नवीन लेखन...

बदमाश लाटा

समुद्राच्या पृष्ठभागाची लाटांच्या स्वरूपात सतत हालचाल होत असते. या लाटांची उंची ही, तिथला समुद्र शांत आहे की खवळलेला आहे, यावर अवलंबून असते. शांत समुद्रातल्या लाटांची उंची फार तर एखाद मीटर असते, खवळलेल्या समुद्रातल्या लाटा मात्र चार-पाच मीटर उंचीच्या असतात. वादळी परिस्थितीतल्या अतिखवळलेल्या समुद्रातल्या लाटा तर दहा-बारा मीटर उंचीच्या असू शकतात. मात्र काही वेळा समुद्रात अचानक, सर्वसाधारण लाटांहून कितीतरी अधिक उंची असणारी एखादी शक्तिशाली लाट येऊन थडकते व समुद्रात प्रवास करणाऱ्या जहाजांना तडाखा देते. या शक्तिशाली लाटांना ‘बदमाश लाटा’ किंवा ‘मारक लाटा’ म्हटलं जातं.

अशीच एक प्रचंड उंचीची मारक लाट, १७ नोव्हेंबर २०२० या दिवशी, कॅनडाच्या व्हँकुवर बेटाच्या पश्चिमेकडील समुद्रात, युक्लूलेट किनाऱ्यापासून सात किलोमीटर अंतरावर निर्माण झाली होती. यावेळच्या इथल्या सर्वसाधारण लाटांची उंची सुमारे सहा मीटर इतकी असताना, या एकाच लाटेची उंची मात्र सुमारे अठरा मीटर म्हणजे चार मजली इमारतीइतकी होती. महत्त्वाचं म्हणजे, इतक्या उंचीची लाट प्रथमच नोंदली गेली आहे. सुदैवानं या लाटेनं कोणताही धोका निर्माण झाला नाही. कॅनडातील व्हिक्टोरिआ विद्यापीठातल्या योहान्नस गेमरिश आणि लिआ सिकन यांनी या लाटेचं तपशीलवार गणित केलं आहे. योहान्नस गेमरिश आणि लिआ सिकन यांचं हे संशोधन ‘सायंटिफिक रिपोर्ट्स’ या शोधपत्रिकेत नुकतंच प्रसिद्ध झालं आहे.

समुद्रातील लाटांची उंची मोजण्यासाठी वेगवेगळी तंत्रं वापरली जातात. त्यातल्याच एका तंत्रानुसार संवेदक बसवलेल्या बोयऱ्यांचा वापर केला जातो. हा बोयरा म्हणजे पाण्यावर तरंगणारी डब्यासारखी एक वस्तू असते. या बोयऱ्यावरील संवेदक, लाटांमुळे होणाऱ्या बोयऱ्याच्या हालचालींची नोंद करतो. या नोंदींवरून त्या ठिकाणच्या लाटांची उंची कळू शकते. संवेदकानं मिळवलेली माहिती, जागतिक स्थानदर्शक यंत्रणेतील उपग्रहांद्वारे संशोधकांपर्यंत पोचते. व्हँकुव्हर बेटाजवळच्या समुद्रात ‘मरिनलॅब्ज डाटा सिस्टम्स’ या कंपनीनं सव्वीस बोयरे उभारले आहेत. या बोयऱ्यांतील संवेदकांद्वारे लाटांच्या सतत नोंदी केल्या जात असतात. या बोयऱ्यांकडून नोंदवल्या गेलेल्या माहितीचं विश्लेषण करताना, यांतल्याच एका बोयऱ्याकडून नोंदवल्या गेलेल्या या विक्रमी लाटेचा, योहान्नस गेमरिश आणि लिआ सिकन यांना शोध लागला.

