नवीन लेखन...

बदल आणि बदलणे

अनादीकालापासून आपण ऐकत आलोय, ते म्हणजे बदल हा सृष्टीचा नियम आहे. कुणी सांगितलय हे. खरच सृष्टी बदललीय का हो? सूर्य आधी जसा उगवत होता, तसाच आजही उगवतो, मावळतो. चंद्राचे ही तसेच आहे. पृथ्वीचे फिरणे तसेच आहे, पाऊस येतो, उन्हाळा, हिवाळाही येतो. मग सृष्टी कशी बदलली. तिच्यात काही बदल झालेत हे जरी मान्य केले तरी त्यात मानवी हस्तक्षेपाची टक्केवारी किती होती हे देखील तपासले पाहिजे ना. माणसात मात्र आमूलाग्र बदल झालेत. त्याच्या आदीम अवस्थेपासून ते आधुनिकावस्थेपर्यंत. त्याच्या बदलण्याच्या प्रवाहामुळे सृष्टीतही बदल होत गेलेत, झालेत. बदलणे शेवटी काय आहे? आपल्या आहे त्या अवस्थेपासून दुसऱ्या अवस्थेत जाणे, नवी परिस्थिती स्वीकारणे किंवा स्वीकारायला कुणीतरी भाग पाडणे हा झाला बदल. मग आपण काय स्वीकारले, काय बदलले आपल्या वर्तनात.

आधुनिक होताना आपल्यात अनेक बदल झालेत. पण ते ध्यानात आले आहेत का? की आपल्या सवयीचा भाग झालेत. आपण पूर्वी सारखे संवेदनशील आहोत का? पूर्वी इतकाच निखळ आनंद आपण मिळवू शकतो काय? पूर्वी इतकाच आपला सहभाग सार्वजनिक उपक्रमात असतो का? जबाबदारी स्वीकारण्यात आपला पुढाकार असतो का? आपल्या अवती-भवती अनेक घटना घडामोडी घडत असतात, त्या पाहून ‘मला काय त्याचे’ ही वृत्ती बळावतेय ना? या सारखे अनेक बदल आपल्यात झालेले आहेत, ते लक्षात आले नाहीत हा भाग वेगळा. काही वेळा असे होते सत्ता आली की माणुस बदलतो, गर्व झाला की माणुस बदलतो, अहंकार आला की माणुस बदलतो, पैसा आला की माणुस बदलतो एव्हढेच नव्हे तर लग्न झालं की मुलगा बदलतो असे आईलाही वाटते…! हे खरे आहे ना? मग हे चांगले की वाईट…! चांगल्या गोष्टींसाठी बदलणे चांगले. वाईट गोष्टींसाठी बदलणे वाईटच. चांगल्या आणि वाईटाचा फरक लक्षात घेणे देखील महत्वाचे ठरते.

बदल दोन प्रकारचे असतात. एक बाह्य, दुसरा आतला. बाह्य बदल चटकन होतो. कारण तो कुणी लादलेला असतो, दिलेला असतो. आतला बदल व्हायला कालावधी जावा लागतो किंवा एखादा स्पर्शणारा प्रसंग घडला तर हा बदल होता. बाह्य बदलात आपला फारसा सहभाग असतोच असे नाही. काहीवेळा इतरांच्या सांगण्यावरून आपण हा बदल स्वीकारत असतो. जसे घरात आई-वडील आपल्याला संस्कार देत असतात, ते आपण स्वीकारतो. मित्र-मंडळी चांगल्या-वाईट गोष्टी सांगत असतात त्या आपण स्वीकारतो. शाळेत गुरूजी काही सवयी सांगतात. मोठ्यांचा आदर करावा, अदबीने बोलावे, देवाला नमस्कार करावा, चांगले वर्तन ठेवावे वैगरे वैगरे. आपल्याला ते पटते म्हणून आपण ते स्वीकारतो. अंगीकारतो. तसे वागू लागतो.

आतला बदल मात्र थोडा कठीण असतो तो व्हायला काहीतरी घडावे लागते. किंवा आतली जागृती तरी यावी लागते. जसे नारदाने वाल्या कोळीला उपदेश केला आणि त्याचा वाल्मिकी झाला, महात्मा गांधीना रेल्वेच्या डब्यातून बाहेर फेकले आणि त्यांच्यांत आंतरिक बदल झाला. रस्त्याच्या कडेला पडलेल्या कृष्ठरोग्याला पाहून बाबा आमटेंच्या अंतरात बदल झाला. अशी कितीतरी माणसे आपल्या अवती भोवती आहेत ज्यांच्यात आंतरिक बदल झाला आणि त्यांनी इतिहास घडवला. बदल आणि बदलणे यातला हा सुक्ष्म फरक लक्षात घेतला पाहिजे. जे चांगले, ते स्वीकारले पाहिजे, चांगले बदल व्हावेत यासाठी बदलले पाहिजे, नाही का….!

दिनेश दीक्षित, जळगाव (९४०४९५५२४५)

Avatar
About दिनेश रामप्रसाद दीक्षित 46 Articles
मी जळगाव येथे वास्तव्यास असतो. जळगाव येथे गेल्या २५ वर्षापासून मी पत्रकारितेत कार्य करत आहे. दहा वर्ष मु. जे. महाविद्यालयाच्या जर्नालिझम डिपार्टमेंटमध्ये गेस्ट लेक्चर घेतले आहेत. मला सामाजिक कार्यात भाग घेण्याची आवड आहे. तसेच तरुण मुलांशी संवाद साधुन त्यांना चांगल्या गोेष्टी सांगण्याचा प्रयत्न करणे आवडते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..