नवीन लेखन...

हॅास्पिटलमधून बाळ गायब

१. गेले चार दिवस मुंबईतील कमलाबेन हॅास्पिटल चुकीच्या कारणासाठी पेपरांत गाजत होतं. हॅास्पिटलच्या प्रसूती विभागातून तीन दिवसांच बाळ गायब झालं होतं. तिथल्या नर्स, मेट्रन, डॅाक्टर, ह्या त्याबद्दल कांहीच सांगू शकत नव्हत्या. हॅास्पिटल मोठ्या उद्योगपतीचे असल्यामुळे प्रथम त्यांनी ही बातमी दाबून टाकण्याचा प्रयत्न केला गेल्याचा आरोपही हॅास्पिटल मॅनेजमेंटवर होत होता. नीरजा काटकर नांवाच्या एका मध्यमवर्गीय महिलेचा बारा दिवसांपूर्वी तिथे प्रसूती होऊन तिला साडे सात पौंड वजनाचा मुलगा झाला. हॅास्पिटल प्रसूतीपासून पांच दिवसांनी बाळ-बाळंतीणीला घरी जाऊ देण्याची हॅास्पिटलची पध्दत आहे. हॅास्पिटलमध्ये बाळांना वेगळं ठेवलं जाई आणि मधून मधून ठराविक वेळी आईकडे आणून दिलं जाई. परंतू चौथ्या दिवशी सकाळी बाळाला आईकडे आणून दिलं नाही. तिथेच बसलेल्या आजींनी नर्सला विचारले, “अग, बाळाला घेऊन येतेस ना! भूकेलेलं असेल ते!” “आणत्ये आज्जी” म्हणून गेलेली नर्स बराच वेळ परत आली नाही. आई-आज्जी अस्वस्थ झाल्या.
त्यांनी दुसरी नर्स शोधली आणि तिला सांगितलं, “ती म्हणाली, मी तिला पहाते हं!” ती गेली आणि बराच वेळ तीही आली नाही. बऱ्याच वेळाने दोन डॅाक्टर, दोन नर्स, एक वॅार्ड बॅाय असा सर्व ताफाच तिथे आला. बाळाच्या आईच्या पोटांत “धस्स” झाले. आजी म्हणाली, “बाळ कुठे आहे?”
डॅाक्टर स्टाफला विचारत होते, “इथे नीट पाहिले कां?”
सिस्टर म्हणाली, “इथेही पाहिले पण इथे नव्हतेच.
रात्री दोन वाजता तें रडत होते, म्हणून आईजवळ दिले होते.
साडे तीनला मीच परत नेऊन ठेवले. आता माझी ड्यूटी संपली म्हणून मी जात होते तर मला परत बोलावले.”
बाळाच्या आजीने कळवळून विचारले, “मग बाळ आहे कुठे?”
आई तर रडायलाच लागली. बाळ सांपडलेच नाही. पोलिस मात्र आले. त्यांनी डॅाक्टर शहाणे, डॅाक्टर शर्मा, मेट्रन मेरी, तीन नर्सेस शीला, कनिका, सॅंड्रा आणि एक सफाई कामगार बाई ह्यांच्या जबान्या घेतल्या आणि तिथे असलेल्या सीसीटीव्हीच्या फूटेजची कॅापी घेतली.

२.
हॅास्पिटलमधून ही बातमी बाहेर पडायला वेळ लागला नाही. संध्याकाळच्या पेपरमध्येच बातमी आली. “कमलाबेन हॅास्पिटलमधून बाळ गायब”. दुसऱ्या दिवशी बऱ्याच संपादकांनी हॅास्पिटल प्रशासनाला धारेवर धरलं. दोन दिवसांनी उद्योगपतींचे नांवही घेतले जाऊ लागले. एवढे मोठे हॅास्पिटल, त्यांत अनेक विभाग, अनेक तज्ञ आणि त्यामुळे हॅास्पिटलची ॲाक्युपन्सी १००% हून अधिकच असे. जास्त वाटलं कां? सकाळी ॲडमिट होऊन दुपारी जाणाऱ्याचाही एक दिवस धरला जातो तर दुपारी आलेल्यांचे नवा दिवस तिथून सुरू होऊन सकाळी सातला संपतो. असे दोन्ही पेशंटस पूर्ण दिवसाचे रूम चार्जेस देतात.

