नवीन लेखन...

बधिर शांतता

मुंबईत बोरिवली पश्चिमेला राहणाऱ्या माझ्यासारख्या असंख्य सिनेमाभक्तांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय म्हणजे एकेकाळी फुलांनी सजवलेला हाऊसफुल्लचा बोर्ड दिमाखात मिरवणारी आमची चित्रमंदिरे म्हणजेच अजंठा, डायमंड आणि जया सिनेमा ह्यावर काहीतरी लिहूया असा विचार गेले अनेक महिने डोक्यात फिरत होता. मात्र त्या लिखाणासाठी कुठलीच मूलभूत आणि जुजबी माहिती ना माझ्याजवळ होती ना गूगलबाबांकडेदेखील. नुकताच बोरिवलीला जाण्याचा योग जुळून आला होता. ह्याखेपेला काहीही झालं तरी ह्या तीनही चित्रमंदिरांना वेळातवेळ काढून भेट द्यायचीच आणि तेव्हा मिळेल तशी, मिळेल त्याच्याकडून माहिती मिळवून आपली अपूर्ण इच्छा आपण स्वतःच पूर्ण करायची असा पण केला होता.

रविवारी सकाळी मस्तपैकी अंघोळ करून, चहा-नाश्ता आटपून रिक्षा पकडली आणि थेट जया सिनेमा गाठलं. घड्याळात सुमारे पावणे अकरा वाजले होते. जया सिनेमाचे दरवाजे उघडलेले होते खरे, मात्र मी जेव्हा आत जाऊन आजूबाजूला बघितले तेव्हा मला फक्त एक मांजर दिसलं, बाकी कोणीही तिकडे हजर नव्हतं. बाहेर येऊन तिथल्या पानवाल्याला विचारल्यावर समजलं की जरी रविवार असला तरी सध्या थिएटरची देखभाल करणारा मॅनेजर कामावर येतो. अर्धा तास थांबूनदेखील मॅनेजर आला नाही तेव्हा मी तिकडून रिकाम्या हाताने परत निघालो. त्यानंतर मी अजंठा सिनेमा गाठलं. मध्यंतरी अनेक वर्ष थिएटर बंद ठेवल्यावर मूळ थिएटरची इमारत जमीनदोस्त करून त्या जागी नूतनीकरण केल्यावर आज मोठा शॉपिंग मॉल उभा आहे. त्याच इमारतीत चौथ्या मजल्यावर अजंठा सिनेमा नावाने पुन्हा एकदा दिमाखात आलिशान सिंगल स्क्रीन थिएटर सुरु आहे. शाहरुख खानचा डंकी सिनेमाचा मॅटिनी शो नुकताच सुरु झाला होता त्यामुळे परिसरात अजिबातच गर्दी नव्हती. आता लिफ्टने चौथ्या मजल्यावर जाऊन तिथे उपस्थित असलेल्या मॅनेजरकडून काही माहिती मिळतेय का ते पाहूया असा विचार करत करत लिफ्टपाशी पोहोचलो.

“साहब, टिकट किधर है?” लिफ्टच्याजवळ उभ्या असलेल्या डोअरकिपरने मख्ख चेहेऱ्याने मला प्रश्न केला. मी त्याला शांतपणे म्हटलं, “अरे भाईसाब, मै यहा पिच्चर देखने नही आया हू. मुझे सिर्फ मॅनेजर साहबसे कुछ बात करनी है.” मी त्या डोअरकिपरला आणि तिकडे लादी सफाई करणाऱ्या बाईला माझा शुद्ध हेतू समजावून सांगितल्यावर त्याने त्याच्या मोबाईलवरून वरच्या मॅनेजरला फोन केला. माझ्या दुर्दैवाने त्या मॅनेजरने मला भेटायला नकार दिला. मी दोन तीन वेळा विनवण्या करून फक्त दहा मिनिटं बोलायची विनंती केली. मात्र, कदाचित मॅटिनी शोचं बुकिंग बोंबलं असावं किंवा सकाळी सकाळी कोणाशी तरी वाजलेलं असावं म्हणून मॅनेजर बोलण्याच्या मूडमध्ये नव्हता. तो बिचारा बिहारी डोअरकिपर मालकाच्या आदेशाचे पालन करून मला परत जायला सांगून पुढची विडी फुकायला निघून गेला. अजंठा सिनेमा आणि त्याच्या इतिहासाबद्दल काहीही माहिती मिळाली नाही म्हणून मी मनातून थोडासा निराश झालो. माझ्या लहानपणी बहुसंख्य मराठी चित्रपट हे संपूर्ण कुटुंबाबरोबर अजंठाला पाहिल्याचं अगदी लख्खपणे आठवतंय. “व्याख्या, विख्खी, वूख्हू” असं खोकणारे उद्योगभूषण नवकोट नारायण यदुनाथराव जवळकर यांच्या “धुमधडाका” चित्रपटाला रविवारी सहाच्या शोला आमच्या भक्तियोग सोसायटीमधील जवळजवळ तीस चाळीस रहिवासी आपापल्या कुटुंबीयांसकट हजर असल्याचं आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. सचिन, महेश, अशोक आणि लक्षाच्या कित्येक विनोदी मराठी चित्रपटांनी आम्हा रसिक प्रेक्षकांना पोट धरून हसवलं त्याला अजंठाची बाल्कनी साक्षीदार आहे.

