नवीन लेखन...

बाबा…तुमच्यासाठी…

‘डॉक्टर, मला माझ्या मुलाकडे परत जायचं नाहीये. इथे तुम्ही जवळ असाल म्हणून या शहरात राहायला आलोय मी’ त्या वयोवृद्ध माणसाच्या मनातली ती खंत दुखावलेल्या अश्रुपूर्ण नजरेतून बाहेर येत होती..
‘अमेरिकेत असतो माझा मुलगा. फार बिझी असतो तो. तिकडे वैद्यकीय उपचारही अतिशय महाग आहेत. त्याला मदत करायची इच्छा असते, पण नाईलाज असेल त्याचा. त्याला आता काय करणार?’
पोटात भयंकर दुखायला लागल्यामुळे तातडीने ते आणि त्यांची पत्नी भारतात परतले होते. आल्या दिवशीच त्यांच्या हर्निया मध्ये आतड्याला पीळ बसल्याचं निदान झालं. लगेच ऑपरेशन झालं आणि बरे होऊन ते घरी ही गेले. पार्किन्सन च्या त्रासासाठी ते माझ्याकडे येत असतात.

मला खरंतर त्यांच्या मुलाचा खूप राग आला होता. तो मला भेटला असता तर मी त्याला चांगलं सुनावलं असतं. त्यांच्या अशा परिस्थितीत जवळपास १८ तासांचा प्रवास करून ते वयोवृद्ध जोडपे भारतात परतले आले. असं असताना त्यांना सोबत लागू शकते हे लक्षात येऊ नये त्याच्या?
त्यावेळी मला माझ्या बाबांची खूप आठवण आली…
बाबा नेहमी सांगायचे, ‘ तुमच्याकडून दुखावलेला माणूस कधीच तुम्हाला विसरणार नाही. तुम्ही माफी मागितल्यानंतर कदाचित तो तुम्हाला माफ करेलही. पण तो माणूस जर तुमच्या कुटुंबातला नसेल, तर तो कायमचा दुरावलाच तुमच्यापासून.. क्वचितच अपमान विसरून एकत्र येतात माणसं.’
पहाटे ४ वाजता विजेच्या शेगडीजवळ बसून बाबांसोबत घेतलेला चहा मला आठवला. पहाटेच्या थंडीत शेगडीच्या त्या केशरी उबेपेक्षाही बाबांसोबत घालवलेल्या त्या क्षणांची ऊब ही मला जास्त मोलाची वाटते. बाबा मला अभ्यासासाठी सकाळी लवकर उठवत.
‘तू नाराज असशील, रागावला असशील, तरीही तेव्हा शांत राहा. तो राग एकदा शांत झाला की मग मनातला विखार निघून जाईल आणि मग चांगल्या शब्दात समोरच्याला समजावून सांग’.

किती अवघड आहे हे प्रत्यक्ष आचरणात आणायला!
मला लवकर राग यायचा, मी लोकांना दुखवायचो, त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायचो पण त्याचीही काही कारणं नक्कीच होती. मी शीघ्रकोपी आहेच. पण खोटेपणाने वागणाऱ्या, दुटप्पीपणाने वागणाऱ्या लोकांचा मला खूप राग येतो. दुसऱ्यांना वाईट वागवणाऱ्या, खोटारड्या आणि माजोर्ड्या लोकांबरोबर कधीच जुळवून घेता येत नाही मला. कधीकधी उलट उत्तर न देण्याने किंवा प्रत्युत्तर देण्याने बरेचदा समोरच्यांचे गैरसमज होतात की एकतर हा माणूस गरीब गायीसारखा तोंड शिवून बसलाय किंवा मग याला फक्त लोकांना धमकावताच येतं.
कसं का होईना इतक्या वर्षांत या आचरट लोकांमुळे मला चांगलंच कळून चुकलंय की तुम्ही लोकांना नाही बदलू शकत. एकदा चांगल्या शब्दात समजावून सांगावं आणि सोडून द्यावं. काही वेळा समझनेवालेको इशारा काफी असतो. पण ज्यांची बदलायची तयारीच नाही आणि ते समजण्याचीही लायकी नाही त्याचं काय करणार? तुम्ही राग राग करून आपली रात्रीची सुखाची झोप घालवण्यात काय अर्थ आहे? तुम्ही ज्यांना हे कधीतरी सुनावलेलं असतं ते तुमचं नुकसान करायची, तुमच्या प्रतिमेवर शिंतोडे उडवायची नुसती वाटच पाहत असतात.

माझे बाबा गेले तेव्हा मी फक्त तीस वर्षांचा होतो. मी त्यांना आजच्या फॅशनप्रमाणे ‘फादर्स डे’ च्या शुभेच्छा कधीच दिल्या नाहीत. पण आयुष्यात इतर कोणापेक्षाही ते माझ्या सगळ्यात जास्त जवळचे होते. ते मला हवं असलेलं सगळं काही देऊ शकले नसतील (हो, ते गिटार मे विसरलो नाही). काही वेळा त्याचं म्हणणं मला पटलं नाही. पण आमच्या नात्यात कधीही अंतर आलं नाही. ना मला त्यांच्या अधिकाराबद्दल किंवा प्रेमाबद्दल कधी शंका घ्यावीशी वाटली आणि ना माझ्या मनातला त्यांच्याविषयीचा आदर, जवळीक कधी कमी झाली. आमच्यातल्या या समंजस नात्याचा ना कधी जाहीर उच्चार करावासा वाटला, ना कधी त्या नात्याला शब्दात व्यक्त करण्याची गरज वाटली.. मुसळधार पाऊस चेहेऱ्यावर झेलावा तसा तो दैवी, शब्दातीत आनंद होता, बापाच्या प्रेमाचा!

