मित्रांनो, आज आपल्या आयुष्यातल्या अनेक गोष्टी बदलून गेल्यायत. आपलं रहाणीमान, आवडी निवडी, आपली मानसिकता, आनंदाच्या व्याख्या सगळं सगळंच खूप बदलून गेलंय. कारण काय? तर आम्हाला आजच्या युगाबरोबर चालायचंय ना ! पूर्वी अगदी नेमाने करत असलेल्या अनेक गोष्टी आज आपल्याकडून दुर्लक्षित केल्या जाऊ लागल्यायत, किंवा असु दे ! जाऊ दे ! ठीक आहे, चालतंय ! असा दृष्टिकोन निर्माण होऊ लागलाय. पूर्वी घराच्या अगदी बाहेर काढल्या जाणाऱ्या बूट चपला आज सहजपणे घराच्या आत येऊ लागल्यायत, आणि गंमत म्हणजे त्याचं कुणाला काही विशेष वाटेनासंही झालय.
अगदी सकाळी झोपून उठल्यापासून विचार करायचा म्हटलं तर उठल्यानंतर शेजारच्या घड्याळाकडे जाणारे किंवा देवासमोर जोडले जाणारे हात आज मोबाईल कडे जाऊ लागलेयत. या दोघांची जागा त्याने कधीच बळकावलीय. त्यानंतर, ब्रश करताना मोरीत किंवा बेसिन समोर उभं राहूनच आपण ते करत होतो. आज ब्रशवर पेस्ट घेऊन आणि गॅलरीत उभं राहून ते ओंगळवाणं आणि ओघळणार दृष्य साऱ्या जगाला दाखवत अनेकजण ब्रश करत असतात. मी तर एकदा एक माणूस रस्त्यातून ब्रश करत चाललेला पहिला होता. (खरच सांगतोय ) पूर्वी बघा, म्हणजे आठवतंय का बघा, आपण धुतलेले कपडे घरातच वाळत घालत होतो. आठवलं? हं, तर आज अनेक इमारतीमध्ये आवारात दोऱ्या बांधून त्यावर बाहेरचे आतले सगळे कपडे पताका लावल्यासारखे वाळत घातलेले दिसतात. बाहेरून येणाऱ्या लोकांना काय वाटेल याचं कुणाला जराही काही वाटत नाही. तसेही प्रत्येकाच्या गॅलरी बाहेर कपडे लटकत असतातच म्हणा. आमच्या लहानपणी घरात काही चांगलं घडलं की जेवणात काही गोड पकवान्न केलं जायचं. पाहुण्यांना किंवा कौटुंबिक मित्रांना पार्टी द्यायची असली की घरी जेवायला बोलावून मस्त मेजवानीचा बेत केला जायचा. यामागे उद्देश असायचा तो जेवणाबरोबर मनसोक्त गप्पा मारण्याचा आणि नाती, ओळखी अजुन घट्ट करण्याचा. मनसोक्त जेवून आणि गप्पा हाणून पाहुणे, मित्रमंडळी आनंदात परतायची. या मेजवानीसाठी स्वयंपाकगृह मोठी प्रशस्त असायची असंही नाही. तरीही सगळं साग्रसंगीत बनायचं कारण, जागा लहान असल्या तरी मनं बदललेली नव्हती, माणूसघाणी झालेली नव्हती. आपल्याकडे सगळ्यांनी यावं ही मनापासून इच्छा असायची. अगदी अचानक कुणी अतिथी म्हणून आला तरी यजमानाच्या, त्याहीपेक्षा यजमानीणीच्या चेहऱ्यावरही खऱ्या आनंदाचे भावच प्रकट व्हायचे. त्या भावांची जागा आठ्यांनी घेतलेली नव्हती. आज हे होतंच नाही. आधी कळवल्याशिवाय कुणाकडे जाण्याची कुणाची हिम्मतच होत नाही, आणि दुसरं म्हणजे घरी जावंच लागत नाही कारण घरांत होणाऱ्या मेजवानीची जागा उपहारगृहानी…. सॉरी बार अँड रेस्टॉरंटनी घेतलीय. आजच्या आणि काही प्रमाणात आमच्या कालच्याही पिढीला घरगुती, चविष्ट, स्वादिष्ट पदार्थांपेक्षा हॉटेलच्या चटकदार, चमचमीत पदार्थांची चव भारी वाटू लागलीय. अहो, लग्नातल्या पंगतीची, प्रेमळ आग्रहाची जागा स्वेच्छा भोजन या गोंडस नावाने buffet (हवं तर घ्या) घेऊन काळ लोटलाय. काही लोकं उत्साहाने ठेवतात पंगत वगैरे आणि आठवणीतले पदार्थही कौतुकाने ठेवतात. परिणाम काय होतो, तर मुलं म्हणतात, “काय बंडल आणि बकवाज जेवण होतं अरे, पनीरचं काही नाही, चायनीज नाही आणि चाट सुद्धा नाही. मला नाही आवडलं.”
