रविवार, दि. २६ मे २०१३
बहिष्कार हे एक उत्तम शस्त्र आहे. लोकांनी या स्पर्धेकडे पाठ फिरविली तर ही स्पर्धा बंद पडायला वेळ लागणार नाही.एरवी क्रिकेटमधील सट्टेबाजीबद्दल तावातावाने बोलणारे लोक संध्याकाळ झाली की आवर्जून टीव्हीसमोर बसतात आणि सामना पाहतात. लोकांच्या या दोगल्या वृत्तीमुळेच अनैतिक काम करणार्यांचे फावत असते.
ब्रिटिशांनी इथला उद्योग, इथला रोजगार, इथले कारागीर संपविण्यासाठी एक नामी शक्कल वापरली होती. ब्रिटिश इथला कच्चा माल जहाजात भरून ब्रिटनमध्ये घेऊन जायचे आणि तिकडे त्यावर प्रक्रिया करून तिथून पक्का माल इथे आणून विकायचे. भारताला देशोधडीला लावण्याच्या ब्रिटिशांच्या या उद्योगाला प्रत्युत्तर देण्यासाठी गांधीजींनी विदेशी मालावर बहिष्कार टाकण्याचे, विदेशी मालाची होळी करण्याचे आंदोलन सुरू केले होते आणि ते बरेच प्रभावी ठरले. आज त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसत आहे. गोरे ब्रिटिश भारतातून गेले; परंतु त्यांचे जिन्स, त्यांचे गुणसूत्र अभिमानाने बाळगणारे काळे ब्रिटिश त्यांचीच लुटीची परंपरा पुढे चालवित आहेत. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने या काळ्या लुटीच्या ज्या काही सुरस कथा समोर येत आहे ते पाहता भारतीयांच्या ज्या अक्कलशून्यतेच्या भांडवलावर ब्रिटिशांनी इथे दीडशे वर्षे राज्य केले तेच भांडवल आजही इथे ठासून भरले असल्याचे दिसते.
क्रिकेट हा खरे तर इथल्या मातीतला खेळ नाही. गोर्या साहेबाने तो इथे आणला आणि कायम गुलामीच्या मानसिकतेत वावरणार्या भारतीयांनी केवळ साहेबांचा खेळ म्हणून त्याला डोक्यावर घेतले. वास्तविक खेळाचा संबंध मनोरंजनासोबतच शारीरिक सुदृढतेसोबत असतो. खेळ हा व्यायामाचा प्रकार असायला हवा किंवा आधी तो व्यायामच असायला हवा, मनोरंजन हा नंतरचा भाग ठरतो. पारंपरिक भारतीय खेळ त्याच पठडीतले आहेत. कुस्ती, मल्लखांब, कबड्डी या खेळातून भरपूर व्यायाम होतो. क्रिकेटमध्ये व्यायामाला फारसे स्थान नाही. खेळ आणि व्यायाम परस्परांना पूरक असेल, तर दिवसभरातील किती वेळ खेळासाठी द्यायला हवा, याचेही काही प्रमाण असते. तास-दोन तास वेळ खेळासाठी भरपूर झाला. क्रिकेटचा तमाशा मात्र दिवसभर चालतो. पाच-पाच दिवसाचे सामने होतात. इतर कोणताही खेळ इतका दीर्घकाळ खेळला जात नाही. त्यामुळेच या वेळखाऊ, पैसखाऊ आणि इतर कोणत्याच दृष्टीने उपयुक्त नसलेल्या या खेळाला आम्ही देशबुडव्या म्हटले होते. हा खेळ भारतातून हद्दपार करावा, ही मागणी आम्ही सुरुवातीपासून रेटून धरली होती आणि आजही आम्ही या मागणीवर ठाम आहोत. हा खेळ खेळणार्या आणि पाहणार्या युवाशक्तीचे कोट्यवधी मानवी तास अक्षरश: वाया जातात. तेवढा वेळ या लोकांनी श्रमदानासाठी दिला, तर उभ्या भारतातील कोणताही प्रकल्प अपूर्ण राहणार नाही. या देशाच्या तरुण पिढीला या खेळाने अक्षरश: नागविले आहे. मूठभर खेळाडू या खेळातून पैसा कमावतात आणि लाखो तरुण या खेळाच्या वेडापायी आपले सर्वस्व गमावून बसतात. आता तर हा खेळ कोणत्याच अर्थाने खेळ राहिलेला नाही. हा खेळ एक स्वच्छ जुगार झाला आहे आणि आयपीएलच्या तमाशातून तेच अधोरेखित होताना दिसते.
ब्रिटिश भारतात येण्यापूर्वी चहा नावाचा प्रकार इथे कुणालाच माहीत नव्हता. घरी आलेल्या पाहुण्याचे स्वागत गुळ आणि थंडगार पाणी देऊन करण्याची आरोग्यदायी प्रथा आपल्याकडे होती. ब्रिटिशांनी पहिल्यांदा चहाचे मळे फुलविले आणि भारतीयांना चहाचे व्यसन लागावे म्हणून सुरुवातीला फुकटात ही चहा पावडर दिली. हळूहळू भारतीय लोक या चहाच्या व्यसनात अडकले आणि आज अशी परिस्थिती आहे, की जवळपास प्रत्येक भारतीयाची दिवसाची सुरुवात चहाच्या कपाने होते. भारतीयांना चहाच्या नशेत बुडविणार्या ब्रिटनमध्ये मात्र चहाला स्थान नाही. क्रिकेटच्या बाबतीत हेच केले गेले. सुरुवातीला मनोरंजनाच्या नावाखाली हा खेळ इथे आणला गेला आणि तो लोकप्रिय झाल्यानंतर आता या खेळाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जुगार इथे सुरू करण्यात आला. या जुगारात नागविला जात आहे तो सर्वसामान्य भारतीय. आयपीएल क्रिकेट स्पर्धा म्हणजे या जुगाराचा एक आदर्श अड्डा आहे. भारतात इतर कोणत्याही उत्पादनापेक्षा क्रिकेट विकणे अधिक फायद्याचे ठरते, हे लक्षात आल्यावर सट्टेबाजी ज्यांच्या रक्तात मुरली आहे अशा काही धनदांडग्यांनी क्रिकेटच्या माध्यमातून जुगाराचा धंदा सुरू केला. देश-विदेशातील खेळाडू मोठमोठ्या रकमा देऊन विकत घ्यायचे, त्यांचा संघ उभारायचा आणि त्या संघांमध्ये लुटूपुटीच्या लढाया लावून त्यावर सट्टेबाजी करायची, असा हा एकूण प्रकार आहे. पूर्वी आपल्याकडे कोंबड्यांच्या झुंजी लावल्या जायच्या, आता त्यावर कायद्याने बंदी आली आहे. त्या कोंबड्यांची जागा आता क्रिकेट खेळाडुंनी घेतल्याचे दिसते. ते कोंबडे किमान मॅच फिक्सिंग तरी करायचे नाहीत, जो ताकदवर कोंबडा असायचा तो जिंकायचा, या क्रिकेटपटूंनी कोंबड्यांपेक्षाही खालची पातळी गाठली आहे. इथे मॅच फिक्सिंग केली जाते, पैशासाठी ईमान विकला जातो आणि त्यांचा खेळ मोठ्या कौतुकाने पाहणार्यांचा विश्वासघात केला जातो. या आयपीएलच्या संघ मालकांच्या नावावर साधी नजर जरी टाकली तरी या स्पर्धेचा उद्देश लक्षात येतो. अंबानी, शाहरूख, प्रिती झिंटा, शिल्पा शेट्टी, सुब्रतो रॉय या लोकांचा क्रिकेटशी संबंध काय? प्रचंड पैसा देऊन या लोकांनी खेळाडू विकत घेतले, संघ उभा केला. हे सगळे त्यांनी क्रिकेटची आवड आहे म्हणून नव्हे तर या माध्यमातून आपल्या जवळचा काळा पैसा पांढरा करणे, काळ्या पैशाची तिजोरी फुगविणे हाच त्यांचा उद्देश होता. गेल्या सहा वर्षांपासून हा उद्योग अगदी जोशात सुरू आहे. धंदा म्हटले, की त्यात उचित-अनुचित, नैतिक-अनैतिक असा विचार केला जात नाही, इथे पैसा कमाविणे हाच एक धर्म असल्यामुळे बाकी सगळ्या गोष्टी निरर्थक ठरतात. या लोकांनी विकत घेतलेले खेळाडू शेवटी त्यांच्या तालावरच नाचणार, या खेळाडूंची निष्ठा खेळाशी निगडीत राहूच शकत नाही, एक वेळ विकली गेल्यावर भर सभेत वस्त्रहरण होत असेल तरी तक्रार करण्याचा अधिकार उरत नाही. खेळाडूंनी स्वत:ला बाजारात उभे केले, धनाढ्य खरेदीदारांनी त्यांना विकत घेतले आणि या विकत घेतलेल्या खेळाडुंना आपल्या तालावर नाचवून त्यातून पैसा कमावला. हा पैसा केवळ क्रिकेटच्या सामन्यातून, म्हणजे तिकिट विक्रीच्या पैशातून किंवा जाहिरातीतूनच कमावला असे नाही, कमाईचे केवळ तितकेच साधन असते, तर कदाचित हे बडे जुगारी या धंद्यात पडलेही नसते, खरी कमाई ‘फिक्सिंग’ च्या माध्यमातून होत होती. दिल्ली पोलिसांनी उघड केलेल्या ‘स्पॉट फिक्सिंग’ च्या रॅकेटचे विश्लेषण केल्यावर यात किमान ४० हजार कोटींची उलाढाल झाल्याचे म्हटले होते. दिल्ली पोलिसांच्या हाती केवळ एका संघातील तीन खेळाडू लागले आहेत. या स्पर्धेत नऊ संघ सहभागी आहेत. साधे समीकरण मांडायचे तर किमान ३६० हजार कोटींची उलाढाल या स्पॉट फिक्सिंगच्या माध्यमातून झाली असण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रावरील कर्ज साधारण दोन लाख कोटींचे आहे आणि या एकाच स्पर्धेत साधारण चार लाख कोटींची सट्ट्याच्या माध्यमातून उलाढाल झाली, ही तुलना लक्षात घेता काळ्या पैशाचा किती प्रचंड बाजार या स्पर्धेच्या निमित्ताने मांडला जातो, हे समजू शकते. स्पर्धेचे हे सहावे वर्ष आहे. दरवर्षी चार लाख कोटी या हिशेबाने आतापर्यंत २४ लाख कोटींचा सट्टा लावला गेला, असे म्हणता येईल. हे सगळे आकडे केवळ ‘स्पॉट फिक्सिंग’ शी संबंधित आहे. जुगारी संघ मालकांनी काही सामनेदेखील फिक्स केले असण्याची शक्यता आहे, दिल्ली पोलिसांनी तसा संशय बोलून दाखविलेलाच आहे. स्पॉट फिक्सिंगच्या तुलनेत मॅच फिक्सिंगमधील कमाई किंवा उलाढाल किमान दहा पट अधिक असते. इतकी प्रचंड उलाढाल असेल तर स्वाभाविकच त्यात सहभागी होणार्यांना त्याचा त्या प्रमाणात मोबदला दिला जात असेल, या प्रकरणात सापडलेल्या खेळाडुंना सट्टेबाजांनी दारू, मुली, महागड्या भेट वस्तू मुबलक प्रमाणात पुरविल्याचे उघड झाले आहेच. आता प्रश्न एवढाच उरतो, की हे ठरवून खेळले जात असलेल्या जुगाराला लोकांनी महत्त्व किती द्यावे? जुगारात किमान कोणता पत्ता उघडेल किंवा कोणता आकडा उघडेल हे निश्चित नसते, इथे तर काय उघडायचे किंवा कोणता निकाल लावायचा हे आधीच ठरविले जाते. स्पॉट फिक्सिंगमध्ये होणारी फसवणूक तर अधिकच भयानक आहे. स्पॉट फिक्सिंगमध्ये लोक एखाद्या चेंडूवर काय होईल यावर पैसे लावतात. लोकांना ते छोट्या पडद्याच्या माध्यमातून कळते; परंतु सट्टेबाज प्रत्यक्ष स्टेडियममध्ये, काही तर थेट व्हीआयपी बॉक्समध्ये उपस्थित असतात. त्यांना प्रत्यक्ष दिसणारा क्षण आणि छोट्या पडद्याच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहचणारा तोच क्षण यात जो काही वेळ मिळतो त्याचा अगदी बेमालूम गैरफायदा हे सट्टेबाज घेत असतात. त्या चेंडूवर काय झाले हे त्या सट्टेबाजाला आधी कळते आणि तो भाव उघड करतो. सट्टा लावणार्या लोकांना ते कळायला थोडा वेळ लागतो आणि तेवढ्या काळात लाखोंची उलाढाल झालेली असते आणि अर्थातच ती सगळी कमाई सट्टेबाजांच्या खिशात गेलेली असते. या सगळ्या प्रकारातून केवळ काळा पैसाच निर्माण होतो कारण हा सगळाच व्यवहार दोन नंबरचा असतो. काळा पैसा जमा करणे हा देशद्रोहाचा गुन्हा आहे, कारण काळा पैसा अधिकृत चलनातून बाद झालेला असतो. कोणत्याही अर्थव्यवस्थेला सर्वाधिक धोका या काळ्या पैशाचाच असतो आणि भारतात हाच काळा पैसा निर्माण करणारी एक मोठी फॅक्टरी म्हणून आयपीएलकडे बघितले जाते. हा काळाबाजार, ही अनैतिकता, हा देशद्रोह थांबवायचा असेल तर त्यावर बहिष्कार घालणे हाच एकमेव उपाय आहे. नाना पाटेकरला संजय दत्तच्या बाबतीत विचारले असता त्याने नेहमीप्रमाणे अगदी सडेतोड उत्तर देत म्हटले की तो गुन्हेगार असेल तर त्याने शिक्षा भोगायलाच हवी, शिवाय ज्या लोकांना तो गुन्हेगार आहे असे वाटते त्यांनी त्याचे चित्रपट पाहू नये, तो शिक्षा भोगून बाहेर येणार नाही तोपर्यंत मी तरी त्याचे चित्रपट पाहणार नाही. आयपीएलच्या बाबतीतही हेच व्हायला हवे. ही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या जुगारी लोकांनी सुरू केलेली स्पर्धा आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून काळ्या पैशाची प्रचंड उलाढाल केली जाते, सट्टेबाजी होते, स्पॉट फिक्सिंग, मॅच फिक्सिंग होते, असे ज्यांना वाटते त्यांनी ही स्पर्धा पाहू नये.
बहिष्कार हे एक उत्तम शस्त्र आहे. लोकांनी या स्पर्धेकडे पाठ फिरविली तर ही स्पर्धा बंद पडायला वेळ लागणार नाही. एरवी क्रिकेटमधील सट्टेबाजीबद्दल तावातावाने बोलणारे लोक संध्याकाळ झाली की आवर्जून टीव्हीसमोर बसतात आणि सामना पाहतात. लोकांच्या या दोगल्या वृत्तीमुळेच अनैतिक काम करणार्यांचे फावत असते. प्रचंड प्रमाणात काळा पैसा निर्माण करून देशाच्या अर्थव्यवस्थेला धोका उत्पन्न करणारी ही स्पर्धा आम्ही निषेधार्ह मानतो आणि आमचा निषेध केवळ तोंडपूजा नाही. आम्ही आमच्या दैनिकातून आयपीएलचे वृत्तांकन बंद करून आमचे प्राथमिक कर्तव्य बजावले आहे. कुणीतरी सुरुवात करायची असते, ती आम्ही केली आहे. उद्या हे बहिष्काराचे लोण हळूहळू पसरत जाईल आणि एक दिवस क्रिकेट नावाचा धंदा इथे गिर्हाईकच उरले नसल्याने कायमचा बसेल. तो सुदिन लवकर यावा, हीच आमची अपेक्षा!
फेसबुकवर प्रहार वाचण्यासाठी:
Prahar by Prakash Pohare टाईप करा
प्रतिक्रियांकरिता:
Email: prakash.pgp@gmail.com
Mobile No. +९१-९८२२५९३९२१
— प्रकाश पोहरे
Leave a Reply