बाबल्याची गोष्ट – भाग १ (आठवणींची मिसळ – भाग १)
“आठवणींची मिसळ” ह्या माझ्या लेखसंग्रहात सत्तर आठवणीवजा लेख आहेत.
अलिकडे धाकट्या बहिणीकडे कोकणात गेलो असताना, ती मला म्हणाली,”कुणास ठाऊक ! पण मला वाटते की आपल्या आईने बाबल्याला आपल्याकडे ठेऊन घेतलं असतं तर कदाचित् तो असा ठार वेडा झालाही नसता.” “माझ्या मनात हा विचार कधी आला नव्हता” असं म्हणून मी तो विषय तिथेच संपवला.पण बाबल्याचा विचार असा मनातून संपला नाही.बाबल्याचा विषय हा न संपणारा विषय आहे.न सुटणारे कोडे आहे.हे सर्व असं कां झालं? घडलं त्यापेक्षा वेगळं कांही घडणं शक्य होत कां? ठळकपणे दिसणाऱ्या, सर्वाना ठाऊक असणाऱ्या बाबल्यासंबंधीतल्या घटनांशिवाय आणि कांही घडलं होतं कां ?ते काय असू शकेल ? हे प्रश्न बाबल्याच्या संबंधात त्याला ओळखणाऱ्या सगळ्याच संवेदनशील व्यक्तीना पडले असतील.मला तरी ते अजूनही मनात येतात.पण स्वतःच्या धकाधकीच्या जीवनात बाबल्यासारख्या वेड्याचा गंभीरपणे विचार कोण करणार ?तसा तो कुणी केलाही नाही.
▪
माझ्या धाकट्या बहिणीला आमच्या वाडीतल्या वयस्क बायका “बाबल्याची आई” म्हणत.बाबल्याच्या आईनेच आमच्या आईच्या पोटी पुनर्जन्म घेतला असा त्यांचा पक्का विश्वास होता.त्यामुळे त्या असं म्हणतं.त्यांत थोडा पारंपारीक तर्क आणि थोडी चेष्टा असायची.पण माझी बहीण कधी चिडली नाही.आईलाही त्यात कांही गैर वाटले नाही.किंबहुना पुनर्जन्मावर विश्वास ठेवणाऱ्या बहुसंख्य धार्मिक हिंदुमधलीच ती एक असल्यामुळें”हे खरं असेल काय ?”असा विचार तिच्याही मनांत असणारच.कारण बहीण लहान असताना तीही तिला जवळ घेऊन म्हणायची,”काय सांगावं ? असेलही ही बाबल्याची आई.” माझी धाकटी बहीण आता ६० वर्षांची झाली.बाबल्याच्या आईने जीव दिला, आत्महत्या केली, त्याला आता ६१ वर्षे झाली.तेव्हां बाबल्याच्या आईच वय किती असावं बरं ?नऊ वारी लुगडं नेसणारी, ठेंगणी, सांवळी, गोल चेहऱ्याची, बाबल्याची आई अजून डोळ्यांसमोर दिसते.”काला अक्षर भेंस बराबर’ ही म्हण लागू पडणारी अक्षरशत्रू.अडाणी म्हणत तिला.अबोल नव्हे पण कमी बोलणारी.एकूण रूप बेंगरूळ.शिक्षण नसलं तरी ती सालस होती. साधी होती.मनाने स्वच्छ.दुसऱ्याला मदत करायला सदैव तत्पर.त्या वेळच्या बहुतेक बायका नऊवारी नेसायच्या.त्यामुळे मोठ्या वाटायच्या.तिने जीव दिला तेव्हां बाबल्या १४-१५ वर्षांचा होता.तेव्हां तिचं वय ३२ ते ३५ च्या आसपास असावं माझ्या आईच वय ३१ होतं.
