
आपल्या दुर्दैवाने आजवर आपल्याला सावरकरांबद्दल पाठ्य पुस्तकातून फक्त दीड पान माहिती दिली गेली. त्यांच, लंडन मधील कार्य,जगप्रसिद्ध बोटीतील उडी,आणि अंदमानातील दोन काळ्या पाण्याच्या शिक्षा. पुस्तकातील सावरकर एव्हढ्यावरच जाणूनबुजून संपवले गेले. गेली ७० वर्षे सावरकरांवर जाणूनबुजून अन्याय केला गेला. केवळ अन्यायच नाही तर बदनामी व उपेक्षा केली आहे.सावरकर हे केवळ क्रांतिकारक,द्रष्टे, समाजसुधारक किंवा भाषासुधारक नव्हते.तर त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू होते.त्यातील काही पैलू माझ्या लिखाणातून क्रमिक लेखात मांडण्याचा प्रयत्न करणार आहे कारण पुढील पिढीला व ज्यांना सावरकर आणखी समजून घ्यावसे वाटतात त्यांच्यासाठी मी हा अल्पसा प्रयत्न करत आहे,तरी तुम्हाला लिखाण आवडेल अशी मी आशा करतो.
लेख क्रमांक १ – वीर सावरकर -बालपणीचे भाषण –
वीर सावरकरांना घरी तात्या म्हणत. (पुढे ते सार्वजनिक जीवनात तात्याराव सावरकर म्हणून संबोधले जात).बाबा सावरकर म्हणजेच सावरकरांचे थोरले बंधू, यांच्या मेहुण्याचे लग्न कर्जतला होते. त्यासाठी तात्या कर्जतला गेले होते.कर्जत जवळच्या दहिवली गावात वक्तृत्वस्पर्धा होणार होती.त्यासाठी तात्यानी भाग घेतला व आपल्या ओघवत्या वाणीने भाषण केले.टाळ्यांचा कडकडाट झाला.त्यांना पहिले पारितोषिक मिळाले.अध्यक्ष म्हणाले “या मुलाचे वय केवळ १४ वर्षे आहे.इतका लहान मुलगा ,इतका उत्तम लेख स्वत: लिहून भाषण करू शकेल यावर विश्वास ठेवणे कठीण आहे.” तात्यांना राग अनावर झाला.ते म्हणाले “ अध्यक्ष महाराज , मी निबंध स्वत:च लिहिला आहे. मी तसे व्यवस्थापकांना सांगितले होते.आणि आपण आरोप करता कि मी तो लिहीला नसावा हा तर माझा अपमान आहे.आणि पुरावा काय तर माझे वय फक्त १४ आहे म्हणून लहान वय हेच कारण असेल तर ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली हे सुद्धा खोटे मानावे लागेल.”(तात्यांचे वक्तृत्व इतके प्रभावी होते कि इंग्लंड मध्ये शिकायला आलेला विलासी आयुष्य जगणारा एक विद्यार्थी मदनलाल धिंग्रा तात्यांच्या भाषणाने प्रभावित होतो काय आणि कर्झन वायलीचा खुन करून फासावर जातो काय )
स्पर्धेच्या कार्यवाहानी तात्यांना घरी जेवायला बोलावले व म्हणाले “आज तू खूपच छान बोललास. मंडळाने तुला बक्षीस द्यायचे ठरवले आहे.लोकमान्यांच्या केसरी सारखेच शिवरामपंत परांजपे यांचं ”काळ” साप्ताहिक आहे ते तुला एका वर्षासाठी भेट म्हणून पाठवू.सावरकर आनंदाने तयार झाले.लहान वयात उत्तम भाषण करणारे म्हणून साप्ताहिक वर्षासाठी भेट म्हणून मिळवणारे सावरकर हे पहिले विद्यार्थी होते.
रवींद्र वाळिंबे
संदर्भ व आभार (शतपैलू सावरकर-लेखक हरिश्चंद्र त्र्यंबक देसाई ).
Leave a Reply