साहजिकच ॲाक्युपन्सी १०० च्या वर जाते. हॅास्पिटलचा पसारा मोठा. उद्योगपतींनी जरी गुंतवणूक केली असली तरी ते कांही स्वत: हॅास्पिटल चालवत नव्हते. त्यासाठी त्यांनी बोर्ड नेमले होते. बोर्डावर रिटायर्ड बँकर होते, नामांकीत डॅाक्टर्स होते. मॅनेजमेंट एक्सपर्ट होते. त्या बोर्डावर हॅास्पिटल मॅनेजमेंट पहाणारे फक्त दोघे होते. एक सीईओ आणि त्यांचे डेप्युटी. आजवर सर्व सुरळीत चाललं होतं. दर इतर हॅास्पिटल्सहून अधिक होते. १००% हून अधिक ॲाक्युपन्सीमुळे फायदाच फायदा होता. बाळ गायब झाल्याच वृत्त आलं आणि अचानक तीन चार दिवसांत ॲाक्युपन्सी ९१% वर आली व घसरतच होती. बोर्डाची तात्काळ मिटींग घेण्यात आली. सीईओ तांबे आणि डेप्युटी सीईओ म्हसकर, यांच्या बरोबरच प्रसूती विभागाच्या प्रमुख डॅाक्टर नीना कुरीयननांही हजर रहायला सांगण्यात आलं.

३.
यशवंत रोज वर्तमानपत्रांत येणारा मजकूर वाचत होते. चंदूही वाचत होता. चंदूने एकदा ह्या विषयावर मामांकडे बोलणे काढले होते. तेव्हा यशवंत म्हणाले होते, “चंदू, एक लक्षांत घे तीन दिवसांच तान्हं बाळ वाढवायचं म्हणजे सोप्पी गोष्ट नाही. तेव्हां यामागे एखादी मुलं पळवणारी मोठी टोळी वगैरे असण्याची शक्यता जवळ जवळ शून्य आहे. हे कुणाचे तरी एकट्याचे काम आहे. हॅास्पिटल स्टाफपैकी कोणी तरी त्या एका चोराला मदत केली असावी, एव्हढच मी सध्या म्हणू शकतो.” चंदू म्हणाला, “बरोबर आहे आणि अशी केस आपल्याकडे येण्याची शक्यता कमीच आहे.” ह्यावर यशवंत मामा गूढ हंसले. त्यांना वाटत होतं की हे प्रकरण आपल्याकडे येणार. उद्योगपतींना आपली पत महत्त्वाची असते. हॅास्पिटलच्या निमित्ताने ती एकदा मार्केटमध्ये घसरली तर इतर उद्योगांवरही परिणाम होईल. ते पोलिसांवर फार काळ अवलंबून रहाणार नाहीत. नीरजा काटकरला पांच दिवसांनी बाळाशिवाय घरी जावं लागलं होतं. माध्यमे तिची वा तिच्या पतीची मुलाखत प्रसारित करत होते पण यशवंतांच्या हेही लक्षांत आलं होतं की माध्यमे हॅास्पिटलच्या मॅनेजमेंटवर फारशी टिकाही करत नव्हती कारण त्या गृपच्या उद्योगांकडून मिळणाऱ्या जाहिराती त्यांना गमवायच्या नव्हत्या. यशवंतांचा ही केस आपल्याकडे येणार हा कयास अचूक ठरला. त्या उद्योगपतीच्या सेक्रेटरीचा त्यांना फोन आला, “साहेबांनी तुम्हाला आणायला कार पाठवायला सांगितलय. उद्या सकाळी नऊला पाठवू कां?”
४.
उद्योगपतींचे बीकेसीतील (बांद्रा-कुर्ला कॅाम्प्लेक्समधील) ॲाफीस हे यशवंताच्या घरापासून कारने पंधरा मिनिटांच्या आंतच आले. नऊ वाजून वीस मिनिटांनी त्यांचे उद्येंगपतींनी उभं राहून स्वागत केलं आणि त्यांना बरोबर घेऊन संभाषणासाठी सोफ्यावर जाऊन बसले. त्यांनी सरळ विषयालाच हात घातला, “आमच्या हॅास्पिटलमधून बाळ गायब होणं, हे आम्ही लांछनास्पद मानतो. मला कांही करून तेंच मूल मिळायला हवंय आणि हे कसं झालं ते कळायला हवं. म्युनिसिपालिटीच्या हॅास्पिटलमध्ये पूर्वी असा प्रयत्न झाल्याची आणि कधी मुलांची अदलाबदली झाल्याच्या बातम्या येतात पण आमच्याकडे असं होऊच कसं शकतं? आम्ही पगारही जास्त देतो. मला आमचे न्यूरॅालॅाजिस्ट व तुमचे मित्र डॅाक्टर गोसावी ह्यांनी तुमचं नांव सुचवलं. मी ही ऐकलयं तुमच्याबद्दल. तुम्हाला मी विनंती करतो की लवकरात लवकर ह्याचा छडा लावा. फी हवी तर आधीच घ्या.
यशवंत म्हणाले, “फी चं कांही नाही. हॅास्पिटलच्या सीईओ, डेप्युटी सीईओ ह्यांना माझ्याशी सहकार्य करायच्या सूचना द्या. सर्व नोंदी, हॅास्पिटलची सर्व व्यवस्था पहाण्याची मुभा द्यायला सांगा.” उद्योगपती उभे राहून हस्तांदोलन करत म्हणाले, “ ती सर्व व्यवस्था होईल. सी.सी. टी.व्ही. फुटेजही देऊ.” यशवंत साडे दहाच्या आंत घरी परत आले होते.
आल्याबरोबर चंदूला सर्व सांगून ते म्हणाले, “चंदू, म्हणजे त्या गायब बाळाचा शोध आपल्यालाच घ्यायचा आहे.”