▪
मी तेव्हा नऊ वर्षांचा होतो.सगळ्या गोष्टी स्पष्ट आठवतायत.आठवताहेत कसल्या–डोळ्यांसमोर स्वच्छ दिसताहेत.आमची वाडी नमुनेदार होती.त्या काळांतल्या प्रसिध्द चाळींपेक्षा वेगळी.अंधेरी या मुंबईच्या उपनगरात (त्यावेळी मुंबई वांद्र्यापर्यंतच होती. १९५२ साली मुंबई जोगेश्वरीपर्यंत वाढवण्यात आली.)पांच मिनीटांवर आम्ही रहात होतो ती वाडी होती.वाडीचा पुढचा भाग विस्तीर्ण होता व मागे थोडा कमी होता.मधोमध मालकाचा मोठा दुमजली मोठा बंगला होता.आताच्या सारखा गच्चीवाला नव्हे तर कौल असणारा.तळमजला खूपच मोठा होता.तो संपूर्ण एका वाण्याने व्यापला होता.मालकाने तळमजला त्याला भाड्याने दिला होता.(आजही त्या वाण्याचे वंशज तिथेच दुकान चालवतात.)त्याचं किराणा मालाच दुकान, रेशन दुकान हे सर्व तिथेच होतं एखाद्या मोठ्या ओटीसारखा पन्नास फूट बाय दहा फूट असा लांब पट्टा होता.पाठीमागे बऱ्याच लहान मोठ्या खोल्या होत्या.त्या सर्व गोदाम म्हणून वापरल्या जात.आजच्या स्क्वेअर फूटाच्या भाषेंत वाण्याच्या ताब्यातल्या जागेचं क्षेत्रफळ सुमारे दहा ते बारा हजार स्क्वेअर फूट कार्पेट एरीयाएवढ असावं.भाडे किती असेल तर केवळ शंभर रूपये.आजही सरकारी आणि म्युनिसिपल करांत वाढ झाली असेल पण भाडे कायद्याप्रमाणे भाड्यात वाढ नसेल झाली.
▪
त्यानंतरचा मजला थोडा लहान होता.मागे पुढे दोन्ही बाजूने थोडा भाग कमी झाला होता.तिथे एक मोठं एकत्र कुटुंब भाडेकरू म्हणून रहात होतं.दुसरा मजला पहिल्याहून पुढल्या बाजूने थोडा लहान होता.तिथे मालकांच मोठं कुटुंब होतं.ह्या बंगल्याच्या मागच्या बाजूला चांगला साडेतीन चार फूट उंचीच्या आयताकृती ओट्यावर तीन स्वतंत्र खोल्या होत्या.एका रांबगेतल्या त्या तीन खोल्या आंतून दरवाजांनी आगगाडीच्या डब्यासारख्या जोडलेल्या होत्या.बाजूच्या खोल्यांना तीन खिडक्या तीन दार होती.तर मधल्या खोलीला चार दार आणि दोन खिडक्या होत्या.पहिल्या खोलीच्या पायऱ्या दारासमोर नव्हत्या तर टोकाला होत्या.इतर दोन खोल्यांच्या दरवाजांसमोर पायऱ्या होत्या.प्रत्येक खोलीला माळा होता.माळा मधोमध सहा फूट उंच होता तर बाजूला फक्त तीन फूट.दोन टोकांच्या खोल्यांतील माळ्याना उजेड चांगला होता.कारण एक मोठी खिडकी आणि दोन आडव्या छोट्या खिडक्या होत्या.मधला माळा थोडा कमी उजेडाचा होता.आमच्याकडे डावीकडून पहिल्या दोन खोल्या होत्या.त्या काळच्या मानाने आणि दहा रूपये भाड्यांत ती बैठ्या घराची दोन खोल्यांची जागा हवेशीर आणि मोकळीच म्हणायची.वाईट गोष्ट एवढीच होती की पहिल्या खोलीच्या बाजूला सात-आठ फूट अंतरावरच एका ऊंच चौथऱ्यावर वाडीतील सर्वांसाठी त्याकाळी प्रचलित असणारे उघड्या टोपल्यांचे संडास होते.त्यामुळे पहिल्या खोलीची त्याबाजूची आमची खिडकी कायम बंद ठेवावी लागत असे.तिसरी खोली मालकाने स्वतःकडेच ठेवली होती.पुढे कांही वर्षांनी मालकांच्या मुलापैकी एकाने आपलं बिऱ्हाड त्या तिसऱ्या खोलीत थाटलं.वाण्याच्या दुकानाची मागची बाजू आमच्या घराच्या पुढच्या ओट्यापासून एका बाजूला चार फूटावर तर दुसऱ्या बाजूला दहा फूटावर अशी तिरकी येत असे.ह्या तिरक्या मोकळ्या पट्टीमधेच वाडीतल्या मुलांच क्रिकेट चाले.त्यांत बाबल्याही असे. मीही असे.ह्या घरांत मी माझ्या आयुष्याची पहिली पंचवीस वर्षे राहिलो.संपूर्ण बालपण तिथेच गेलं.मात्र दर वर्षी दोन अडीच महिने सुट्टीत कोल्हापूरला आजोळी जात असे.