नव्वदच्या दशकात हिंदी सिनेमाचा स्टार मिथुन चक्रवर्तीने जणूकाही अजंठा थिएटर मालकी हक्काने विकत घेतलं की काय अशी शंका माझ्यासारख्या सामान्य रसिकांना यायला लागली. याच खरं कारण म्हणजे अजंठाला मॉर्निंग असो, मॅटिनी असो वा असो रेग्युलर शो, इथून तिथून फक्त मिथुन. त्याकाळी मिथुनच्या सिनेमाचा स्वतःचा एक खास पिटातला प्रेक्षकवर्ग होता. मिथुनचे कित्येक पडेल सिनेमे अजंठाच्या स्टॉल आणि बाल्कनीमुळे तरून गेले असावेत. मिथुनच्या सिनेमातल्या एंट्रीला हमखास शिट्ट्या आणि टाळ्या अजंठामधून येणार म्हणजे येणारच. सकाळी सकाळी शेअर रिक्षा किंवा बेस्टच्या बसमधून बोरिवली स्टेशनच्या दिशेने प्रवास करणारा आंबट शौकीन रसिकवर्ग अजंठा थिएटरकडे आतमध्ये जाणाऱ्या छोट्याश्या बोळाच्या तोंडावर लावलेल्या मदनिकांच्या सिनेमाचं पोस्टर न चुकता हमखास बघायचाच आणि मगच पुढे जायचा.

बोरिवलीमधील ही तीनही थिएटर्स फार जुन्या काळापासून म्हणजे कदाचित एकोणीसशे साठ किंवा सत्तरच्या दशकापासून अस्तित्वात असतील पण मी माझ्या जन्मानंतरच्या माझ्या आठवणीत समजा ऐंशी आणि नव्वदच्या दशकात या तीन थिएटरची तुलना केलीच तर सर्वात खालच्या क्रमांकावर अजंठा, त्याच्यावरती डायमंड आणि सगळ्या सोयीसुविधांच्या बाबतीत जया सिनेमा सरस ठरतं. अजंठामध्ये मोठमोठाल्या लोखंडी पंख्यांचा घर्रर्रर्र घर्रर्रर्र आवाज आणि त्यातून सतत येणारी उष्म हवा, अंधारात पायाखालून पळणारे उंदीर, कानाशी गुणगुणारे डास, कधीच साफसफाई न केलेली स्वछतागृहे आणि ह्या सगळ्यांवर कडी म्हणजे सिनेमाचा क्लायमॅक्स ऐन रंगात आलेला असतानाच अचानक खंडित होणारा वीजपुरवठा. “खिलाडी” सारख्या रहस्यमय हिंदी चित्रपटाची लिंक तुटल्यामुळे पब्लिकने त्या थिएटरच्या मॅनेजरला अप्पर आणि लोअर स्टॉलमधून शिव्यांची लाखोली वाहिली. हाश्श हुश्य करीत आणि रुमालाने घाम पुसत दहा मिनिटांनी वीजपुरवठा सुरळीत झाल्यावर फुल्ल शिट्ट्या आणि आरडाओरडा यांची मिसळ ज्यांनी अनुभवली त्यांनी खरोखर अजंठाची वास्तू अनुभवली. असो. आज उर्वरित दोन बंद पडलेल्या आपल्या भावंडांच्या विरहानंतर इतक्या वर्षांनी कात टाकून पुन्हा नव्यारूपात आणि मुख्य म्हणजे आजच्या मल्टिप्लेक्सच्या चकाचक दुनियेत सर्व आधुनिक सोयीसुविधांसकट अजंठा सिनेमा चालू झालंय हीच माझ्यासारख्या समकालीन रसिक प्रेक्षकांना सुखावणारी गोष्ट आहे.

