त्या नंतर काही दिवसांनी माझा आवाज फुटायला लागला. म्हणजे लहानपणी मुलगे स्त्रियांच्या पट्टीत गातात. पण नंतर मुलांची पट्टी बदलते. त्यावेळी असे होते की, कोणत्याही सुरात नीट गाता येत नाही. सगळ्या मुलांना या अवस्थेतून जावे लागते. आपल्याला बहुतेक आता गाणे गाता येणार नाही की काय अशी गोंधळलेली अवस्था निर्माण होते. यावेळी नशिबाने एक अतिशय उत्तम घटना माझ्यासाठी घडवली. सुप्रसिद्ध कविवर्य पी. सावळाराम माझ्या वडिलांचे मित्र होते. अनेकदा ते आमच्या घरी येत असत. एकदा रात्री साडेअकराच्या सुमारास त्यांचा फोन आला आणि थोड्याच वेळात सुप्रसिद्ध गायक श्री. सुधीर फडके यांना घेऊन ते आमच्या घरी आले. ठाण्यात एका कार्यक्रमासाठी बाबूजी आले होते. घरात एकदम गडबड उडाली. झोपण्याच्या तयारीत असलेले आमचे घर खडबडून जागे झाले. मी तर झोपलोच होतो. आईने मला उठवून ही बातमी दिली. मला अत्यंत आनंद आणि अतिशय दुःख झाले. आनंद यासाठी की, मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत ख्यातनाम अशा संगीतकाराला आणि गायकाला आता आपण प्रत्यक्ष भेटणार आणि दुःख यासाठी की, त्यांना आपण चार ओळीदेखील गाऊन दाखविण्याच्या परिस्थितीत नाही. तसाच धावत जाऊन त्यांना नमस्कार केला. पी. सावळाराम दादांनी मला गाणे येत असल्याचे सांगितले आणि बाबूजींनी लगेच एखादे गाणे म्हणायला सांगितले. मी काय गाणार? रडायलाच लागलो. आईने माझा आवाज फुटायला लागल्याचे सांगितले. बाबूजींनी मला जवळ बसवले. ते म्हणाले, “काळजी करू नकोस. माझाही आवाज त्या वयात फुटला होता. आता मी छान गातो की नाही? फक्त या काळातही जमेल त्या सुराच्या पट्टीत ‘सारेगमपधनीसां’चा रियाज सुरू ठेव. तुझा आवाज बदलला आहे. त्यावर ताण देऊ नकोस, पण रियाज मात्र करीत राहा. हळूहळू आवाज एका सुराच्या पट्टीत स्थिर होईल. एक लक्षात ठेव, आत्तापर्यंत केलेला रियाज फुकट जाणार नाही. किंबहुना त्यामुळेच पुन्हा चांगले गाता येऊ लागेल. तेव्हा रियाज सुरू ठेव.” माझ्या गोंधळलेल्या अवस्थेतील मनामध्ये त्या महान गायकाने पुन्हा उत्साह भरला. त्यांची साधी राहणी, अत्यंत नम्र बोलणे माझ्या मनावर विलक्षण परिणाम करून गेले.
– अनिरुद्ध जोशी
Leave a Reply