▪
मालकाच्या दुमजली घराच्या डाव्या हाताला एक विहीर होती.ती सदैव भरलेली असे.पण विहीरीचा परीघ फार मोठा नव्हता.कठडा तीन फूटाचा असावा.ती आमच्या ओट्याच्या पुढे थोडी बाजूला होती.विहीरीवरची ये जा घरांत बसून दिसत असे.विहीरीच्या कांठी एका बाजूला जवळच औदूंबर होता.दुसऱ्या बाजूला जाण्यायेण्याचा रस्ता सोडल्यावर मोठा शेवगा होता.थोडी मोकळी जागा होती.त्यांत उघडी मोरी आणि नळ होता.भाडेकरूना पिण्याच पाणी तिथे भरावं लागत असे.त्याच्यापुढे सरदारजींच सुतारकामाचं दुकान होतं.त्याला दरवाजा नव्हता.दुकान म्हणजे उघडा मांडवच होता.सरदारजी म्हणत,”कोई मेरा नसीब तो नही छीन सकता.”होळीत मात्र दोन दिवस ते रात्री तिथे येऊन झोपत.त्यांच्याकडे कधीही चोरी झाली नाही.
▪
मालकाच्या घराच्या उजव्या बाजूला वाडीतच एक एकमजली चाळ होती.त्यांत तळमजल्यावर आणि पहिल्या मजल्यावर दोन दोन खोल्यांचे चार चार गाळे होते.ती चाळ रस्त्याला लागून होती.त्यामुळे तळमजल्यावर चार दुकानं होती.एक मारवाडी, एक केशकर्तनालय, एक डॉक्टर आणि एक टायरवाला.मारवाड्याचं बाहेरच्या दहा बाय दहाच्या खोलीत दुकान तर वर पहिल्या गाळ्यांत एका वकिलांच अॉफीस होतं.दुसऱ्या खोलींत बाबल्याचे कुटुंब रहात असे.तर पुढच्या दोन गाळे एकाच महाराष्ट्रीयन कुटुंबाकडे होते.त्या चाळीच्या मागच्या बाजूला जैनांच देऊळ अगदी तीन फुटांवर येऊन भिडलेलं होत.चाळीच्या खिडकीतून हात बाहेर लांबवला तर तो त्या भिंतीला लागेल की काय असं वाटण्याइतकी जवळ होती ती भिंत.त्यामुळे एक बोळकंडीच तयार झाली होती. बाबल्याच्या मधेच असलेल्या घरांत आतली खोली कायम काळोखात बुडालेली असे.बाबल्याच्या घराला जो कांही थोडा उजेड मिळे तो पुढच्या बाजूने.चूलींतल्या विस्तवाच्या प्रकाशांतच बाबल्याच्या आईचा स्वयंपाक चालत असावा.नुकताच स्टोही आलेला होता.१९४७ साली अंधेरीत बहुसंख्य कुटुंबं चुलीवरच स्वयंपाक करायची.