आपण आपल्या आई वडिलांपेक्षा वेगळे आहोत ही भावना कधीच नव्हती. आणि त्यामुळे त्यांच्यासाठी आपण काही केलं तर काय मोठा त्याग करतोय असंही कोणाला वाटत नसे. तुम्ही मोठे होताना ते कायम तुमच्या सोबत होते. जेव्हा तुम्हाला खरच त्यांची गरज होती तेव्हा नोकरीधंद्याची कारणं त्यांनी कधीच पुढे केली नाहीत – आणि आता या उतारवयात जेव्हा त्यांना तुमची गरज आहे तेव्हा मात्र ते आणि त्यांचे प्रश्न नकोसे झालेत तुम्हाला! आपल्या उतारवयातील पालकांबद्दल आज बेसुमार पसरलेली असमाधानाचीच भावना दिसते, ते पालक म्हणून कुठे कमी पडले?आणि कुठे त्यांनी मुलांकडून अवास्तव अपेक्षा ठेवल्या याबद्दल अनेक तरुण मंडळी जणू आरोपाचीच भाषा बोलताना दिसतात. खोट्या स्वातंत्र्याच्या संकल्पनेतून, आपल्या मनाविरुद्ध काही घडलं तर ही मुलं आईवडिलांवर आरोपाच्या फैरी झाडताना दिसतात.

आजकाल मदर्स डे, फादर्स डे आणि अजून कसले कसले डेज साजरे होताना दिसतात. अशा विशेष दिवसाचा खरा हेतू कधीच विसरून गेलोय आपण. त्याची जागा आता नकली आणि कृत्रिम भासणाऱ्या शुभेच्छापत्रांनी, फुलांच्या रेडिमेड गुच्छांनी आणि भेटवस्तूंनी घेतली आहे. आईबाबांना खरंच यातलं काहीच नको असतं. आपल्या मुलांना आनंदी असलेलं पहायचं असतं त्यांना. मुलांच्या सहवासात थोडा वेळ घालवता यावा, आईवडिलांच्या तब्बेतीची त्यांनी विचारपूस करावी, त्यांची दुःख चिंता आपल्या मुलांनी ऐकून घ्याव्यात इतकीच काय ती अपेक्षा असते त्यांची. आणि आपण मात्र बिझी आहोत असं गोंडस कारण सांगून त्यांच्यासाठी वेळ काढतच नाही. किती क्रूरपणे वागतो खरच आपण…

आईवडिलांशी असलेलं नातं हे कधी शब्दात बांधण्यासारखं नात असत का?. जर बायको आणि नवरा आपले ‘बेटर हाफ’ असतील तर आई आणि वडील म्हणजे आपली दुप्पटच समजायला हवेत आपल्यासाठी. आपले आईवडील आपली जबाबदारी आहत असं कोणी म्हणणं म्हणजे साधा श्वास घ्यायलाही “काम केलं” म्हणण्यासारखं आहे.

मी त्या पेशंटच्या मुलाशी काही बोललो नाही. त्याच्या आईवडीलांना दुखावून तर तो त्यांच्या मनातून कधीच उतरला होता.. त्याच्या सारख्या दरिद्री माणसाला अजून मोठी शिक्षा काय असणार?
दुर्दैवाने आज माझे आई वडील दोघेही हयात नाहीत. त्यांच्यासाठी खूप काही करण्याची इच्छा होती, ते न करू शकल्याची खंत उरात बाळगून मुलांनी दूर लोटलेल्या अशा प्रत्येक आई वडिलांमध्ये मी माझे आई बाबा शोधतो. माझी त्यांच्या आणखी सेवेची ती अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत राहतो.

काही पालकांसाठी सगळ्यात भयंकर स्वरूपाचा आजार कोणता असेल ठाऊक आहे? मुलांनी त्यांच्या आयुष्यातून आईवडीलांना बेदखल करणं, दुर्लक्ष करणं हा…
मग माझं त्यांच्याशी असलेलं नातं तेव्हा डॉक्टर पेशंट नात्यापलीकडे जातं. माझ्यातला डॉक्टर पुन्हा एकदा आईबाबांचा लाडका शहाणा मुलगा होण्याची धडपड करतो. माझे आई वडील मला आता परत कधीच भेटणार नाहीत…त्यामुळे हीच काय ती माझ्या आईवडीलांना माझी छोटीशी भेट..
मला असंच वाटतं की प्रत्येक दिवसच ‘मदर्स डे’ आणि ‘फादर्स डे’ असतो.

अदिती जोगळेकर हर्डीकर
(डॉ राजस देशपांडे यांच्या “अ गिफ्ट फॉर माय फादर” या लेखाचा अनुवाद ).

सौजन्य : प्राजक्ता सप्रे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..