सुस्वागतम् ! बहावा. कसा आहेस? म्हणजे रंगात आला आहेस, हे कळतंचय! येत जा रे मध्ये मध्ये.
आणि काय रे बहाव्या, तुला फुलायला ऋतूचा बहाणा कशाला हवा? तू अवचित फुलत जा ना कधी कधी.
सकाळी तुझ्याकडे पाहीलं की, छान वाटतं. दुपारी तू भारीच चमकतोस. आणि संध्याकाळी असं वाटतं की, आकाशाच्या केशरी वस्त्रावर पिवळे बुट्टेच आहेत, तुझी फुलं. बहाव्या, ऐक ना. फुलत जा ना कधी कधी, अवचित.
एक सांगू, मला तुझी नावं फार आवडतात बरं का. अरे का म्हणून काय विचारतोस?
बहारदार
हास्यमुखी
वासंतिक
किती सुंदर अर्थंय, तुझ्या मराठी नावात!
व्याधिघात, नृपद्रुम (नृप = राजा, द्रुम = वृक्ष) ही तुझी संस्कृत नावं सुद्धा किती सार्थ आहेत ना! आयुर्वेदाने सुद्धा तुझा किती महिमा सांगितलाय! वात, पित्त आणि कफ या तिन्ही व्याधींवरील औषधात तुझा समावेश असतो. म्हणूनच तर म्हणतोय, फुलत जा ना कधी कधी, अवचित.
तू बहारीला येतोस आणि दीडेक महिन्यात ती येते, वर्षा. अरे मला तर तू खासच वाटतोस. आधी उषा येते आणि मग सूर्य. पण तुझं मात्र खासच हं. आधी तू येतोस आणि मग तुला शोधत शोधत वर्षा येते. मला पाऊसही खूप आवडतो रे. म्हणूनच म्हणतोय, फुलत जा ना कधी कधी, अवचित.
हे बघ, बहाव्या, हे ग्लोबल वॉर्मिंग, प्रदुषण हे सगळं चालूचंय. त्यावर कधी उपाय आम्ही माणसं करू काय माहीत? पण तू यांचा काही विचार करू नकोस. तू आपला छान फुलत जा अवचित!
तुला एक गंमत सांगतो आणि थांबतो, बरं का बहाव्या! तू एप्रिल, मे मध्ये बहाराला येतोस. शाळेत असताना तू बरोबर आमच्या सुट्टीतला साथीदार म्हणून यायचास. काही मित्र मैत्रिणींची भेट तर सुट्टीतच व्हायची. आणि दरवर्षी आमच्या गप्पांचे फड तुझं स्वागत करूनच रंगायचे. आता सगळ्यांनाच भेटणं होत नाही. पण तुला पाहीलं ना की, क्षणासाठी का होत नाही, सगळ्यांना भेटल्यासारखं वाटतं. म्हणूनच म्हणतोय, बहाव्या, फुलत जा ना, अधूनमधून, अवचित!
चल, मग भेटत राहू या! जय श्रीकृष्ण!!!
© चन्द्रहास शास्त्री
Leave a Reply