शोमन राज कपूर, ‘बाॅबी ‘ चित्रपटाची तयारी करीत होते. त्यांना नायिकेसाठी नवीन चेहरा हवा होता. अनेक मुलींमधून, दोन मुलींची निवड केली गेली. राज कपूर यांनी, सिमी गरेवालला दोघींपैकी कुणाची निवड करु? असा सल्ला विचारला. सिमीनं डिंपलची निवड केली, हीच डिंपल कपाडिया पुढे मोठी स्टार झाली. जिला सिमीनं नाकारलं, तिचं नाव होतं नीतू सिंग! राज कपूर यांच्या चित्रपटात जरी तिला ‘एंट्री’ मिळाली नसली तरी आठ वर्षांनी तिनं कपूर परिवारात ‘सून’ म्हणून प्रवेश केलाच.
नीतूचा जन्म १९५८ साली एका पंजाबी परिवारात दिल्लीमध्ये झाला. लहान वयातच तिचं पितृछत्र हरवलं. वयाच्या आठव्या वर्षापासून, तिनं धिटाईनं कॅमेऱ्याला तोंड दिलं. ‘सूरज’ चित्रपटात तिनं बालकलाकार म्हणून पहिल्यांदा काम केलं. नंतर ‘दस लाख’ चित्रपट केला. तिचं नाव झालं, ते ‘दो कलियाॅं’ चित्रपटापासून. त्यात तिचा डबल रोल होता. विश्वजीत व माला सिन्हाच्या जुळ्या मुलींचा तो रोल होता. कौटुंबिक भांडणामुळे विभक्त झालेल्या आई-वडिलांना पुन्हा एकत्र आणणाऱ्या, बेबी सोनियाच्या सर्वोत्तम अभिनयाचे चित्रपटसृष्टीत खूप कौतुक झाले.
त्यानंतर बेबी सोनियाने ‘वारिस’ चित्रपटात, जितेंद्र सोबत काम केले. जो पुढे दहा वर्षांनंतर ‘प्रियतमा’ चित्रपटात तोच, तिचा नायक झाला.
नायिका म्हणून तिचा पहिला चित्रपट होता, ‘रिक्शावाला’ तो काही फारसा चालला नाही. ‘यादों की बारात’ या मल्टीस्टार चित्रपटात तिच्यावर ‘लेकर हम दिवाना दिल.’ हे गाणं चित्रीत केले गेले. या गाण्यामुळे तिला प्रसिद्धी मिळाली व चित्रपट निर्मात्यांची तिच्यासाठी रांग लागली.
‘बाॅबी’ हुकल्यानंतर, नीतूला ऋषी कपूर सोबतचा पहिला चित्रपट मिळाला, तो म्हणजे ‘जहरिला इन्सान’ यामध्ये दोन नायिका होत्या. नीतू व मौसमी. इथपासून पुढे त्या दोघांचे एकत्र असे अकरा चित्रपट झाले.
‘दीवार’ चित्रपटात ती शशी कपूरची नायिका झाली. ‘अमर अकबर ॲन्थोनी’ चित्रपटाने ‘न भूतो न भविष्यती’ यश मिळविले. ‘परवरिश’ चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा मी अकरावीत होतो. पौगंडावस्थेतील मुलांना त्या वयात, साधी मुलगी देखील ‘अप्सरा’च भासते. माझंही वय तसंच होतं.. काॅलेज पूर्ण होईपर्यंत मी त्या दोघांचे सर्व चित्रपट, पुन्हा पुन्हा पाहिले. ‘दुनिया मेरी जेब में’, ‘धनदौलत’, ‘जिंदा दिल’, ‘झुठा कहीं का’, ‘रफूचक्कर’, ‘दुसरा आदमी’, ‘खेल खेल में’, ‘अंजाने में’ हे चित्रपट पहाताना, पडद्यावरचं आपल्या जीवनात, ‘सत्या’त उतरावं असं अनेकदा वाटायचं. मात्र पडदा, हा तीन तास करमणुकीचा एक ‘भास’ असतो हे कळायला जीवनातील अनेक वर्षे खर्ची पडली.
२२ जानेवारी १९८० साली ऋषी कपूर व नीतूचं लग्न झालं आणि तिनं चित्रपट संन्यास घेतला. जे चित्रपट साईन केले होते, ते प्रदर्शित व्हायला ८३ साल उजाडलं.
नीतू जीवनात आल्यापासून ऋषी कपूरची सिने कारकिर्द बहरली. त्यानं असंख्य चित्रपटांतून विविध भूमिका केल्या. नीतूला पहिली मुलगी व नंतर मुलगा, रणबीर झाला. रणबीरने शिक्षणानंतर, संजय लिला भन्साळी यांच्या हाताखाली काम केले. नंतर चित्रपटात काम करु लागला.
२६ वर्षांनंतर नीतूने ‘साडी लव्ह स्टोरी’ मध्ये काम केले. ‘बेशरम’ चित्रपटात ऋषी कपूर व नीतू दोघांनीही रणबीर बरोबर काम केले आहे. ऋषी कपूर अलीकडे तब्येतीने वडिलांसारखा सुटलेला होता. २०१८ साली त्याचं कर्करोगाचं, निदान झालं. परदेशात जाऊन उपचार केले. मात्र उपयोग झाला नाही. ३० एप्रिल २०२० रोजी, तो मार्गस्थ झाला.
गेल्याच महिन्यात रणबीरचं, आलिया भट्टशी लग्न झालं. आता नीतू, मुलीच्या मुलांची आजी झालेलीच आहे. लवकरच रणबीरच्या मुलांचीही आजी होईल. त्यांच्यामध्ये ती आपली ‘बेबी सोनिया’ शोधत राहील. आणि गुणगुणेल. ‘बच्चे, मन के सच्चे. सारी जग के, आँख के तारे. ये वो नन्हे फूल है, जो भगवान को लगते प्यारे.’
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
६-६-२२.
Leave a Reply