त्यानंतर दोन दिवसांनी मी परत माझा आत्मविश्वास घेऊन पुन्हा एकदा नव्या उत्साहाने जया सिनेमाकडे गेलो. ह्याखेपेला मात्र नशिबाने थोडीफार साथ दिली. दरवाज्यातून सरळ आत गेलो तेव्हा तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या छोटयाश्या ब्रॉन्झच्या मूर्तीला आज फुलांचा हार घातलेला दिसत होता. याचाच अर्थ आज नक्कीच कोणीतरी आजूबाजूला असणार अशी खात्री पटली. चार पावलं चालल्यावर बाजूला सिमेंट आणि मातीची पोती उचलणाऱ्या एका कामगाराने मला बाहेरच्या दिशेला सध्या सुरु असलेल्या “आदी ग्रँड” ह्या प्युअर व्हेज रेस्टॉरंटच्या समोर उभ्या असलेल्या आणि एक अंदाजे साधारण साठ पासष्ठ वयाच्या इसमाकडे बोट दाखवलं. “तोच तुम्हाला पाहिजे ती माहिती देऊ शकतो!” असं म्हणून परत पुढची पोती उचलायला निघून गेला. मी त्या कामगाराचे आभार मानले आणि बाहेर येऊन त्याने सांगितलेल्या इसमाला जाऊन माझी ओळख सांगून रीतसर हॅलो केलं. त्यानेदेखील सुरुवातीला चाचपणी करत अंदाज घेत त्याचं नाव इनामदार असं सांगून माझ्याशी बोलायला सुरुवात केली. सध्या तो जया सिनेमाची देखभाल करतो आणि आमचं संभाषण सुरु असतानाच आणखी एक साठीच्या वयाचे गृहस्थ तिकडे आले. त्यांनी स्वतःचं नाव विठ्ठल असं सांगितल्यावर साक्षात माऊलींचाच हा चमत्कार असून म्या पुंडलिकाच्या प्रश्नांना थेट पांडुरंग उत्तरे देणार म्हणून मी खूपच आनंदित झालो.

मला जया सिनेमाची जी काही थोडीशी माहिती त्या दोघांकडून मिळाली त्यावरून ती फक्त तुमच्यासमोर आणण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केलाय. काही चुका आढळल्या तर माफ करा. जया सिनेमाची स्थापना होऊन चित्रपटांचा शुभारंभ नक्की कोणत्या वर्षी सुरु झाला ह्याचं नेमकं उत्तर विठ्ठल आणि इनामदार ह्या दोघांनाही ठाऊक नव्हतं. मात्र, विठ्ठल यांच्या सांगण्यानुसार “बैजू बावरा” हा भारत भूषण आणि मीनाकुमारी अभिनित चित्रपट जयाच्या भव्य पडद्यावर पहिल्यांदा दाखवला गेला. दीड रुपया तिकीट दरापासून सुरुवात करत पुढे काळानुरूप तिकीट दर वाढत वाढत जेव्हा २०१२ साली “बोल बच्चन” ह्या हिंदी सिनेमाचा शेवटचा शो जयाच्या पडद्यावर सादर झाला त्यावेळी बाल्कनीचा रेट होता फक्त सत्तर रुपये आणि स्टॉलचा रेट होता फक्त साठ रुपये. खात्री करण्यासाठी दिलेल्या फोटोंमध्ये तुम्ही झूम इन करून आता भकास बनलेल्या त्या अबोल खिडक्यांवर तिकिटाचे दर पाहू शकता.