▪
त्या काळानुरूप बाबल्याच्या आईच्या आणि त्याच्या वडिलांच्या वयांत किमान १५-१६ वर्षांचं अंतर असावं.बाबल्याचे वडिल धोतर, सफेद किंवा पिवळसर सदरा आणि त्यावर काळं जाकीट असा वेश करत असत.केस मेंदीने किंवा कशाने तरी रंगवत असावेत.पुढे पुढे त्यांचे केस लालसर, पिवळसर दिसू लागले होते.ते एखाद्या जुन्या नाटक कंपनीतल्या माणसासारखे दिसत.पण त्यांचा व्यवसाय होता हॉटेलचा.अंधेरीच्या मार्केटच्या एका कोपऱ्याला त्यांच हॉटेल होतं.आजही ते श्रीराम लंच होम तिथें चालू आहे.छोटंच हॉटेल होतं.दाटीवाटीने बसवलेल्या वर लादी बसवलेल्या गोल टेबलांवर एकावेळी पंधरा ते वीस माणसं बसू शकतील एवढचं.त्यांच्या घरांतही तसलंच एक टेबल होतं आणि त्यावर इतर कुठल्याही घरांत त्याकाळी नसलेला रेडीओ ठेवलेला असायचा.त्याकाळी तशा मंगलोरी लोकांच्या हॉटेलला “कोंगाट्याचं हॉटेल” म्हणत.ती सर्व हॉटेल्स तशीच असत.जेवण स्वस्त मिळे.त्यांच नांव होतं लक्ष्मण आणि आडनाव होतं राव.मंगलोरकडच्या कोणत्या गावचे होते ते कधी कळलं नाही.त्यांच मराठी जरा विचित्र वाटे.बाबल्याच्या वडिलांशी संबंध कधी फार आला नाही पण ते उमदे आणि आनंदी वाटत.वाडीतल्या इतर लोकांच्या बोलण्यांत त्यांना गांजाच व्यसन असल्याचा उल्लेख येई.बहुधा तो खरा नसावा.त्यांना दमा होता व खोकल्याने ते कधी कधी बेजार होत.
▪
बाबल्याचं खरं नांव होत सुरेश.सुरेश लक्ष्मण राव हा एकुलता एक मुलगा होता.त्या काळांत असं छोटं कुटुंब विरळाच, अगदी अपवादात्मक.वाडीतली किंवा अंधेरीतली बहुतेक कुटुंब मोठालीच होती.त्यामुळे बाबल्या खूपच लाडांत वाढला होता.त्यातच त्याला लहानपणी देवी येऊन गेल्या होत्या.त्याच्या लांबट थोराड चेहऱ्यावर जास्त नाही पण सहज दिसण्याइतपत खुणा ठेऊन गेल्या होत्या.सांवळा रंग आणि जाडा नसला तरी वयाच्या मानाने थोराड देह असलेला बाबल्या वयाच्या मानाने मोठा वाटे.त्याकाळच्या बहुतेक आयांप्रमाणे बाबल्याची आईही बाबल्याच्या डोक्यावर खूप खोबरेल तेल चोपडत असे.असा हा बाबल्या प्रथम वाडीत आणि नंतर सबंध अंधेरीत सतत भटकत असायचा.घरी फक्त खायला आणि झोपायला असायचा.
▪
बाबल्याचं आणि शाळेच्या अभ्यासाचं कधीचं जमलं नाही.तो माझ्यापेक्षा पांच वर्षानी मोठा होता.पण मी चौथी पास होऊन पांचवीत गेलो तोपर्यंत प्रत्येक वर्गात दोन दोन वर्षे काढत तो सहावीतच होता आणि नंतर त्याने शाळा सोडूनच दिली.मला माझ्या शाळेचा पहिला दिवस आठवतोय.अंधेरीला लोकल बोर्डाची शाळा होती.बिगरीच्या वर्गात (आताची के. जी.) जाऊन बसल्यानंतर प्रवेश वगैरे औपचारिकता कधीही पूर्ण करता यायची.पहिल्या दिवशी आईने मला तेव्हां चौथीत असणाऱ्या बाबल्याबरोबर शाळेत पाठवलं होतं.प्रथम ती मला बाबल्याच्या घराकडे घेऊन गेली.बाबल्याकडे आणि माझ्याकडे, दोघांकडेही जाडसर सफेद धाग्यानी विणलेल्या उभट सुती पिशव्या होत्या.अशा पिशव्या विणणं हा माझ्या आईचा छंद होता.माझी आई गुरू आणि बाबल्याची आई तिच्याकडून अशा गोष्टी शिकून घेत असे.त्या पिशव्यांचे धागासुध्दा वाण्याकडून घेतलेल्या पिशव्यांना गुंडाळलेला मुद्दाम जमवला जात असे.ते दिवस ‘कोंड्याचा मांडा’ करून खायचे होते.वायफळ खर्च वर्ज्य होता.तर अशा साधारण सारख्याच असलेल्या पिशव्या घेऊन बाबल्याचा हात धरून त्या दिवशी मी प्रथम शाळेत गेलो.शाळा दहा मिनिटांच्या अंतरावर होती.त्या रोडवर, तेव्हांचा वर्सोवा रोड आणि आताचा जयप्रकाश रोड, वाहतूक तुरळक असे.ट्रकस आणि बसेस अधून मधून जात असत.खाजगी गाड्या हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच दिसत.घोडबंदर रोडवर म्हणजे आताच्या स्वामी विवेकानंद रोडवर वाहनांची रहदारी जास्त असायची.कांही दिवस मी बाबल्या व वाडीतल्या इतर मुलांबरोबर शाळेंत जात असे.नंतर एकटाच जाऊ येऊ लागलो.