आता हे झालं जेवणाचं. लहानपणी अभ्यासाला बसताना एक तर टेबलासमोर लाकडाच्या कडक खुर्चीवर बसायचं किंवा जमिनीवर बसायचं. अभ्यास ताठ बसून करायचा ही शिस्त होती. आता घरात स्टडी रूम असते, सगळा सरंजाम असतो पण मुलं मात्र अभ्यासाला बसतात बेडवर, तिथेच लुडकतात, डोळ्यांसमोर पुस्तक असतं आणि अर्ध शरीर झोपलेल्या स्थितीत असतं. काय सांगणार? आणि कोण ऐकणार सांगा?
पूर्वी (सारखं आमच्या लहानपणी म्हणून कंटाळा आला ) सणासुदीला कपड्यांची खरेदी व्हायची. त्यामुळे त्यांचं अप्रूप फार असायचं. नव्या कपड्यांवर हळुवार हात फिरवायचा, शेजाऱ्या पाजाऱ्यांना कौतुकाने दाखवायचे आणि सणाच्या दिवशी अंगावर चढवायचे. आज मात्र हे सगळंच बदलून गेलंय, कारण काही ना काही कारणाने वर्षभर खरेदी सुरूच असते. त्या कपड्यांचा आनंद, कौतुक, अप्रूप काहीच जाणवत नाही. ते अंगावर कसेही चढतात आणि काढल्यावर कसेही, कुठेही पडतात. बरं, पूर्वी या खरेदीच्या जागा, दुकानं ठरलेली होती, दुकानदार ओळखीचे असायचे, त्यामुळे पैसे जाऊन चांगलंच खरेदी व्हायचं. आज मोठमोठ्या मॉल मधून, भरमसाठ पैसे खर्चून, ब्रँडेड कपड्यांचीही गॅरेंटी मात्र काहीच नसते.
आमच्या अगदी एका खोलीत देवाघरांला व्यवस्थित जागा होती. वडिलांनी नवीन घर घेतलं तेव्हा फर्निचर करताना सर्वप्रथम देवघराची लहानशी खोलीच बनवून घेतली. आज सगळं फर्निचर बनल्यावर एखाद्या कोपऱ्यात कुठेतरी देवाला त्याच्या घरासाठी जागा मिळते. बरं ते लहान की मोठं असावं हा मुद्दाच नाही पण नियमितपणे रोजची पाच मिनिटंही नमस्कारासाठी त्याच्यासमोर उभं राहायला कुणाला वेळ नसतो? मग शुभंकरोति म्हणणं दूरच राहिलं. या सुंदर गोष्टी आउटडेटेड झाल्यायत आज. धूळ खात पडलेल्या देवघरात एक दिवाही लावायला कुणाला वेळ नसतो. घरभर दिव्यांच्या झगमगाट असतो पण देवाचं घर मात्र काळोखात असतं. हे सगळं सांगायलाही कुणी नसतं कारण घरातल्या ज्येष्ठाची अडगळ वृदद्धाश्रमात जाऊन विसावलेली असतें, किंवा आपण अडगळीपासून वेगळे रहात असतो. उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाला जाऊन करायची धमाल आता रिसॉर्ट, हिल्स्टेशन्सना होत असते.
कधी कधी मनात येतं, या सगळ्या नको त्या बदलांमुळेच आजची पिढीही आपल्या आयुष्यातील साथीदाराच्या जागाही चटकन बदलायला लागलीय की काय?
नको त्या गोष्टी, नको ते बदल आपण किती चटकन स्वीकारतो नाही ? बदल हे व्हायलाच हवेत, बदलांमुळे तर प्रगती होत असते. अनेक नवीन गोष्टी कळतात, शिकायला मिळतात, अंगवळणी पडतात. फक्त आपण काय बदलतोय, बदलल्या जागी काय आणि कुणाला बसवतोय आणि या बदलांनी नेमकं काय मिळवतोय हे बदल अंगीकारताना मात्र जाणून घ्यायला हवं.
केशवसुतांनी तुतारी कवितेत म्हटल्याप्रमाणे,
“जुने जाऊद्या मारणालागुनी, जाळुनी किंवा पुरुनी टाका.”
जुन्यातलं जे वाईट आहे, जुलमी आहे, नको त्या रूढी परंपरानी घेरलेलं आहे, ते निश्चितच बदलायला हवं. पण हे सगळं बदलत असतानाच आपण आपल्यातला माणूस आणि माणुसकी यापासूनही दुरावून बदलत चाललोय का?आणि त्या जागी दुसरं रूप उभं रहातंय का? हे ही एकदा तपासायला हवं इतकंच.
प्रासादिक म्हणे,
–प्रसाद कुळकर्णी.
Leave a Reply