जयाची सीटिंग कपॅसिटी एकूण नऊशे बारा खुर्च्यांची आहे. नऊशे बारा. वाचून खरंच धक्का बसला ना तुम्हाला. मी सुद्धा हे ऐकून हैराण झालो. इतकं भव्य सिनेमा थिएटर आमच्या बोरिवलीमध्ये त्याकाळी अस्तित्वात होतं ह्याचा आज अभिमान वाटतोय. “साहेब, बोरिवलीमध्ये पहिलं एअर कंडिशन आणि डॉल्बी डिजिटल साऊंड सिस्टीम आपल्या जयामध्ये पहिल्यांदा बसवली!” हे बोलत असताना त्या इनामदारांच्या डोळ्यात मला एक विलक्षण चमक दिसत होती. “हम आपके है कौन” ह्या हिंदी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास घडवला आणि त्याचबरोबर आबालवृद्धांसकट संपूर्ण कुटुंबाला थिएटरमध्ये ओढून आणण्याची जादू करून दाखवली. हा पिच्चर जयाला सलग बावन्न आठवडे तुफान चालला. जयाचे मालक श्री. विरेन खोत आणि त्यांच्या टीमने संपूर्ण थिएटरचा कायापालट करून टाकला. मस्तपैकी गुबगुबीत पुशबॅक चेअर्स, सुस्थित सुरु असणारे एअर कंडिशन्स, सुस्पष्ट आवाज ऐकू येईल असे डॉल्बी स्पिकर्स, सुस्वच्छ प्रसाधनगृहे आणि ह्या सर्वांच्यावरती एक गोड सरप्राईझ म्हणजे सिनेमातील “धिक ताना धिक ताना धिक ताना”, “जुते दो पैसे लो”, “दीदी तेरा देवर दिवाना” आणि अशी इतर गाणी सुरु झाली की संपूर्ण पडद्याभोवती आकर्षक दिव्यांची विद्युत रोषणाई आणि माळा चालू व्हायच्या. जयाचा भव्य पडदा उजळून जायचा आणि अख्या थिएटरमध्ये चैतन्य पसरायचं. आपण खरोखरीच एखादा भव्य दिव्य लग्नसोहळा अनुभवतोय असं माझ्यासारख्या असंख्य रसिक प्रेक्षकांना तेव्हा जाणवायचं. सिनेमा संपल्यावर खास लोकाग्रहास्तव पुन्हा एकदा “दीदी तेरा देवर दिवाना” हे गाणं परत पडद्यावर त्याच विद्युत रोषणाईसकट दाखवलं गेलंय. मला वाटतं इतकं अपवादात्मक यश फारच कमी सिनेमांच्या वाट्याला आलं असेल. रौप्यमहोत्सवी आठवड्यात चित्रपटाचे दिग्दर्शक सूरज बडजात्या आणि सिनेमातली निशा म्हणजेच खुद्द माधुरी दीक्षित स्वतः जयामध्ये उपस्थित होते. कित्येकांना माधुरीचा तोच हिरव्या रंगाच्या घागराचोलीतला फोटो जयाच्या फिल्म शोकेसमध्ये रुबाबात लावलेला अजूनही आठवत असेल. विठ्ठल म्हणाले की त्या दिवशी जया सिनेमाच्या एंट्रीपासून वरपर्यंत फुलांच्या पायघड्या आम्ही घातल्या होत्या ज्यावरून चालत चालत माधुरी आत आली होती.