५.
“मामा, तुम्हीच म्हणाला होता की तीन दिवसाच्या बाळाला पळवायला तसंच जबरदस्त कारण पाहिजे.” चंदू म्हणाला.
“हो, त्या दिशेने विचार करतोय मी पण सध्या हे सीसीटीव्ही कव्हरेज काय आलंय ते तर पाहूया. चंदूने लॅपटॅाप टीव्हीशी जोडला व कव्हरेजमधील भाग टीव्हीवर दिसू लागला. प्रथम प्रसूती विभागांत सात जणींची सोय होती आणि वॅार्ड एकच होता. सर्व बेडसवर स्त्रीया दिसत होत्या. तीन चाकं लावलेले पडदे होते. आवश्यक असल्यास एका बेडला दोन किंवा तीन बाजूनी बंद करून प्रायव्हसी निर्माण करत. सिस्टर शीला दोन हातात दोन बाळांना घेऊन येते. एकेकाला आपल्या आईकडे देते. वेळ रात्री दोनची होती. मग कांही हालचाल नव्हती.

तीन वाजतां दुसरं बाळ शीलाने आईकडून उचललं व सर्व मुलांना ठेवत तिकडे नेलं. साडेतीनला नीरजाचं मूलही तिने नेलं. त्यानंतर एक दोन वेळा अशीच दुसरी मूल आणली व नेली. ह्यांत संशयास्पद कांही नव्हतं. जिथे मुलांना ठेवत ती जागा वेगळ्या कॅमेऱ्याच्या क्षेत्रात होती. तिथून उचलून नेणं आणि आणणं त्या रात्री शीलानेच केलं होतं. त्या सगळ्या वेळा पहिल्या कॅमेऱ्यावरील हालचालींच्या वेळांशी जुळत होत्या. शीलाशीवाय कनिकाही त्यावेळी ड्यूटीवर होती. ती फक्त मूल ठेवत होते त्या भागातील एका खुर्चीवर बसून डुलक्या घेत होती. तिने एकदा फक्त सर्वांना नवीन टॅावेल दिले व जुने बालदीत टाकून बालदी वॅार्डबाहेर घेऊन गेली. बाळे होती त्या भागांत त्या वेळी कुणीच नव्हते. यशवंत चंदूला म्हणाले, “एक गोष्ट लक्षांत आली कां?” “चंदूने विचारले कोणती?” “एकूण मुलांची संख्या ह्यांत सहाच होत्येय. तिथे ठेवलेली मुलं आणि त्याच वेळी आईकडे दिलेली मुलं सहाच होत आहेत. सात स्त्रीया असून मुलं सहाच कशी? त्या अर्थी एक मुलं टॉवेल वगैरे गोळा करतात, त्या बालदीतून आधीच पळवण्यांत आलं असावं. नीरजाला पाजायला दिलेलं मुलं तिचं नसावं. झोपेत तिच्या लक्षांत आलं नाही. कांही बाळ कोणत्याही मातेला लगेच लुचतात.” यशवंत विचार करत म्हणाले, “चंदू, डॅाक्टर, मेट्रन, नर्सेस, इ. सर्वांच्यावर एजन्सीतर्फे पाळत ठेव. शक्य तो तू ही जा. दोन दिवसांत हालचाली, माहिती सर्व हवीय, म्हणावं.”