▪
आधी म्हटल्याप्रमाणे माझ्या आईची आणि बाबल्याच्या आईची खूप मैत्री होती.विणकाम, शिवणकाम, भरतकाम, स्वयंपाकात नवे नवे पदार्थ करून पहाणं, दिवाळीचे पदार्थ करताना एकमेकांना मदत करणं आणि इतर अनेक कारणांनी त्यांची मैत्री सतत वाढतच होती.बाबल्या जसा जसा मोठा होऊ लागला तशी तशी त्याच्या आईची त्याच्याविषयीची काळजी वाढू लागली.बाबल्या कांही मतिमंद नव्हता.पण अभ्यासांत त्याला अजिबात गती नव्हती, अभ्यासाची नावडच होती म्हणा ना.अशांतच त्याला दोन छंद लागले.एक सिनेमा पहाण्याचा आणि दूसरा सायकलवरून भटकण्याचा.आजच्या मानाने त्या काळांतील चित्रपटांतील ‘फायटींग’ आणि ‘रोमान्स’ अगदीच बाळबोध असायचा.पण बाबल्या ते सिनेमा पाहून भारावून जायचा.त्याच्या तोंडी नेहमी नादिया, जॉन कावस इ. नावे असायची.मग पहिल्या मजल्यावरून उडी मारायची, धाडधाड धावायचं, सिनेमातल्यासारखे फायटींगचे खेळ खेळायचे, ह्या गोष्टींची त्याला खूपच आवड उत्पन्न झाली.सिनेमातले अनेक प्रयोग प्रत्यक्षात करायचा तो प्रयत्न करू लागला.अर्थातच ह्या धडपडीत हातपाय मोडून घेणं, जखमा होणं, ह्या गोष्टी घडू लागल्या.पण बाबल्या आपल्याच धुंदीत असे.असल्या गोष्टींचे त्याला कांहीच वाटत नसे.
▪
सायकल शिकल्यावर बाबल्याचा पाय जमिनीवर ठरेना.तो सतत सायकलवरच दिसायचा.भाड्याची सायकल घेऊन त्यावरून रस्त्यावर भरधाव सायकल दौडवणारा बाबल्या सर्वाना दिसू लागला.तो लांब लांब जाऊ लागला.त्याचं सायकल चालवण म्हणजे रस्त्याच्या मधून.ट्रक, कार, बस यांनीच त्याला साईड द्यायला पाहिजे असं त्याला वाटत असणार.तो तूफान वेगाने जात असताना लाॕरीवाल्याने ब्रेक लाऊन त्याला कसं वाचवलं हे वाडीतलं कुणीतरी पहात असे आणि मीठ मसाला लावून बाबल्याच्या आईला सांगत असे.मग ती पुन्हा कपाळाला हात लावून काळजी करत बसे.
▪
अशातच एक दिवस बाबल्याचे वडिल वारले.पन्नास-बावन्न एवढच वय असेल त्यांच.थोड्याशाच आजारानंतर ते गेले.ते बाबल्याची काळजी करायचे की नाही कुणास ठाऊक! त्यांनी ती कधी बोलून दाखवली नाही.पण आपल्यामागे आपल्या अशिक्षित बायकोची व मुलाची आबाळ होऊ नये म्हणून नीट व्यवस्था करून ते गेले. त्यांनी आपलं हॉटेल आपला मॕनेजर शेट्टी याला चालवायला दिलं आणि अशी अट घातली की त्यांनी दोघांना दरमहा २०० रूपये द्यायचे. त्या काळांत ती रक्कम पुरेशी होती.
— अरविंद खानोलकर.
Leave a Reply