आमचं संभाषण सुरु असताना समोर पानाच्या गादीवर उभ्या असलेल्या इसमाकडे बोट दाखवून इनामदारने म्हटलं तो बघा बबलूभाई. सत्तर ते नव्वदच्या दशकात ह्या बबलूभाईने सिनेमाची तिकिटे ब्लॅकने विकायचा धंदा केला. अमिता बच्चनच्या (मी मुद्दाम अमिता लिहिलंय कारण अजूनही कित्येक लोक त्याला अमिता बच्चनच म्हणतात) दीवार, शोले, त्रिशूल, डॉन आणि कित्येक सिनेमाची तिकिटे ब्लॅकने विकून स्वतःचं घरदार चालवलं, लेकीबाळांच्या शिक्षणाचा खर्च केला, प्रॉपर्टीदेखील बनवली इत्यादी इत्यादी. त्याकाळी डॉन सिनेमाचं दहा रुपयांचं तिकीट ब्लॅकने शंभर रुपयांना विकणारा बबलूभाई आजही स्वतःच्या देव्हाऱ्यातील देवांसकट अमिता बच्चनच्या फोटोची तितक्याच भक्तिभावाने पूजा करतो. पूर्वीच्या काळात शर्टाची वरची तीन बटणे उघडी ठेवून, आतला जाळीजाळीचा तांबडा बनियान आणि गळ्यात अडकवलेला जांभळ्यारंगाचा रुमाल आता गायब होऊन आज अंगात कडक इस्त्री केलेला स्वच्छ शुभ्र पांढरा फुल शर्ट, पांढरी पॅन्ट आणि पायात कोल्हापुरी वहाणा घालून बबलूभाई उभा होता. आज हातामध्ये ब्लॅकच्या तिकिटांची जागा नवीन आयफोनने घेतली होती आणि तोंडातून सिगारेटचा एक दमदार धूर सोडत “हर फिक्र को धुएं में” उडवून देत बबलूभाई तिकडून चालता झाला. इकडे विठ्ठल आणि इनामदार या दोघांनी आता आम्हाला आमच्या रोजच्या इतर कामांकडे लक्ष द्यायचंय असं सांगून माझी भेट संपवली. मी हसतमुखाने त्यांनी दिलेल्या माहितीबद्दल त्या दोघांचे मनापासून आभार मानले आणि तिसऱ्या आणि शेवटच्या उरलेल्या डायमंड सिनेमाकडे चालत निघालो.

डायमंड सिनेमाशी येऊन पोहोचल्यावर मी थक्कच झालो. जाळीचं सेफ्टी ग्रीलचं दार सताड उघडं ठेवून आतमध्ये कसल्यातरी तयार कपड्यांच्या सामानाची थप्पी रचून ठेवलेली मला दिसली. चहाचे ग्लास आणि किटली हातात घेऊन एक पोऱ्या तिकडून आतमध्ये गेला. मी त्याला काही विचारायच्या आधीच पाठीमागून “क्या चाहिये उधर”? असा प्रश्न मला कोणीतरी केला. मागे पाहिलं तेव्हा रस्त्यावर स्वस्तात टी शर्ट्स आणि बर्मुडा विकणाऱ्या एका दादाने मला हटकलं. माझं म्हणणं ऐकून घेतल्यावर तो म्हणाला की बाजूला बंझारा स्टोअर्समध्ये जाऊन विचारा. कदाचित ते तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतील. थँक यू दादा! असं त्याला म्हणून मी बंझारामध्ये प्रवेश केला. हा काय नवीन शर्ट घ्यायला आलेला कस्टमर नाहीये हे समजल्यावर त्यांचा हिरमोड झाला. मी त्याही परिस्थितीत गल्ल्यावर बसलेल्या माणसाला विनंतीच्या सुरात डायमंड सिनेमाच्या मॅनेजरबद्दल विचारल्यावर “वो गांव गया है और अब एक जनवरी के बाद ही वो वापस आयेगा शायद!” असं म्हणून पुन्हा आपल्या कामाला लागला. मी अगदीच हट्टाला पेटून ऐकतच नाही म्हटल्यावर त्याने “अरे भाईसाब, ये थिएटर बंद होके नौ दस साल हो गया है. शायद २०१४ में लास्ट शो हुआ था उसके बादसे बंद पडा है!” असं सांगून ह्यापेक्षा मला काही माहिती नाही असं म्हणाला. “आपका बहुत शुक्रिया सर!” असं बोलून मी दुकानातून बाहेर पडलो.

