ओनली थिंग कॉस्टंट इंन धिस वर्ल्ड इज चेंज, असं एक इंग्रजी वचन आहे. जगात कायमस्वरुपी टिकून राहणारी एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे बदल, असा या वचनाचा अर्थ! थोडक्यात जगात कायमस्वरुपी टिकून राहणारं काहीच नसतं, प्रत्येक गोष्ट बदलतच राहते. अवतीभवती कुठेही नजर टाकली की सर्वच गोष्टी कशा बदलतात याचं प्रत्यंतर आपल्याला येतं. काही गोष्टी एवढ्या बदलतात की कालांतराने त्या ओळखता देखील येत नाहीत. हीच ती पूर्वीची गोष्ट हे ध्यानात आल्यानंतर आपण अक्षरशः आश्चर्यचकित होऊन जातो. अगदी न ओळखण्यइतपत ही गोष्ट कशी काय बदलली याचं आपल्याला राहून राहून आश्चर्य वाटू लागतं. त्यावेळी कालाय तस्मै मनः म्हणून आपण तो बदल स्वीकारतो. जगात चिरकालीन असं काहीच नसतं याची आपल्याला प्रचिती येते.
ही बदलाची प्रक्रिया सतत सुरुच असते. माणसांच शरीर बदलतं, राहणीमान बदलतं, सभोवतालचं वातावरण देखील बदलतं. सध्या मुंबईत सर्व ठिकाणी नवी बांधकामं उभी राहात असल्याचं चित्र दिसतं. कुठेही नजर टाकली की एखादी जुनी इमारत पाडून त्याजागी भली मोठी नवी इमारत उभी राहात असल्यचं आपल्याला पहायला मिळतं.
मोडकळीस आलेल्या जुन्या चाळी आता जमीनदोस्त होत आहेत. या चाळींच्या जागी भव्यदिव्य इमारती आकार घेत आहेत. खुराडेवजा खोल्यांतले संसार आता विस्मृतीत जात आहेत. एक बेडरुम, दोन बेडरुम अगदी तीन बेडरुमचेही फ्लॅटसही मुंबईकरांच्या आवाक्यात आले आहेत. या प्रशस्त फ्लॅटमध्ये देखणे संसार थाटले जात आहेत. चाळ संस्कृतीच्या जागी फ्लॅटसंस्कृती उदयाला आली आहे. मुंबईकरांच्या सामाजिक जीवनात या बदलाचा प्रभाव जाणवतो आहे.
मुंबईचे रस्तेही आता कात टाकत आहेत. एकेकाळी मुंबईत अगदी मध्यम मार्गावरुन ट्राम धावत असे. रेल्वेसारखी दोन रुळांवरुन धावणारी ही ट्राम कशी होती याची नव्या पिढीला कल्पनाही नसेल. दोन रुळांवरुन संथपणे जाणारी ट्राम मुंबईचे रस्ते मधूनच कापत जात असे. या ट्राममध्ये विशिष्ट किणकिणाट करणारी घंटाही असे. किंग्जसर्कल, दादर, परळ, भायखळा, ग्रान्टरोड, गिरगाव, म्युझियम अशी या ट्राम्सची मुख्य स्टेशन्स होती. दादर टी.टी., परल टी.टी. अशी या स्टेशन्सची नावे होती. टी.टी.म्हणजे ट्राम टर्मिनस या टर्मिनसमध्ये ट्राम एका ट्रॅकवरुन दुसऱ्या ट्रॅकवर जाऊन मागे वळे. पुढे मुंबई शहराचा वेग वाढला. या वेगाशी जुळवून घेणे ट्रामआजींना झेपणारे नव्हते. म्हणून या आजीबाईंची मुंबईमधून उचलबांगडी करण्यात आली. मुंबईतून ट्राम्स हटवल्या गेल्या. ट्रॅम्सचे ट्रॅक्स उखडले गेले. ट्रॅक्सच्या जागी नवी वाहने वेगाने धावू लागली. मुंबई शहराने एक मोठा बदल आपलासा केला.
आता या ट्रामच्या ट्रॅक्सच्या जागी मोठाले पूल उभारण्यात येत आहेत. मुंबईत नाक्यनाक्यावर सिग्नल्स आहेत. या सिग्नलमुळे ट्रॅफिक खोळंबतो. वाहनांची संख्या प्रतिवर्षी वाढतच असते. पूर्वी पावसाळ्यात रस्त्यात खड्डे पडत. त्यामुळे ट्रॅफिक मंदावे, आता सिमेंटचे रस्ते झाल्याने ती समस्या सुटली. मात्र वाहनांची संख्या वाढल्याने वेगावर मर्यादा आलीच. यावर उपाय म्हणून ठिकठिकाणी मोठमोठे पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. या पूलांवरुन आता वाहने अधिक वेगाने धावतील. मुंबईत आजवर पूर्व पश्चिम जोडणारी रेल्वे नव्हती. तशी मोनोरेलही आता आकार घेत आहे. या मोनोरेलमुळे पश्चिमेकडील उपनगरे पूर्वेकडील उपनगरांना जोडली जातील. याशिवाय वांद्रे सिलिंकचा प्रकल्प वाहनांना वरदायी ठरला आहे. थोडक्यात आता मुंबई अधिक वेगाने धावणार आहे.
