आरती प्रभू किती उच्च दर्जाचे कवि होते याची साक्ष अनेक साहित्यिक / कवि देतात. आरती प्रभू कोंकणात एक खाणावळ चालवित. पण त्यांचं मन नेहमीच काव्यनिर्मितीत दंग असे. गल्ल्यावर बसून ते पुढ्यातील कागदावर काव्य लिहिण्यात मग्न असंत. त्यांचं धंद्यात लक्ष नव्हतं हे ओघाने आलंच.
असंच एकदा काव्य लिहित असतांना ते कागद तसाच ठेवून आंतील खोलीत गेले. त्या खाणावळीत एक रसिक नेहमी जेवावयास येत असे. त्याला आरती प्रभूंच्या काव्यप्रतिभेची सार्थ कल्पना होती. त्याने झटकन पुढे होऊन तो कवितेचा कागद हातांत घेतला व चालता झाला.
त्याने तो कवितेचा कागद मुंबईतील त्या काळी सुप्रसिध्द असलेल्या “सत्यकथा” साप्ताहिकाकडे पाठविला. सत्यकथेने त्वरीत ती बावनकशी सोने असलेली कविता “आरती प्रभूं” च्या नांवाने छापून प्रकाशित केली.
काही दिवसांनी आरती प्रभूंकडे “सत्यकथा” साप्ताहिकाचा अंक आला. त्यांत स्वत:ची कविता वाचल्यावर तोपर्यंत स्वानंदासाठी कविता लिहिणाऱ्या आरती प्रभूंच्या तोंडून अवचित खालील पंक्ती बाहेर पडल्या :
” नको नको म्हणतांना,
गंध गेला राना वना ”
” येरे घना येरे घना,
न्हाऊ घाल माझ्या मना ”
त्यानंतर त्यांनी अनेक कविता व गुढकथा लिहिल्या.
पुढे मंगेशकर कुटुंबियांकडे त्यांचं जाणं येणं वाढलं. एकदा हृदयनाथ मंगेशकरांच्या वाचनांत उपरोक्त दोन पंक्ती आल्या. त्यांना त्या फारच सुंदर, गेय व संगीतकाराच्या दृष्टीकोनातून “मीटर” मध्ये वाटल्या. त्यांनी ते काव्य पुर्ण करण्याची विनंती आरती प्रभूंना केली. आरती प्रभू हे “मनस्वी” कवि असल्याने त्यांनी त्याकडे सरळ सरळ दुर्लक्ष केले. तरी सुध्दा हृदयनाथांनी आपला लकडा चालूच ठेवला. अनेक दिवस विनवूनही जेव्हां आरती प्रभू दाद देईनात, तेव्हां त्यांनी “मी ही कविता शांता शेळके यांच्याकडून पुर्ण करून घेऊ का ?” अशी परवानगी आरती प्रभूंकडे मागीतली आणि आरती प्रभूंनी ती दिली सुध्दा !
“प्रभू कुंज” या मंगेशकरांच्या महालक्ष्मी येथील निवासस्थानी शांता शेळके उर्वरित कविता लिहिण्यासाठी आल्या. गँलरीमध्ये उभं राहून पान चघळत आरती प्रभू शांताबाईंचं काव्यलेखन निरखीत होते. हाडाचा कवि व गीतकार यांतील फरक म्हणजेच आरती प्रभू व शांताबाईं. ज्या पध्दतीने आरती प्रभू यांनी “येरे घना येरे घना” लिहिलं होतं त्या शब्दांना न्याय देण्यासाठी शांता शेळके झगडत होत्या. आरती प्रभू निर्विकारपणे ही झटापट पहात होते.
अचानक त्यांच्यातील कविने उचल खाल्ली. तोंडातील पान गँलरीमधून तसंच थुंकून त्यांनी हृदयनाथांना खूण केली व एका अजरामर काव्याचा जन्म झाला.
” फुले माझी अळू माळू,
वारा बघे चुरगळू,
नको नको म्हणतांना,
गंध गेला राना वना”
“टाकूनिया घरदार
नांचणार नांचणार,
नको नको म्हणतांना,
मनमोर भर राना”
” नको नको किती म्हणू
वाजणार दूर वेणू,
बोलावतो सोसाट्याचा
वारा मला रसपाना”
पं हृदयनाथ मंगेशकरांनी या गीतावर अप्रतिम स्वरसाज चढविल्यावर आशाताईंनी या गीताला चार चॉंद लावले.
पुन्हां असा कवि होणे नाही.
कविवर्य आरती प्रभूंना सादर प्रणाम
Leave a Reply