६.
चंदूकडे मिळालेल्या रिपोर्टसमधे विशेष कांही माहिती नव्हती. शीलाचं रूटीन होतं. नवरा, मुलं, संसारात बुडाली होती. नोकरी आणि संसार, ती भाजी मार्केट, हॅास्पिटल, घर, हेच करत होती. मेट्रन मेरीचंही रूटीन सेट होतं. संध्याकाळी एका चाळीशीच्या बाईला भेटली, ती तिची मैत्रीण असावी. बराच वेळ दोघी गप्पा मारत होत्या. बाकी घर आणि हॅास्पिटल. कनिकाचा मैत्रिणींचा मोठा गृपच होता. बराच वेळ कोण ना कोण बरोबर असे. सँड्राच्या नवऱ्याला नोकरी नव्हती आणि तो दोघांना कॅनडाला कसं जातां येईल, त्याची चौकशी करत होता. सफाई कामगार बाईच्या घरी माणसं जास्त आणि आवक कमी, अशी परिस्थिती होती. ती उरलेल्या वेळात एका लहान सोसायटीत घरकामं करीत होती. यशवंतानी सर्व रीपोर्टस वाचले आणि ते चंदूला म्हणाले, “चंदू, सँड्राचा नवरा कधीपासून कॅनडाला जायचे प्रयत्न करतोय, ती माहिती काढ. अजून कां गेला नाही, त्याचे कारण कळले पाहिजे. कनिकाच्या मैत्रिणीतील कोणाकडून कनिकाच्या आर्थिक परिस्थितीची माहिती काढ. मेरीच्या मैत्रीणीची माहिती काढ. जमल्यास तिच्याकडून मेरीची कांही माहिती मिळते कां पहा. पाळत चालूच राहू दे. दुसऱ्या दिवशीही रीपोर्ट तसेच होते. फक्त सँड्रा नवऱ्याबरोबर कॅनडाच्या एम्बॅसीच्या ॲाफिसमध्ये गेली होती. तिला नाईट शिफ्ट होती. मेरी कांही त्या मैत्रिणीला पुन्हा भेटायला गेली नव्हती.
७.
चंदूने मेरीच्या मैत्रीणीची माहिती मिळवली. दरवाजा वाजवला. मेरीच्या मैत्रीणीच नांव होतं हिरा सावंत. तिच्या आईने दार उघडले. चंदूने आपण मेरीच्या मैत्रिणीचा मित्र आहोत, असं सांगून प्रवेश मिळवला. आईला विचारले, “तुम्ही अजून काम करतां की काय?” आई म्हणाली, “नाय रे झिला, मी करायचो. खूप कामा केली. पूर्वी सुईणीक कामाची काय कमी? आतां लोकांना सुईणी नकोत.” चंदू म्हणाला, “आमचो इस्वास आसा आजी. सुईण आणि बाळाला मालिश करायला आम्हाला हवी आहे.” आई म्हणाली, “अरे, मी करत नाय पण माझी हिरा माझ्या परीस भारीच आहे. छान करता सर्व. आता खूप कामात आहे पण मधी कामा मिळत नसत.” चंदूने म्हातारीशी गोड बोलत, तिच्याकडून माहिती मिळवली ती अशी की. पंधरा दिवसांपूर्वी मेरीने तिला एक काम आणून दिले. त्या कामांत तिचे बाराहून अधिक तास जात होते. कुणा श्रीमंत माणसाकडे काम मिळाल्याने आगाऊ पैसेही मिळाले होते. अजून सहा महिने तरी काम कायम रहाणार होते. कोणाकडे कामाला जायची, कुठे जायची, ते मात्र आईला सांगता आलं नाही. चंदूने ते दुसऱ्या दिवशी शोधून काढलं. एका सोन्या चांदीचा व्यापार करणाऱ्या आणि सावकारी करणाऱ्या श्रीमंताच्या बायकोला हल्लीच मुलगा झाला होता. तिच्या मुलाचा जन्म घरीच झाला होता. आईला दूध नव्हतं. मुलं अशक्त होतं. त्याला दूध द्यायला एक बाई सुध्दा ठेवली होती.
