात. भात लावणी करताना पावसाची अवकृपा झाली तर राबातले हिरवेगार आवण काढण्यासाठी पाणी लागते ज्यामुळे आवणाची चिकटलेली माती धुवून काढून त्या आवणाचे मुठ बांधून ते दुसरीकडे नेता येतात त्यासाठी पूर्ण शेत पाण्याने भरले जाते. शेतात भाताची लावणी करण्याअगोदर जास्तीत जास्त चिखल पाहिजे असतो त्यामुळे नांगर किंवा पॉवर टिलर फिरवण्यापूर्वी शेतात पाणी भरले जाते. सलग चार पाच दिवस पाऊस पडला नाही तर शेवटी विहरीच्या पाण्यावर चिखल करून लावणी आटपली जाते.
भाताचे पीक काढून झाल्यावर विहारीच्या पाण्यावर मेथी कोथिंबीर वांगी आणि टोमॅटो पालक आणि इतर भाजीपाला पिकवला जातो. नितळ आणि स्वच्छ पाण्यावर पिकवला जाणारा आमचा भाजीपाला कुठे आणि रेल्वे ट्रॅक शेजारी असलेला सांडपाण्यावर पिकवला जाणारा भाजीपाला कुठे. पालक, मुळा, चवळी आणि लाल माठ या भाज्या आम्ही फक्त आमच्या शेतात पिकतात तेव्हाच खातो. मुसळधार पाऊस सतत कोसळल्यामुळे संपूर्ण परिसरात पाणीच पाणी होते विहिरीचे बांधकाम आहे तो कठडा सुध्दा बुडून जाते. पावसाचे गढूळ पाणी सगळीकडे विहारीच्या आजूबाजूला दिसते पण विहरिचा गोलाकार भाग तेवढा नितळ आणि स्वच्छ दिसत असतो.
पावसाळ्यात विहरीच्या परिसरात असलेली झाडे हिरवाईने नटलेली असतात. या सुंदर हिरवाई मध्ये विहीर फार शोभून दिसते. दाट झाडी आणि पालापाचोळा असल्याने विहिरीवर पावसाळ्यात खूप मच्छर असतात. पण मच्छर नसले तर विहरीचे मोहक रुप बघतच रहावेसे वाटते.
आमच्या विहरी मध्ये कासव आणि लहान मोठे मासे सोडले आहेत. थोडा वेळ शांत राहून पाहिले तर कासव हळूच पाण्याबाहेर डोकं काढतांना दिसतं तर मासे सुद्धा पाण्याबहेरील जग बघायला वर आल्यासारखे भासतात.
हल्ली बऱ्याच वर्षात विहरिचे पाणी प्यायल्याचे आठवत नाही. लहानपणी पाण्याच्या बाटल्या माहीत नव्हत्या त्यामुळे घरातून शेतावर गेल्यावर विहरीचे थंडगार आणि मधुर पाणी लामण्याने काढून घेऊन प्यायल्या शिवाय राहवत नसे. लहान असताना प्यायलेल्या पाण्याची गोडी आता पण तशीच आहे पण जसं कित्येक वर्षात विहरीमध्ये पोहायला वेळ मिळाला नाही तसचं पाणी चाखायला पण वेळ मिळाला नाही कदाचित चाखायची इच्छा झाली नाही म्हणूनही वेळ मिळाला नसेल.
समुद्रात सतत पाणी बघून किंवा जहाजावर सुद्धा पाण्याच्या पाईप लाईन आणि पाण्याशी संबंधित रूटीन जॉब करत असल्याने सतत पाणीच पाणी दिसत असते. नोकरी , व्यवसाय आणि करीयरच्या धावपळीत पोहण्याची मज्जा मागील काही वर्षात अनुभवायचे राहून गेले.
पण काल पुन्हा सर्व पोरांबरोबर तुडुंब भरलेल्या विहरीत मनसोक्त उड्या मारल्यावर आता प्रत्येक पावसाळ्यात विकली रूटीन जरी जमलं नाही तरी निदान मंथली रूटीन करण्याचे ठरवले आहे. विहिरी आणि भु गर्भातील पाणीसाठा जपणे आणि वाढवणे ही भविष्यकाळासह वर्तमान काळाची सुद्धा गरज आहे.
धन्य ते माझे वाडवडील ज्यांनी माझ्यासाठी विहिरीचा आणि त्यातील पाण्याचा खजिना तयार करून आणि साठवून ठेवला आहे.
© प्रथम रामदास म्हात्रे
मरीन इंजिनियर
कोन, भिवंडी, ठाणे.
Leave a Reply