महाराष्ट्राचा गौरव करणारी अनेक गीते अनेक कवींनी लिहिलेली आहेत. यातली काही निवडक महाराष्ट्र गीते या मालिकेत सादर करत आहोत.
श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी लिहिलेलं हे एक महाराष्ट्रगीत.
बहु असोत सुंदर संपन्न की महा ।
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ।।
गगनभेदी गिरीविण अणु नच जिथे उणे ।
आकांक्षांपुढती जिथे गगन ठेंगणे ।
अटकेवरी जेथिल तुरंगि जल पिणे ।
तेथ अडे काय जलाशय नदाविणे ।
पौरुषास अटक गमे जेथ दुःसहा ।
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ।।
प्रासाद कशास जेथ हृदयमंदिरे ।
सद्भावांचीच भव्य दिव्य आगरे ।
रत्नां वा मौक्तिकांही मूल्य मुळी नुरे ।
रमणींची कूस जिथे नृमणीखनि ठरे ।
शुद्ध तिचे शीलही उजळवी गृहा ।
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ।।
नग्न खड्ग करि उघडे बघुनि मावळे ।
चतुरंग चमूचेही शौर्य मावळे ।
दौडत चहुकडुनि जवे स्वार जेथले ।
भासति शतगुणित जरी असति एकले ।
यन्नामा परिसुनि रिपु शमितबल अहा ।
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ।।
विक्रम वैराग्य एक जागि नांदती ।
जरीपटका भगवा झेंडाही डोलती ।
धर्म राजकारण समवेत चालती ।
शक्ति युक्ती एकवटुनि कार्य साधिती ।
पसरे यत्कीर्ती अशी विस्मयावहा ।
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ।।
गीत मराठ्यांचे श्रवणी मुखी असो ।
स्फूर्ती दीप्तीधृतिही जेथ अंतरी ठसो ।
वचनी लेखनीही मराठी गिरा दिसो ।
सतत महाराष्ट्रधर्म मर्म मनी वसो ।
देह पडो तत्कारणि ही असे स्पृहा ।
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ।।
कवि – श्रीपाद कृष्ण कोल्हटकर
अर्थ सांगा
सर अर्थ सांगा सर
सर,
आधी एक मेल मी पाठवली आहे. ही आणखी एक.
#वापरता येण्यासारख्या आणखी कांहीं कविता /गीतें : *ही पराक्रमाची ज्योत मावळे इथें झाशीवाली ( भा.रा. तांबे यांचे काव्य), *गर्जा महाराष्ट्र माझा ( शाहीर साबळे यांचें गीत ) * भवानी आमुची आई , शिवाजी अमुचा राणा । मराठी अमुची बोली, गनीमी अमुचा बाणा । ( माझ्या आठवणीप्रमानें, हें काव्य माधव ज्यूलियन यांचें आहे). *बेलाग दुर्ग जंजीरा । वसईचा किल्ला असला । … ( चिमाजी आप्पांनी वसईचा किल्ला घेतला, त्यावर काव्य) *नीज रे नीज शिवराया ( अंगाई — गोवंदाग्रज — गडकरी) ; वगैरे वगैरे.
# महाराष्ट्रीय व्यक्तींवर , अमहाराष्ट्रीयांनी लिहिलेलें काव्य घेणार असाल तर – *कवि भूषण यांची काव्यें – ‘इंद्र जिमि जंभ पर’. ‘ऊँचे घोर मंदर के अंदर रहानेवाली ….. भूषन भनत सिवराज … ’ ( हें कुणीही गाइलेले आहे असे वाटत नाही. लताबाईंच्ता ‘शिवकल्याण राजा ’ मध्ये तें नाहीं. पण, तें काव्य प्रसिद्ध मात्र आहे, व तें मी शाळेत असतांना शिकलेलो आहे), इत्यादी *‘शिवकल्याण राजा’मधील अन्य गीतेंही आपणांला विचारात घेता येतील. *सुभद्राकुमारी चौहान यांचें ‘खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसीवाली रानी थी।’ , वगैरे वगैरे.
स्नेहादरपूर्वक
सुभाष नाईक
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा.
महाराष्ट्राची गौरवगीतें आपण वेबसाइटवर टाकता आहात, हें स्तुत्य आहे. कारण माझ्यासारख्या वयानें मोठे असलेल्यांना जरी या कविता माहीत असल्या, तरी तरुणांना ठाऊक असतीलच असे नाहीं. अर्थात, महाराष्ट्रगौरव वाचून आनंदच होईल, यात शंका नाहीं. यात आपण अनेक कविता,गीतें विचारात घेतली असतीलच; ( जसें गडकरी यांचे – मंगल देशा पवित्र देशा ; माधव ज्यूलियन यांचे – मराठी असे आमची मायबोली , वगैरे ) : तरीपण मी कांही सुचवली तर चालेल कां ? आपली अनुमती गृहीत धरून लिहीत आहे .
१. पुणें दरबारी : शत्रूच्या खड्या समशेरी । वाकती पुणें दरबारी । पेशवे मर्हाठी स्वारी । तळपती तिखट तल्वारी । २. मराठा गडी यशाचा धनी ( ही सिंहगड-तानाजी यांवर आहे. ) . ३. खबरदार जर टांच मारुनी
जाल पुढे, चिंधड्या ( शिवाजीच्या एका साधारण मावळ्यावर ) ४. रामदासांचे – मराठा तितुका मेळवावा । महाराष्ट्रधर्म वाढवावा । , ५. ‘तसें मराठे गिलचे लढले … पानपतीं , ही गडकरी यांची , ६. हा कोण इथें पडलेला ? गोकलखाँ लढनेवाला । ( ही बापू गोखले यांच्यावरील) ; ६. जयराम पिंड्ये याचें ‘ .. इत शाहजू है उत शाहजहाँ ’ ; ७. वेडात मराढे वीर दौडले सात ( प्रतापराव गुजर यांच्यावरी)) , सरणार कधी रण ( बाजी प्रभूंवरील) , या कुसुमाग्रजांच्या कविता ८. सावरकरांच्या कांहीं कविता, जसें , ‘हे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजी राजा ’ , ‘नरवीर शूर सरदार तानजी वीर’ हा पोवाडा , वगैरे ९. सिनेमातलें , ( मराठा तितुका मेळवावा ), असलें तरी, ‘शूर आम्ही सरदार …. देव देश अन् धर्मासाठी प्राण घेतलं हातीं’ हें भालजींचें गीतही विचारात घेतां येईल. इत्यादी इत्यादी. # त्याशिवाय, शनवारवाड्यावरील ‘तुझ्या विच्छिन्न रूपाला बघोनी फाटतो ऊर’ ही कविता पण दिलीत बरें होईल. गोकलखाँ , शनिवारवाडा अशा कविता include केल्यास, ‘The Rise & Fall of the Marathas’ ( गिबनच्या ‘The Rise & fall of Roman Empire’ या धर्तीवर ) , ही थीम पूर्ण होईल. # तसेंच, ‘तुझ्या विच्छिन्न रूपाला बघोनी फाटतो ऊर’ , ही ओळ आजच्या महाराष्ट्रालाही लागू होते! त्यामुळे, आजचाही संदर्भ जोडला जाऊ शकेल.
स्नेहादरपूर्वक
सुभाष नाईक