सध्या एका नामवंत वाहिनीवर “बबड्या’ची मालिका चालू आहे. त्यातील पात्रांवरुन फेसबुकवर, व्हाॅटसअपवर अनेक ‘टीकात्मक पोस्ट’ वाचनात आल्या. त्यातील विनोदाचा भाग सोडला तर आजकाल दहा कुटुंबातील चार तरी कुटुंबात ‘बबड्या’ आपल्याला भेटतोच.
माझंच पहाना, आमचा ‘बबड्या’ बालवाडीत असताना त्याला रोज डब्यामध्ये आसावरी वेगवेगळा खाऊ द्यायची. कधी मॅगी, कधी केक तर कधी बर्गर. शाळेतल्या बाई बबड्याच्या आईला समजावून सांगायच्या, ‘आसावरी ताई, बबड्याच्या डब्यात पोळी भाजी देत चला. त्यानं डबा उघडला की, इतर मुलांना त्यांच्या डब्यापेक्षा बबड्याचे वेगळे पदार्थ पाहून त्याचा हेवा वाटतो. असं व्हायला नको म्हणून तुम्ही पोळी भाजीच देत जा.’ आसावरीनं आधी ‘माझ्या बबड्याला पोळी भाजी आवडत नाही’ यावर बाईंचं ‘बौद्धिक’ घेतलं व नंतर मान्य केलं.
बबड्या आता शाळेत जाऊ लागला. माझा विचार होता की, बबड्याने मराठी शाळेतच जावं त्यामुळे त्याच्यावर चांगले संस्कार होतील, आपली मराठी संस्कृती कळेल मात्र आसावरीने त्याला इंग्रजी मिडीयम शाळेत घातले. अशा शाळांची शिस्त फार कडक असते. परिणामी आसावरीला त्याचं खाणं पिणं, डबा, युनिफॉर्म, बुट, शाळा, क्लास यामध्ये चोवीस तासही कमी पडू लागले. आसावरी पदवीधर होती त्यामुळे ती पाचवी सहावीपर्यंत बबड्याचा अभ्यास घेऊ शकली. त्यापुढे तिला अभ्यास घेणे कठीण जाऊ लागले. शाळेतील पालकांच्या सभेला तीच जात होती. बबड्याच्या अतिलाडामुळे तो अभ्यासात ‘कच्चा लिंबू’ राहू लागला. घरात असताना आईला कामात मदत न करता सतत टीव्ही पाहण्यामुळे त्याला चष्माही लवकरच लागला.
आसावरीने बबड्याच्या प्रत्येक वाढदिवसाला महागडी खेळणी, व्हिडिओ गेम, कपडे दिल्यामुळे त्याच्या आईकडून अपेक्षा वाढतच राहिल्या. सोसायटीतील मुलांमध्ये कधीही न मिसळल्यामुळे बबड्या एकलकोंडा झाला. आसावरीला आपण त्याची खूप काळजी घेतो आहे, असं वाटत होतं मात्र तिच्या अशा वागण्यामुळेच तो आळशी होत गेला. त्याला जे हवं ते बसल्या जागेवर मिळत होतं. मी नोकरीच्या निमित्ताने फिरतीवर असायचो. मी काही सांगायला गेलो तर तिचं ‘बबड्या प्रेम’ आडवं यायचं.
बबड्या आता काॅलेजला जाऊ लागला. आसावरी सकाळी त्याच्या नाश्त्यासाठी वेगवेगळे पदार्थ करु लागली. तरीदेखील त्याला कॅन्टीनमधील ‘वडापाव’ खाण्यातच इंटरेस्ट असायचा. आसावरी स्वयंपाकात सुगरण होती. सणासुदीला तिच्यासारखी पुरणपोळी व कटाची आमटी आख्या सोसायटीतील कुणालाही जमत नसे. बबड्यानं पुरणपोळीला नकार दिल्याने आसावरी हिरमसून जात असे. अशावेळी सणाच्या निमित्ताने मी घरी असलो तर पुरणपोळीवर मनसोक्त ताव मारत असे. इतर वेळी माझा कोणत्याही भाजीला नकार नसल्याने मी ताटातील असेल ती भाजी आवडीने खात असे. बबड्या मात्र त्याच्या आवडी निवडीमुळे कधी पोटभर जेवलाच नाही. ताटात त्यानं नाकारलेलं जेवण नेहमीच वाया जात असे.
घरी असताना बबड्याच्या रात्री उशीरापर्यंत जागून, लॅपटाॅपवर गेम खेळत बसण्यावर मी नाराजी व्यक्त करायचो. त्यावर आसावरी त्याचीच बाजू घ्यायची. परिणामी बबड्या उशीरा उठायचा. मी त्याला लवकर उठलास तर बक्षीस देण्याचे अनेकदा आमिष दाखविले. तरीदेखील त्याने ‘सूर्यवंशी’ होण्याचे साफ नाकारले.
बबड्याचं शिक्षण पूर्ण झालं. त्याने एका मोठ्या कंपनीत नोकरीसाठी अर्ज केल्यावर त्याला मुलाखतीसाठी बोलावले. त्या दिवशी कंपनी दोनच उमेदवारांची मुलाखत घेणार होती. दिलेल्या पत्त्यावर बबड्या पोहोचला. त्याने पत्रात दिलेल्या पत्त्यानुसार पाहिले तर ती बिल्डींगच्या तळमजल्यावरील एक मोठी रिकामी रुम होती. तिथे लाईट चालू होती, पंखा फिरत होता व कोपऱ्यातील एका बेसिनमधील नळ वहात होता. बेसिनच्यावरती एका पेपरवर ‘मुलाखतीसाठी तिसऱ्या मजल्यावर जावे.’ अशी सूचना लिहिली होती. बबड्या ताबडतोब तिसऱ्या मजल्यावर गेला. तेथील शिपायाने त्याला बसायला सांगितले. पाच मिनिटांच्या अंतराने दुसरा उमेदवार वरती आला. त्याला शिपायाने आत साहेबांकडे पाठवले. थोड्याच वेळात तो दुसरा उमेदवार खुशीत बाहेर आला. त्याला थांबवून बबड्याने विचारले, ‘तुझी मुलाखत घेतली का?’ त्याने होकार दिला व सांगितले, ‘मी तळमजल्यावरील रुममध्ये गेल्यावर पहिल्यांदा पंखा बंद केला, पाणी वाया घालवणारा नळ बंद केला व आवश्यकता नसताना लाईट चालू होती ती बंद करुन वरती आलो. माझ्या घरातही असंच काम मी आवर्जून करतो. माझे हे कृत्य पाहून साहेबांनी मला ‘कंपनीचं हित पहाणारा योग्य उमेदवार’ म्हणून माझी निवड करुन रुजू होण्यासाठीचे पत्र दिले आहे.’
बबड्या त्या नोकरीसाठी पात्र असून देखील त्याला स्वयंशिस्त नसल्याने अपात्र ठरविण्यात आले. त्याने घरी आल्यावर आसावरीला घडलेला प्रसंग सांगितला व म्हणाला, ‘आई, तू माझे लाड न करता मला शिस्त लावली असतीस तर आज मला ही नोकरी सहज मिळाली असती. यापुढे माझे काम मी स्वतःच करीत जाईन.’
आसावरी आश्चर्याने बबड्याकडे पहातच राहिली. बबड्या ‘आत्मनिर्भर’ होतो आहे, याचे तिला मनापासून कौतुक वाटत होतं….
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
२-९-२०.
Leave a Reply