का कुणास ठाऊक पण या तीनही थिएटर्सपैकी डायमंडबद्दल लहानपणापासूनच माझ्या मनात विशेष आपुलकी, प्रेम, जिव्हाळा होता, आहे आणि राहील. बोरिवली स्टेशनला जाताना हे थिएटर मुख्य रहदारीच्याच रस्त्यावर उभं असल्याने डायमंडच्या बाहेर ताज्या फुलांचा हार घातलेला हाऊसफुल्लचा बोर्ड दिसेल का ह्याची उगीच एक उत्सुकता असायची. तिथे भर पावसात छत्र्या उघडून बाहेर ताटकळत उभी असलेली गर्दी बघायचो. सिनेमा संपल्यावर मागच्या दाराने बाहेर येणाऱ्या माणसांच्या चेहेऱ्यावरच्या प्रतिक्रिया वाचायचो आणि सिनेमा चांगला आहे की वाईट ह्याचा एकंदरीत अंदाज यायचा. लहानपणी सहा ते नऊच्या शो नंतर आई बाबांबरोबर हमखास हॉटेल द्वारकामध्ये रात्रीचं जेवूनच रिक्षाने घरी जायचं हा शिरस्ता होता. पुढे कॉलेजकुमार झाल्यावर मित्रांबरोबर डायमंडला नऊ ते बाराचा लास्ट शो फॉलोड बाय रस्त्यावरची दिलीपभाईची स्पेशल पावभाजी आणि त्यावर बोरिवली स्पेशल ड्रायफ्रूट फालुदा. नंतर रात्री भक्तियोगच्या कट्ट्यावर बसून पाहिलेल्या सिनेमावर मित्रांमध्ये चर्चा. ह्यात एकजरी गोष्ट चुकली तरी त्याकाळात तो फाऊल धरायचे.
डायमंडच्या थिएटरच्या आठवणींबद्दल लिहायचं तर सर्वप्रथम ज्या कोणी हे थिएटर बांधलं तेव्हा ह्याची इमारत बांधणाऱ्या मुकादमने त्याअगोदर कोकणातल्या गावात नक्कीच अनेक विहिरी बांधल्या असणार. ह्याचं प्रमुख कारण म्हणजे जे लोक अधिकचे पैसे भरून बाल्कनीचं तिकीट काढून आणि कॉलर ताठ करून जिन्याने वरती जायचे तेव्हा त्यांना कळायचं की डायमंडचा मुख्य पडदा हा विहिरीत खोल वाकून पाहिल्यासारखा खालच्या दिशेला आहे. ज्यांना अगोदरच हे माहिती होतं त्यांनी नंतर तिकीट विंडोवर मुद्दाम अप्पर स्टॉलचं तिकीट मागितलं जेणेकरून खाली न वाकता अगदी समोर पडद्यावरचा सिनेमा पाहता येईल. इथे बसायला कुशनच्या आरामदायी खुर्च्या नसून लाकडी खुर्च्यांची आसनव्यवस्था होती. सिनेमाच्या इंटरव्हलला गोल्डस्पॉट, लिम्का, थम्सअपच्या बाटल्यांवर त्या ओपनरचा होणारा ट्रिंग ट्रिंग ट्रिंग ट्रिंगचा आवाज, गर्दीत घुसून धडपडत मिळवलेले ते खमंग सामोसे, कळकट्ट ग्लासात तशीच हाताची कळकट्ट बोटं बुचकळून तिथल्या छोटूने दिलेली चहा कॉफी तेव्हा चविष्ट लागायची. अत्यंत घाणेरड्या अवस्थेत असलेली स्वच्छतागृहे त्याकाळी आम्ही त्या दुर्गंधीसकट तशीच स्वीकारली. तिथल्या नळाच्या पाण्याने पाणी पिताना आमच्या कोणाच्याही डिक्शनरीत तेव्हा सॅनिटायझर आणि हायजिन हे शब्दच अस्तित्वात नव्हते.

डायमंडची कायम लक्षात राहणारी आठवण म्हणजे तेजाब सिनेमातल्या सुप्रसिद्ध एक, दो, तीन गाण्यावर थिरकणाऱ्या मोहिनीवर पब्लिकने चार आणे, आठ आणे आणि रुपयांची नाणी पडद्यावर उधळलेली मी स्वतः पाहिलेली आहेत. अत्यंत चुरशीच्या आणि शेवटच्या क्षणी टॉप गियर टाकत संजयलाल शर्माने शेखर मल्होत्राला सायकल रेसमध्ये मात दिल्यावर शिट्ट्या आणि टाळ्यांनी दणाणून गेलेलं डायमंड मी अनुभवलंय. “दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे” ह्या चित्रपटाने मोठ्या दणक्यात डायमंडला गोल्डन ज्युबिली साजरी केली. ह्या चित्रपटाच्या मोठ्या व्यवसायामुळे डायमंडला एक आर्थिक हातभार लाभला ज्यामुळे डायमंडचा थोडाफार कायापालट होण्यास निश्चित मदत झाली. भिंतीवरचे पंखे जाऊन एअर कंडिशन आले आणि साऊंड सिस्टीम सुधारली. वास्तवच्या रघुनाथ नामदेव शिवलकरचा “देख माँ. पचास तोला. पचास तोला.” हा संवाद पडद्यावर चालू असताना मागच्या रांगेतल्या स्थानिक भाईंना स्फुरण चढून त्यांनी फोडलेल्या बाटल्यांचा आवाज संपूर्ण डायमंडमध्ये घुमला होता. राम गोपाल वर्माच्या भूत चित्रपटाच्या एकंदरीत भीतीदायक परिणामामुळे इंटरव्हलला एकट्याने शौचालयात जायलादेखील अनेकांची फाटली होती.

