तुम्ही साहेब (अधिकारी) असाल तर कशा प्रकारचे साहेब आहात? चांगले की वाईट? जसे तुम्ही तुमच्या स्टाफला पारखत असता तसेच तुमचा स्टाफही तुम्हाला जोखत असतो. तुमचा स्टाफ तुमचा सी. आर. लिहू शकणार नाही. म्हणून काय झाले? बॅड बॉस म्हणून एकदा नाव झाले की मग गूड बॉस होणे फार फार कठीण. गूड बॉसचाही क्वचित एखाद्या प्रसंगामुळे क्षणात बॅड बॉसही होऊ शकतो. एकदा कानफाट्या नाव पडले की पडलेच. अधिकारी असाल/ झालात की अत्यंत सावध/ सावधानपणे वागणे हेच श्रेयस्कर ! गुड बॉस होण्यातले फायदेही बरेच आहेत.
बॅड बॉस कसा असतो/ वागतो? ….
तो खत्रूड अन् खडूसपणे वागतो. तो वशिल्याचे तट्टू असेल. एकदम अधिकारी (D.R.) म्हणून त्याने प्रवेश केला असेल तर त्याला स्टाफचे प्रश्न माहिती असण्याची शक्यता कमी. ते त्याने जाणून घ्यायचे असतात. त्यांचे प्रश्न यथाशक्ती/यथामती सोडवायचेही असतात. पण होतो कधीच सोडवत नाही.
तो स्टाफला सतत त्याच्या कॅबिनमध्ये बोलावतो. त्याला काहीच येत नसते, शिकूनही घ्यायचे नसते. त्याला स्टाफवर ओरडणे एवढेच माहिती असते. सर्व स्टाफला त्याने समान वागणूक द्यायला हवी, निदान तसे दाखवायला तरी हवे. हेच…नेमके तेच त्याच्याकडून होत नाही.. तो स्टाफवर विश्वास ठेवत नाही.
तो सतत करवादत असतो, कटकट करीत असतो. त्याचे त्याच्या स्टाफवर बारीक लक्ष असते. स्टाफकडे कोण/ कधी येतेय? ते चहाला किती वेळा जातात/ घेतात? तो स्टाफला गुलाम समजत असतो. थोडेही स्वातंत्र्य स्टाफला द्यायची त्याची तयार नसते. तो त्यांना त्याची स्वतःची व्यक्तिगत कामे सांगतो. तो मोबाइल असूनही कचेरीच्या फोनचा व्यक्तिगत कामांसाठी उपयोग करत असतो.
तो स्वतः कधीच स्टाफला कार्यालयाच्या खर्चातही, त्याला शक्य असूनसुद्धा चहा-बिस्किटे देत नाही.
पण स्टाफपैकी कुणाकडेही थोडेही काही चांगले झाले असेल तर पार्टी मागतो. स्टाफही नाइलाजाने ती देत असतो. स्वतः उशिरा येतो. लौकर जातो. पण त्याच्या स्टाफला मात्र ती सवलत द्यायला खळखळ करतो. तो जेव्हा लौकर येतो. तेव्हा मस्टर कॅबीनमध्ये मागवितो.
तो फाडफाड टाकून बोलतो पण सी. आर. चांगले देतो. तो गोड बोलतो पण सी. आर. वाईट देतो (मूह में राम बगलमें छुरी) हे दोन्ही प्रकारचे बॉसेस बॅड बॉसेसच.
तो कार्यालयाच्या वेळात इतर कामे करतो… धर्मा, सोसायटीचे वगैरे… त्यातून वेळ मिळाला तर कार्यालयाचा चांगल्या कामाचे श्रेय तो घेतो. वाईट कामांचे, चुकांचे श्रेय तो कर्मचाऱ्यांना घेतो. त्याच्या चेहऱ्यावर कधीही एखादीसुद्धा स्मित रेषा नसते. येणारे ग्राहक, आपले कर्मचारी एकजातच चोर आहेत ही भावना त्याच्या मनात असते. तो गोंधळलेला असतो. संशयकल्लोळ त्याच्या मनात उठलेला असतो.
धर्म, जात, लिंग यांचा विचार तो करतो. स्त्रियांना सवलत देताना त्यांचे थोडेफार लैंगिक शोषण तो अवश्य करतो. कर्मचाऱ्यांनी ताबडतोबीचे काम उशिरा बसून वा घरी नेऊन करावे ही त्याची अपेक्षा असते पण त्यासाठी तो कुठलीही सवलत, ओव्हर टाईम वा काँपेंसेटरी ऑफ मात्र देत नाही. तो महिला कर्मचाऱ्यांना कारणाशिवाय कॅबिनमध्ये बोलावितो. त्याच्याकडे वेळ भरपूर असतोच. त्यांना बोलावून तो मस्तपैकी टाईमपास करतो. स्त्रियांच्या मुखदर्शनाचाही त्याला लाभ मिळतो तो वेगळाच. आपल्या जातीतल्या, धर्मातील लोकांना तो काम कमी देतो, त्यांना सांभाळून घेतो…इतरांना मात्र नाही. ती महिला असेल तर पुरुष कर्मचाऱ्यांना त्रास देते !… एक दोघाच्या बाबतीत मात्र तिला सॉफ्ट कॉर्नर असतो. ती महिला असूनही महिला कर्मचाऱ्यांविषयी तिला सहानुभूती नसते. ती वाममार्गानी बॉस झाली असेल तर तिला इतर सुंदर स्त्री कर्मचाऱ्यांविषयी प्रचंड संशय/ भयगंड असतो. तिचा गॉडफादर गेला की ती उघड्यावर पडते. बावचळते, सैरभैर होते. तिचा एंटरटेनमेंट अलाऊन्स ती कचेरीच्या कामाकरता न वापरता वैयक्तिक स्वार्थासाठी वापरते. तिचे कामापेक्षा जास्त लक्ष आरशाकडे असते. पावडर, लाली, लिपस्टिक यांचा ती वयाला न शोभेल इतका वापर करते.
– मनोहर जोगळेकर,
मुंबई.
Leave a Reply