योहान्नस गेमरिश आणि लिआ सिकन यांचं हे संशोधन सन २०१० ते २०२१ अशा सुमारे अकरा वर्षांच्या नोंदींवर आधारलेलं आहे. लहरींच्या गणिती गुणधर्मांचा व सागरी लाटांच्या निर्मितीच्या एका प्रारूपाचा आधार घेऊन या संशोधकांनी या लाटेच्या वेळची, तसंच या लाटेच्या अगोदरची व नंतरची परिस्थिती अभ्यासली. ही लाट जिथे टिपली गेली, त्या ठिकाणी समुद्राची खोली ही सुमारे ४५ मीटर इतकी आहे. सर्वसाधारणपणे मारक लाटा या त्या-त्या ठिकाणच्या, त्यावेळच्या सर्वसाधारण लाटांच्या तुलनेत दुप्पट वा त्यापेक्षा थोड्याशा अधिक उंचीच्या असतात. व्हँकुवर बेटाजवळ नोंदली गेलेली ही लाट मात्र त्यावेळच्या तिथल्या लाटांच्या तुलनेत, तिप्पट उंचीची होती. मारक लाटा या फारशा दुर्मिळ नाहीत. परंतु, आता नोंदल्या गेलेल्या मारक लाटेइतक्या तीव्र स्वरूपाच्या मारक लाटा सहसा आढळत नाहीत. योहान्नस गेमरिश आणि लिआ सिकन यांच्या गणितानुसार, व्हँकुव्हरजवळ निर्माण झालेल्या लाटेइतकी तीव्र मारक लाट निर्माण होण्याची शक्यता ‘तेराशे वर्षांत फक्त एक’ इतकीच आहे.

विध्वंसक मारक लाटांची उंची वीस-पंचवीस मीटरच्या आसपास असू शकते. अनपेक्षित उसळलेल्या अशा मारक लाटा जहाजांच्या दुर्घटनांना कारणीभूत ठरल्याची अनेक उदाहरणं आहेत. यात लहानच नव्हे तर, मोठ्या जहाजांचाही समावेश आहे. अशा दुर्घटनांचं एक लक्षवेधी उदाहरण म्हणजे दिनांक १२ डिसेंबर १९७८ रोजी, पश्चिम जर्मनीच्या एमएस म्यून्शेन या मालवाहू जहाजाला, अमेरिकेच्या वाटेवर असताना झालेला अपघात. त्यावरील खलाशांसह अटलांटिक महासागरात बुडालेल्या या जहाजाचे फारसे अवशेषही सापडले नाहीत. हे जहाज बुडण्यास मारक लाट कारणीभूत ठरली असल्याची शक्यता व्यक्त केली गेली आहे. असंच दुसरं उदाहरण म्हणजे १९९७ सालचं. इंग्लंडमधील कॉर्नवलजवळच्या समुद्रात दिनांक १३ फेब्रुवारी १९९७ रोजी अशाच एका मारक लाटेनं टोकिओ एक्स्प्रेस या जर्मनीच्याच मालवाहू जहाजाला धडक दिली. त्यात हे मालवाहू जहाज कलंडलं आणि त्यातील माल समुद्राच्या पाण्यात पडला. या मालातील प्लास्टिकच्या अनेक वस्तू आज, म्हणजे सुमारे पंचवीस वर्षांनंतरही, कॉर्नवलच्या आसपासच्या समुद्रकिनाऱ्यावर अधूनमधून वाहून येत असलेल्या आढळतात.

या मारक लाटांची वर्णनं पूर्वीच्या दर्यावर्द्यांकडून अनेक वेळा केली जात असत. परंतु अशा लाटा प्रत्यक्ष अस्तित्वात आहेत की नाही, याबद्दल शंका व्यक्त केली गेली होती. त्यामुळे या लाटांवर पूर्वीच्या काळात फारसं संशोधन झालेलं नाही. मारक लाटेची पहिली निश्चित स्वरूपाची नोंद १ जानेवारी १९९५ या दिवशी झाली. नॉर्वेजवळच्या समुद्रात, किनाऱ्यापासून सुमारे १६० किलोमीटर नैऋत्येला असणाऱ्या, नैसर्गिक वायू वाहून नेणाऱ्या पाइपलाइनच्या संकूलावर ही लाट धडकली होती. संवेदकाद्वारे केल्या गेलेल्या या प्रचंड लाटेच्या नोंदीवरून, मारक लाटांचं अस्तित्व नक्की झालं आणि या लाटांचा अभ्यास रीतसरपणे सुरू झाला. त्यानंतर मारक लाटेची वैज्ञानिक व्याख्याही केली गेली. या व्याख्येनुसार, एखाद्या लाटेची उंची ही तिथल्या त्यावेळच्या सर्वसाधारण मोठ्या लाटांच्या तुलनेत किमान दुप्पट असली, तर ती लाट ‘मारक लाट’ समजली जाते. नॉर्वेजवळ नोंदल्या गेलेल्या मारक लाटेची प्रत्यक्ष उंची ही सुमारे पंचवीस मीटर इतकी होती. म्हणजे व्हँकुवरजवळ १७ नोव्हेंबर २०२० रोजी नोंदल्या गेलेल्या लाटेपेक्षा अधिक. परंतु मुळातच त्यावेळी तिथल्या लाटांची उंची ही बारा मीटरच्या आसपास असल्यानं, ही मारक लाट त्या तुलनेत दुप्पट उंचीची ठरली. व्हँकुव्हरला नोंदल्या गेलेल्या लाटेची उंची ही जरी अठरा मीटर इतकीच असली, तरी त्यावेळच्या लाटांच्या उंचीच्या तुलनेत तिची उंची तिप्पट असल्यानं, ही लाट विक्रमी ठरली.