ह्या सर्व चित्रपटांच्या आठवणींसोबत डायमंडला सध्या चालू असलेला “नाऊ रनिंग” आणि नंतर येणाऱ्या “कमिंग सून” अशी आगामी चित्रपटांची पोस्टर्स बाहेरच्या शोकेसमध्ये रसिकांसाठी लावली जायची. नित्यनेमाने तिकडून येता जाता त्या शोकेसवर शंभर टक्के नजर जायचीच. ॲडव्हान्स बुकिंगला रांगेत उभं राहून सिनेमाची तिकिटे काढणे हा म्हणजे एक सोहळा असायचा सोहळा ज्याच्या स्मृती मी अजूनही जपून ठेवल्या आहेत. तुम्ही विश्वास ठेवा अगर ठेवू नका मात्र “रूप की रानी चोरोंका राजा” सारख्या सुमार चित्रपटाची त्याकाळी इतकी हवा निर्माण केली गेली होती की फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी डायमंडच्या तिकीट विंडोची भली मोठी रांग बोरिवली पूर्व पश्चिम जोडणाऱ्या ब्रिजवर गेली होती हे सत्य आहे. तासनतास रांगेत उभं राहून अखेर आपल्या हातात सिनेमाची तिकिटे मिळाली की मग सर्वप्रथम त्या पिवळ्या, निळ्या, हिरव्या रंगाच्या कोऱ्या करकरीत तिकिटांचा सुगंध नाकात भरून घेण्यात जो आनंद होता ना त्याची सर बुक माय शोच्या ऑनलाईन डिजिटल तिकिटाला कधीच येऊ शकणार नाही. कधीच नाही.

आज डायमंडच्या बाहेर त्या कायमच्या कुलूप बंद झालेल्या शोकेसकडे पाहत पाच मिनिटं उभा राहिलो. स्वतःचे डोळे मिटून घेतले. परत एकदा भूतकाळात जाऊन डिंग डाँग डिंगवर थिरकणारी मोहिनी, राजने ‘पलट’… म्हटल्यावर हळुवारपणे मागे वळून राजकडे पाहताना गोड हसणारी सिमरन, मुंबई का डॉन कौन? ये भिकू म्हात्रे अशी आरोळी ठोकणारा भिकू म्हात्रे आणि परत एकदा लोकाग्रहास्तव रिपीट रनला लागलेल्या दीवारमध्ये “मै आजभी फेके हुए पैसे नही उठाता!” असं डावरला ठणकावून सांगणारा विजय पुनःश्च भरभरून जगलो. डोळे उघडल्यावर भानावर आलो आणि जाणवलं की सुवर्णकाळ उपभोगून नंतर बंद पडलेल्या सिनेमा थिएटरमधील शांततेपेक्षा बधिर करणारा दुसरा आवाज नाही. कधी कधी लॉजिकपेक्षा माणसाची इमोशन्स अधिक शक्तिशाली असतात. अजंठा सिनेमा जसा काही वर्षांनी परत सुरु झाला त्याचप्रमाणे जया आणि डायमंड सिनेमाच्या मालकांना ही दोन्ही चित्रमंदिरे परत सुरु करण्याची देव सुबुद्धी देवो अशी मनोमन प्रार्थना करत मी झपाझप दिलीपभाईची स्पेशल पावभाजीची गाडी शोधायला निघून गेलो.

१९-जानेवारी-२०२४
-दीपक चंद्रकांत दाते

आम्ही साहित्यिक फेसबुक ग्रुपवरील लेखक दीपक चंद्रकांत दाते ह्यांनी लिहिलेला हा लेख

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 374 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..