८.
यशवंतांची खात्रीच झाली की त्या श्रीमंताघरी वाढणारं ते बाळच, कमलाबेनमधून गायब झालेलं बाळ असलं पाहिजे. त्यांनी म्युनिसिपालटीतील त्या श्रीमंताच्या बाळाच्या जन्माची नोंद पाहिली. नेमकी तीच वेळ, तीच तारीख दिली होती, जेव्हां नीरजाचं बाळंतपण झालं होतं. जन्म झाल्याचा दाखला एका सुईणीने दिला होता. ती सही होती हिरा सावंत हीची. आता हे नक्की झालं की मेट्रन मेरीनेच ते बाळ हॅास्पिटलमधून नेलं व त्या श्रीमंताघरी ठेवलं आणि हिराच्या मदतीने व पैशांच्या जोरावर तो श्रीमंत ते बाळ आपल्या घरी वाढवत आहे. आता हे सिध्द करायचे होते. यशवंतानी त्यासाठी मेरी आणि हिरा यांना संशयावरून पोलिसांनी ताब्यांत घ्यायला सांगितले. त्यांना बोलायला भाग पाडणं पोलिसांना सोप्प होतं. पण खरा गुन्हेगार तो मूल स्वीकारणारा, खोटी जन्मनोंद करणारा होता. मेरी आणि हिरा ह्यांच्या विधानांवरून त्याला खोटे कागदपत्र बनवणे, बेकायदेशीररीत्या दुसऱ्याचे मूल स्वीकारणे, इ. आरोपावरून अटक करायची होती पण तो नक्कीच मोठे वकील देऊन लढला असता. दुसरेच मूल घरी ठेऊन, ह्या मुलाला कांहीं अपाय करता. मग यशवंतानी खरी परिस्थिती उद्योगपतींना सांगितली. ते म्हणाले, “धुरंधर, तुम्ही माझे फार मोठे काम केले आहे. मी पहातो.” काय काय बोलणी झाली, कसे प्रश्न सुटले कुणास ठाऊक पण कमलाबेन हॅास्पिटलच्या पायऱ्यांवर ठेवलेले महिन्याच्या आंतले एक बाळ सुरक्षा रक्षकांना अचानक दिसले. प्रसूती विभागाच्या डॅाक्टरांनी जन्मखूणेवरून ते बाळ हे हॅास्पिटलमधूनच गायब झालेले बाळ हे ओळखले. नीरजानेही आपले बाळ ओळखले. मेट्रन मेरीने लवकरच राजीनामा दिला. हिरा सुटली. उद्योगपतींनी तक्रार मागे घेतली म्हणून पोलिसांनी बाळ गायब झाल्याची फाईल बंद केली. खरा गुन्हेगार सुटला. उद्योगपती म्हणाले, “धुरंधर, कांही गोष्टी कर्मावर सोडून द्यायच्या असतात. जेलपेक्षा वाईट दिवस येतील त्याच्या आयुष्यात. तुम्ही पहाच.” इकडे सरकारने एका ॲार्डरने मुंबईत ह्यापुढे जन्मनोंद करण्यासाठी सरकारी, म्युनिसिपल किंवा खाजगी हॅास्पिटलच्या डॅाक्टरचा दाखला आवश्यक असल्याचे जाहिर केले.

अरविंद खानोलकर
वि.सू. ह्या गोष्टीतील पात्रे, प्रसंग, इ. सर्व काल्पनिक आहेत. साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
अरविंद खानोलकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..