नवीन लेखन...

बड़ोंको समझना हो तो, बड़ा बनना पड़ता हैं !

१) शाळेतून दुपारी मित्रांबरोबर टंगळ-मंगळ करीत घरी परतताना आठवडे बाजारात डोंबाऱ्याचा खेळ दिसला. पावलं थबकली. सोबत असलेला विकास कोळंबे निघून गेला घरी,पण मी मात्र मग्न ! खेळ संपल्यावर उशीर झाल्याचे जाणवल्याने काहीसा अपराधी चेहेरा घेऊन मी घरी परतलो. वडील,आई आणि आजी सगळेजण रोजच्यासारखे माझ्यासाठी जेवायचे थांबले होते. दुपारचे दोन वाजून गेले होते. वडिलांनी शांतपणे मनगटावरील घड्याळात एक नजर टाकली आणि आईने त्यांना वाढायला घेतले.

२) भुसावळला नववीत असताना दुपारची शाळा. सिनिअर झाल्याने वट मारायची आणि डोक्यावरची शिंगे मिरवायची नकळत सवय जडलेली. खान्देशी उन्हात दुपारी प्रार्थनेला उभे राहायचे म्हणजे जीव हैराण व्हायचा.
मुख्याध्यापक पळणीटकर सरांचा नरेंद्र आमच्या वर्गात, त्यामुळे अदृश्य टोपी आणखी उंच ! एक दिवस ऑफ तासाला सर वर्गात आले. इकडच्या-तिकडच्या गप्पा मारू लागले.
आगाऊपणे आमच्यापैकी एकजण म्हणाला- ” सर, प्रार्थना खूप होतात, उन्हाचा त्रास होतो. जरा प्रार्थनांची संख्या कमी करता येतील का? पटकन संपवून वर्गात जाता येईल.”
सर मिश्किल हसले. म्हणाले-
“असा कितीसा वेळ लागतो रे प्रार्थना म्हणायला? चला, आत्ता म्हणा. मी घड्याळात वेळ लावतो.”
सर्वप्रथम- ” वंदे जननी, भारत धरणी ” ही शालेय प्रार्थना, मग ” या कुन्देन्दुतुषारहारधवला —- “, त्यानंतर “भारत माझा देश आहे “ही प्रतिज्ञा आणि सरतेशेवटी- “जन गण मन ” हे राष्ट्रगीत !
एकसुरात आमचा वर्ग प्रार्थना म्हणत होता आणि सगळीकडे आश्चर्य पसरले होते- नुकताच शाळा सुरु होताना हा रतीब झाला होता आणि आता पुन्हा एकदा फक्त एका वर्गातून?
सरांनी घड्याळ बाजूला सारत टिपण्णी केली- “अरे, फक्त चार मिनिटे आणि अठरा सेकंद लागले. एवढाही वेळ तुम्हांला एके ठिकाणी उभे राहता येत नाही का?” आमची केस डिसमिस !

३) इयत्ता (जुनी) अकरावी- सोलापूरच्या ह दे प्रशालेतील प्रीलीम ! पहिल्या पेपरच्या वेळी सकाळी वडिलांनी कौतुकाने त्यांचे रिस्ट वॉच मला दिले. काहीतरी घडले आणि त्या घड्याळाचे बिनसले. अभ्यास सोडून मी त्याच्या मागे लागलो. पेपर सुरु व्हायला दोनेक तास बाकी होते. वडिलांच्या कदाचित लक्षात आले असावे. माझी काही बोलण्याची बिशाद नव्हती. त्यांनी घड्याळ घेतले आणि रेल्वे लाईन्सपासून चालत गावातल्या घड्याळजीकडे गेले. मी शाळेत जाण्यापूर्वी घड्याळ दुरुस्त करून त्यांनी कसेबसे वेळेत आणले.तोंडातून एकही शब्द नाही. मीच कानकोंडा, मान खाली घालून, सगळ्यांना नमस्कार करून परीक्षेला गेलो.

४) वालचंदला असताना ७८-७९ साली मंगला टॉकीज ला “कस्मे -वादे ” बघायला मी आणि धाकटा भाऊ आईच्या परवानगीने गेलो. सायंकाळी सहाचा शो, पण नेमकी वीज गेल्याने, आणि मुख्य म्हणजे जनरेटर नसल्याने सिनेमा सुरु व्हायला आठ वाजले. तिकिटे कॅन्सल करायला जीव होत नव्हता. घरी पटकन जाऊन सांगून यावे तर घर लांब आणि केव्हाही दिवे येऊ शकत होते.आम्ही निर्धारपूर्वक तसेच थांबलो. सिनेमा मोठा होता आणि संपल्यावर चालत घरी गेलो-सबब रात्री साडे अकराला पोहोचलो. दरम्यान वडील घरी आले होते. आम्ही कोणत्या सिनेमाला गेलो होतो, घरी माहीत नव्हते. वडील वाड्याच्या दाराशी तेवढ्या रात्री काळजीने वाट पाहात उभे होते. लांबून त्यांना बघून आमची शब्दशः तंतरली. त्यांची नजर चुकवत आम्ही मुकाट घरात शिरलो. न बोलता ते झोपायला गेले.

नुकताच हरिहरेश्वरला अथांग समुद्र भेटला. मी त्याच्या टप्प्यात भान हरपून उभा असतानाचा हा फोटो. मला समुद्र व्हायला अजून खूप वेळ लागणार आहे?

आखिर बड़ोंको समझना हो तो, बड़ा बनना पड़ता हैं !

हेच मी परवा माझ्या विद्यार्थिनीला- मोनल शर्मा फोनवर समजावून सांगत होतो.

तेवढ्यात “चंद्रमुखी ” चित्रपटातील सवाल-जबाब मधील ओळ कानी पडली-

” उमगायाला सोपी आई, बाप कोणाला कळतो गं ?”

या वाक्यांशाच्या पूर्वार्धाबद्दल कदाचित दुमत होईल पण उत्तरार्धाला सगळ्यांच्या माना होकारार्थी सहमत होतील.

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..