शरीरयष्टी (सिक्स पॅक) वगैरे विना अभिनय करता येतो किंबहुना अभिनेत्याला सगळं चेहेऱ्यावरून आणि देहबोलीतून व्यक्त करायचं असतं, त्यासाठी पहिलवान असण्याची गरज नसते अशा काळातला राजेश खन्ना ! आमच्या पौगंडावस्थेतील (त्याकाळी ती उशिरा यायची -साधारण ८वी / ९वीत आणि आजकालसारखी ८व्या -९व्या वर्षी नाही) कालखंडात त्याने आमच्यावर आक्रमण केलं आणि महाविद्यालयीन जीवन संपेपर्यंत एकहाती अधिराज्य केलं. आम्ही त्याकाळी साधारण तीन गटात असायचो – राज, दिलीप आणि देव ! क्वचित काही मंडळी शम्मी ,शशीची फॅन असतं . पण आमच्या पिढीची सामाईक ओळख “खन्ना ” हीच होती. तेथे वादविवाद नसतं.
दिसायला सर्वसामान्य असणं हे त्याच्या भात्यातील प्रभावी अस्त्र होतं – त्यामुळे तो “सच्चा -झूठा “मधील भाऊ शोभायचा, “दुष्मन “मधील ट्रक ड्रायव्हर म्हणून पटायचा, “कुदरत “मधील ग्रामीण देहाती म्हणून स्वीकारला जायचा, ” बावर्ची ” मधील आचारी व्हायचा , ” मेहबूबा ” मधील गायक आणि राजगायक म्हणून पसंत पडायचा आणि — आणि —-आणि —— !
अतिशय हळुवार ,नाजूक ,कोवळ्या अलवार भावना त्याच्या आवाजातून आणि चेहेऱ्यावरून व्यक्त व्हायच्या. ” दाग ” मधील अपिलींग भाषण असो , कीं “आनंद ” मधील “बाबू मोशाय ” ही हाक ! तो आतवर भिडून जायचा.
” आय हेट टिअर्स ” पासून ” अरे,ये आंसू बाहर कैसें आ गये ” पर्यंतचा त्याचा “अमर प्रेम “मधला प्रवास हा ” आनंद ” मधील स्वतःचा भूतकाळ कोणाशीही शेअर न करण्याच्या प्रवासाशी समांतर होता आणि ” मित्र गेल्यावर मी आता गाणार नाही ” ही “अनुरोध “मधील हृद्य धमकी दरवेळी डोळे पाणावून जायची. माझ्या आसवांवर मालकी फक्त त्याने आणि राज कपूरने सांगितली.
त्याला जागोजागी सावरणारा किशोरचा आवाज ! मुकेश-राज, रफी-दिलीप जोडीसारखी ही आधुनिक जोडगोळी होती. काहीवेळा मुकेशही असायचा (” जिस गली में तेरा घर ना हो बालमा ” वाला ).
खन्ना “सफर ” मध्ये आवडला , “प्रेमकहानी ” मध्ये आवडला , ” प्रेमनगर ” सारख्या दक्षिणेकडील चित्रपटात आवडला (“लता, जबान को लगाम दो”), अगदी करियरच्या आखरी पडाव मधील “आखिर क्यों ” आणि “धनवान “मध्येही !
बहुधा खन्ना हा एकमेव कलावंत असेल ज्याचे एकूणएक चित्रपट मी आणि माझ्या समवयस्कांनी ( पिढी वगैरे लिहिलं तर उगाच बुजुर्ग वगैरे वाटेल) पाहिले असतील. सुपरस्टार या पदावर खूप काळ राहिलेला हा कलावंत, ” आपकी कसम ” मधील “जिंदगीके सफर में ” मध्ये एकाकी वाटला, “चिंगारी कोई ” तत्वज्ञान सांगणारा स्वतःच त्याच्याशी सहमत नसल्यासारखा वाटला.
खूप अवीट ,गोड गाणी या गृहस्थाने आम्हांला वाटली. आमचे कान आणि डोळे त्याला सतत फितूर असतं. त्याचे संवाद आम्हाला पाठ असतं. त्याच्या डायलॉग डिलिव्हरीतील सहजतेला आम्ही सलाम करीत असू.
व्यक्तीगत जीवनातील पडझडीने तो आक्रसला. ज्या नवोदित “विनोद मेहेरा ” समोर तो रुबाबात वावरला (अमर प्रेम ) त्याच विनोदने त्याला “अनुरोध “मध्ये सहज मागे टाकले. प्रगल्भ भूमिका ( “अमर प्रेम ” किंवा “आखिर क्यों ” ) त्याने तितक्याच ग्रेसफुली निभावल्या.
खन्ना आणि त्याच्यावरील लेखन ” आनंद ” आणि ” आराधना “शिवाय अपुरं राहिलं. हे सिनेमे आम्हीं वारंवार जगलो. एक काळ असा होता की एकाचवेळी त्याचे तीन -चार चित्रपट लागलेले असतं आणि खिशाचा सल्ला बंधनकारक असल्याने आम्ही कॉम्प्रोमाइज करीत असू. खन्नाचे असे खूप सिनेमे आम्ही सेकंड रनला पाहीले .(उदा. रोटी )
हळूहळू त्याला पर्याय निर्माण होत गेले , त्याची सद्दी संपत आली. ते त्याच्या लक्षात आलं की नाही , माहीत नाही पण चित्रसृष्टी कायम उगवत्या सूर्याला नमस्कार करते. तरीही “नमक हराम ” मधील तो, ” आप की कसम ” मधील तो, ” कटी पतंग ” मधील तो, “खामोशी “मधील तो आठवतच राहतो.
तारुण्यावर कोरले गेलेलं त्याचं नांव ” आज भी “करीब ” हैं ! ” आणि राहणार !!
त्याचा लकबींनी भरलेला हसरा वावर कानाशी गुफ्तगू करीत असतो-
” याद आयेगी हमारी तो बीते कल की किताब पलट लेना,
यूँ ही किसी पन्ने पर मुस्कुराते हुए मिल जायेंगे हम!! ”
खन्ना, पुस्तक दिनानिमित्त ही आयुष्याची पाने आज तुझ्यासाठी चाळली बघ !!
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply