राखण करीतो पाठीराखा, भाऊ माझा प्रेमळ सखा,
विश्वासाचे असते नाते, एकाच रक्तामधून येते ।।१।।
आईबाबांचे मिळूनी गुण, तुला मला हे आले विभागून,
हृदयामधली ज्योत त्यांच्या, तेवत आहे आज आमच्या ।।२।।
प्रकाश झाला परंपरेनें, त्याला माहित पुढेच जाणे,
मार्ग जरी भिन्न चालले, मूळ तयाचे खालीं रूजले ।।३।।
अघात पडतां तव वर्मी, दु:खी होऊन जाते बघ मी,
दिसत नाही कुणा हे बंधन, जीव श्वासाचे अतूट स्पंदन ।।४।।
भांडत रूसत हासत होतो, जगण्यामधला भाग असे तो,
खेच खेचता ढील सोडतां, सुटत नाहीं मग तो गुंता ।।५।।
बाह्यांगीं तूं दूर आहे जरी, तव प्रतिमा ही राही अंतरी,
बघत राहते तुझी भाऊबीज, आठवणीत मी जगते आज ।।६।।
— डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply