मी आणि व्यवस्थापकीय विभागातला एक सहकारी असे आम्ही नगर जिल्ह्याच्या दौर्यावर होतो. कोपरगाव, राहता, संगमनेर, श्रीरामपूर हा तर माझ्या खूपच परिचयाचा असा परिसर. या भागातून माझ्या लहानपणी अनेकवार फिरलो होतो. काही वर्षे कोपरगावात शिकलो होतो. मित्रांचा परिवारही या भागात होता. एका अर्थानं माझ्या दृष्टीनं हा माहेरचा दौरा होता. राहता येथे एक कार्यक्रम होता. तो आटोपायला अकरा वाजले. नंतर शिर्डीला जावं असं ठरलं. त्यावेळी साईबाबाचं दर्शन इतकं अवघड नव्हतं. दुपारी बाराच्या आरतीलासुद्धा सहज जाता यायचं. कोपरगाव ते शिर्डी असं सायकलनंही अनेकवेळा आलेलो होतो. बाबाचं दर्शन झालं. आता इथंच जेवणं अन् पुढे जाणं असा विचार सुरू होता. मी माझ्या सहकार्याला म्हटलं. इथनं अवघ्या दहा किलोमीटरवर माझ्या बहिणीचं शेत आहे. शेतावरच घर करून ती राहते. तिथं जाऊ आपण. घरचं जेवण होईल आणि बहिणीला भेटणंही होईल. या प्रस्तावावर वाद होण्याचा प्रश्न नव्हता. आमची गाडी बहिणीच्या वस्तीकडे निघाली. माझी बहीण, दोन वर्षांनी मोठी. वयाच्या सोळाव्या-सतराव्या वर्षे लग्न झालं तिचं. तिचे पती शेती करायचे. सगळं आयुष्य मातीतलंच. अचानक काही झालं आणि त्यात मेहुणे वारले. माझी बहीण एकटी पडली. पदरी मुलांचा गोतावळा; पण हिंमत नाही हरली ती. कोपरगावातलं घर बदलून ती इथं शेतात आली. आधी झोपडी बांधली आता दोन खोल्यांचं घर होतं. मुलांची शिक्षणं करायची. राबायला हात नाहीत; पण तिचा संघर्ष चालू होता. तिच्या कष्टाच्या आठवणी मनात दाटत असतानाच आमची गाडी तिच्या वस्तीजवळ पोहोचली होती. ऑफिसची मोठी-थोरली गाडी तिथं बांधाला उभी करून नांगरलेलं रान तुडवत आम्ही तिच्या घराकडे निघालो. ऊन रणरणत होतं. त्यावेळी शेतावर मोठी गाडी येणं हेही वेगळंच होतं. आसपासच्या लोकांचं लक्षही वेधलं जात होतं. आम्ही बहिणीच्या घराजवळ पोहोचलो. तेव्हा ती
ी कोण आलंय? हे उत्सुकतेनं
पाहात होती. तिनं ‘या’ म्हणून आत घेतलं. बसायला एक खाट होती. शेजारी चार-सहा धान्यांची पोती होती. तो काळ भारतातल्या जागतिकीकरणाचा प्रारंभीचा काळ होता. शेती हा दुर्लक्षित भाग होता अन् मनमोहनसिंग यांचा अर्थसंकल्प चर्चेचा, स्वागताचा विषय होता. आम्ही बसलो. पाणी प्यायलो. मी म्हटलं, ‘‘आम्ही जेवणार आहोत.’’ ती काय करायचं याची तयारी करायला लागली. मी आतल्या खोलीत तिच्यासोबत बसलो. प्रारंभीच खुशालीचं बोलणं झालं आणि अचानक चर्चेची गाडी राजकारणावर आली. राज्याच्या, देशाच्या धोरणावर आली. बहीण खेड्यात-वस्तीवर असली तरी तिचं वाचन, सामान्यज्ञान आणि बातम्यांची माहिती चांगली होती. चर्चेच्या ओघात ती पगारदारांवर घसरली. आर्थिक खुलेपणाचं कौतुक करताय; पण इथं पाहिलंय का शेतीत काय चाललंय? प्यायला पाणी नाही. पावसाचा भरवंसा नाही. खतांचे दर वाढलेले, मजूर मिळत नाही. शिक्षणाला तर पैसाचा मोजावा लागतो असं खूप काही ती बोलत होती.
— किशोर कुलकर्णी
Leave a Reply