लग्न झालं अन् –
ती सासरी निघाली,
त्याची मात्र खूप –
घालमेल होऊ लागली.
काय होतंय नेमकं –
त्याला काही कळेना,
अस्वस्थपणा जीवाचा –
कमी कुठे होईना.
खूप वर्षांपूर्वीची ती –
आठवण जागी झाली,
तशीच एक बारीक कळ –
आता हृदयातून गेली.
आतली तडफड चेहेऱ्यावर –
उमटत नव्हती काही,
दुराव्याचे कढ मात्र –
फुटत होते तरीही.
तयारी झाली आणि –
जाण्याचा दिवस उजाडला,
सगळ्यांबरोबर तो ही –
निरोप द्यायला निघाला.
काहीबाही विचारत होता –
फार नव्हता बोलता,
त्या क्षणाचा विचार मनात –
करत राहिला होता.
गाडी आली आणि क्षण –
जवळ आला निरोपाचा,
अंधूक दिसू लागला –
त्याला चेहरा तिचा.
भरलेले डोळे आणि –
आठवणी मनात,
लेक लाडकी जात होती
दूर एका क्षणात.
गाडी हालली अन् –
हातही लागले हलायला,
प्रयासाने रोखलेले अश्रू –
आता लागले वाहायला.
धावावसं वाटतं होतं –
गाडीबरोबर त्याला
ओठ थरथरते बघत होते –
मनापासून बोलायला.
बाप होणं मुलीचा –
कठीण खूप असतं,
सासरी पाठवणी करताना –
हे फार जाणवतं.
सोडला फलाट गाडीने –
दूरवर ठिपका दिसू लागला,
त्याचवेळी तिचा बाप –
खूप एकटा झाला.
प्रासादिक म्हणे
–प्रसाद कुळकर्णी
Leave a Reply