मुंबईतील शिक्षणपद्धतीतही गेल्या काही दशकात आमूलाग्र बदल होत गेले. एकेकाळी इंग्रजी माध्यमाची शाळा म्हंटली की मिशनऱ्यांनी चालवलेली कॉन्व्हेंट असं समीकरण होतं. मराठी माध्यमाच्या शाळा अस्सल मराठीपण राखून शिक्षण देत. नंतर आपल्या समाजात नोकरी व्यवसायासाठी इंग्रजीवरचं प्रभूत्व अपरिहार्य असल्याचं सर्वांच्या ध्यानात आलं. इंग्रजी कच्च राहिल्याने महाराष्ट्रीय मुलं विद्वत्ता असूनही मागे पडतात हे ध्यानात आल्यावर मराठी माध्यमाच्या शाळांनीही इंग्रजी माध्यमाचे वेगळे वर्ग सुरु केले. हा बदल पचनी पडत असतानाच इंटरनॅशनल स्कूलचं पेव फुटलं. केवळ इंग्रजी माध्यमच नव्हे तर पाल्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण देण्यासाठी या आधुनिक शाळा सिद्ध झाल्या. या शाळांची फी लाखांच्या घरातली. हाही बदल आपण आनंदाने स्वीकारला. इंटरनॅशनल स्कूल्सना आपल्या समाजात सहजरित्या बस्तान बसवता आलं.
मॉल संस्कृतीने घडविलेला बदल हाही असाच नजरेत भरणारा. कधीकाळी कोपऱ्यावरचा वाणी घरसामानाची तरतूद भागवी. त्यानंतर मोजक्याच ठिकाणी अपना बाजार सारखी सुपरमार्केटस उभी राहिली. सर्व सामान खरेदी करुन ते एका गाडीतून ढकलत कॅश काऊंटरपर्यंत नेणं, तिथे सर्व सामानांचं बिल भरणं वगैरे प्रकार आपल्या अंगवळणी पडला. त्यानंतर उभी राहिली भव्य मॉल्स ! अपना बाजारच्या दसपट मोठी असलेली मॉल्स पाहून मुंबई अचंबित झाली. रविवारचा दिवस मॉलमध्ये जाण्यासाठी राखून ठेवण्याची प्रथा पडली. या मॉल्समध्ये केवळ घरसामानच नव्हे तर हरतऱ्हेची वस्तू उपलब्ध असते. शर्टसपासून चादरीपर्यंत, बूटांपासून सूटांपर्यंत आणि लिपस्टिकपासून पंजाबी ड्रेसपर्यंत हवं ते इथे मिळतं. खरेदीचा थकवा घालवण्यासाठी रेस्टॉरन्टस असतात. या रेस्टॉरन्टस मध्येही इडलीपासून छोले भटुरेपर्यंत आणि पिझापासून आईस्क्रीमपर्यंत सर्व काही मिळतं. काही मॉल्समध्ये चित्रपटगृहेही अंतर्भूत असतात. एका वेगळयाच विश्वात रमण्याची सोय मॉल्स पुरवतात.
आघाडीच्या नायकनायिकांचे जुने चित्रपट पाहताना त्यांच्या रंगरुपात झालेला बदल आपल्या डोळ्यात ठसतो. निवृत्तीकडे वळलेल्या नायक नायिकांचे जुन्या चित्रपटातले चेहरे आणि त्यांचं आत्ताचं रुप यात जमीन आस्मानाचा फरक आढळतो. एकेकाळी रसिकांच्या मनावर आपल्या सौंदर्याची मोहिनी घालणारी एक अभिनेत्री आता स्वतःचा वयस्क चेहरा कुणाला दिसू नये म्हणून विजनवासात गेली असल्याचं म्हटलं जातं. घरातले फॅमिली आल्बम पाहाताना आपलेच बदलले चेहरे पाहणं मजेशीर असतं. हा कसा दिसत होता आणि तो किती बारीक होता असल्या शेऱ्यांसह ते जुने आल्बम पाहणं हा एक विरंगुळाच असतो. अर्थात कधी कधी आपण आता वार्धक्याकडे झुकतो आहोत ही भावना आपल्याला अंतर्मुख करुन जाते हेही तितकंच खरं.
वयोमानाप्रमाणे स्वतःच्या स्वभावात होणारा बदलही अनेकदा आपल्या ध्यानात येतो. बालवयातील अल्लडता, तरुणाईतील उत्साह नंतर वेगळंच रुप धारण करतात. जीवनाकडे अलिप्तपणे पाहण्याचा अपरिचित सूर आपल्या मनात मुक्कामाला येतो. एखाद्या घटनेबद्दल झणझणीत प्रतिक्रिया देण्याचं आपण टाळतो. कुणाला रागाने चार शब्द बोलण्याऐवजी त्रयस्तपणे वास्तव स्वीकारण्याकडे कल झुकू लागतो. चारचौघात हमरीतुमरीवर येऊन वाद घालण्यात आपल्याला स्वारस्य उरत नाही. मुख्य म्हणजे आपण हे असे बदलत आहोत हे देखील आपल्याला प्रकर्षाने जाणवत राहतं. भोवताली घडणाऱ्या बदलांपेक्षा या स्वभावातील बदलांची नोंद आपण मूकपणे अनुभवतो.
ओनली थिंग कॉन्स्टन्ट इन धिस वर्ल्ड इज चेंज हे वचन आपल्या मनावर खऱ्या अर्थाने कोरलं जातं.
– सुनील रेगे
Leave a Reply