मारक लाटा या दोन प्रकारे निर्माण होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. नेहमीच्या लाटा या मुख्यतः समुद्राचं पाणी वाऱ्यामुळे ढकललं जाऊन निर्माण होतात. मारक लाटा या नेहमीच्या लाटांपासूनच निर्माण होतात; परंतु या लाटा निर्माण होताना आणखी पुढचा टप्पा गाठला जातो. नेहमीच्या लाटा एकाच दिशेनं प्रवास करीत असल्या तरी, त्यांचे वेग वेगवेगळे असू शकतात. त्यामुळे काही वेळा अशा लाटांतलं अंतर कमी होत जातं व अखेर अशा लाटा एकत्र होऊन, त्यातून मारक लाट निर्माण होऊ शकते. दुसरी शक्यता वादळी वाऱ्यांशी संबंधित आहे. वादळी वाऱ्यांमुळे निर्माण होणाऱ्या लाटांची दिशा ही जर तिथल्या पाण्यातल्या प्रवाहाच्या विरूद्ध दिशेला असली तर, त्याचा लाटांच्या वेगावर प्रतिकूल परिणाम होऊन दोन लाटांमधलं अंतर कमी होऊ लागतं. अखेर अशा अगदी जवळजवळ आलेल्या लाटा एकत्र येऊन मारक लाट निर्माण होऊ शकते.

या मारक लाटा अनपेक्षितपणे निर्माण होऊन, एखाद्या भिंतीसारख्या अचानक समोर येतात व जहाजावर आदळतात. या लाटा समुद्रकिनाऱ्याजवळ सहसा आढळत नाहीत, तर त्या भर समुद्रात आढळतात. या लाटांचं अस्तित्व फार तर काही मिनिटांचं असतं. काही मिनिटांत या लाटा विखरून नष्ट होतात. या लाटांची लांबी दोनशे-अडीचशे मीटरपर्यंत असू शकते. या लाटा फक्त खवळलेल्या समुद्रातच नव्हे तर, शांत समुद्रातही निर्माण होतात. सर्वसाधारणपणे, एखाद्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या दर पंधरा-सोळा हजार लाटांत, एक लाट ही मारक लाट असते. या प्रमाणानुसार, एखाद्या ठिकाणी दर दोन दिवसांत एक मारक लाट निर्माण व्हायला हवी. वादळी हवामानात एका दिवसात दोन मारक लाटासुद्धा निर्माण होऊ शकतात.

वातावरणातील बदलांमुळे या मारक लाटांची उंची भविष्यात वाढत जाणार असल्याचं, संशोधकांंचं मत आहे. पाण्याच्या वाढलेल्या तापमानामुळे, आताच या लाटांचं प्रमाण सुमारे दहा टक्क्यांनी वाढलं आहे. परिणामी, सागरी वाहतूकीच्या दृष्टीनं या लाटांच्या गणितांना आता अतिशय महत्त्व प्राप्त झालं आहे. या मारक लाटांमुळे घडून येणाऱ्या सागरी दुर्घटना टाळायच्या असल्या तर, जहाजबांधणीच्या दृष्टीनं या लाटांचं स्वरूप अधिक अचूकरीत्या कळायला हवं, तसंच या लाटांची अधिकाधिक लवकर पूर्वसूचना मिळायला हवी. योहान्नस गेमरिश आणि लिआ सिकन यांनी केलेलं मारक लाटांचं गणित हे याच प्रयत्नांचा एक भाग ठरला आहे.

चित्रवाणीः https://www.youtube.com/embed/rK9aKFI2fA8?rel=0

— डॉ. राजीव चिटणीस.

छायाचित्र सौजन्य: H.Mitsuyasu / ARSLOE / Scientific Reports, MarineLabs Data Systems.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..