सावरकर भाषाशुद्धीचे कट्टर पुरस्कर्ते होते. त्यांचा आग्रह होता, आपली मातृभाषा समृद्ध असायला हवी त्यावर इंग्रजी भाषेचा प्रभाव कशासाठी हवा? त्यांचे म्हणणे होते की problem न म्हणता समस्या म्हणा.
एकदा महामहोपाध्याय पोतदार सावरकरांना रत्नागिरीत भेटायला गेले. ते म्हणाले “ तात्याराव आम्ही जे परकीय शब्द आत्मसात केले आहेत व पचवून टाकले आहेत,ती आमची विजयचिन्हे आहेत” सावरकर म्हणाले “तुम्ही चुकताय ,ती आमची विजयचिन्हे नव्हेत तर भाषेच्या अंगावरील व्रण आहेत”. आपल्या भाषेत परकीय शब्द घुसतात कसे याचा सावरकरांनी बारकाईने अभ्यास केला. मराठी भाषेत परकीय शब्द ओळखता यावेत म्हणून सावरकरांनी “मराठी भाषेचे शुद्धीकरण “ हे पुस्तक लिहिले. हायस्कूल होते त्याचे प्रशाला झाले. अत्रे प्रिन्सिपल होते त्याचे “आचार्य” हे नामकरण सावरकरांनी केले. २० जून १९३७ ला सावरकरनी कोल्हापूर येथील “हंस पिक्चर्स” ला भेट दिली तेथे त्यांना सर्व पाट्या इंग्रजीत लिहिलेल्या दिसल्या. त्यांनी पेंढारकरांना मराठी भाषेचे महत्व पटवून दिले .
सावरकरांनी इतर भाषेतील शब्दाना प्रती मराठी शब्द सुचवले आणि आश्चर्य म्हणजे आज ते मराठीत इतके रुळले आहेत की सावरकरांनी ही प्रतीशब्द दिले आहेत, यांची साधी कल्पनाही आपल्याला नसते. त्यातील काही मराठी प्रती शब्द,(कंसातील शब्द परकीय भाषेतील),दिनांक,( तारीख ),क्रमांक ( नंबर) इतिवृत्त ( अहवाल) नगरपालिका( म्युनसिपालटी) महापालिका (कोरपोरेशन) महापौर ( मेयर ) पर्यवेक्षक ( सुपरवायझर)विश्वस्त ( ट्रस्टी) शिरगणती ( खानेसुमारी) नभोवाणी ( रेडियो) दूरदर्शन ( टेलिव्हिजन). याचा अर्थ परकीय भाषा शिकूच नयेत असे सावरकरांचे म्हणणे नव्हते. आपल्या प्रगतीसाठी परकीय भाषा शिकाव्या,पण मातृभाषेला विसरता नये असे सावरकर म्हणत.
— रवींद्र वाळिंबे.
संदर्भ व आभार-(शतपैलू सावरकर-लेखक हरिश्चंद्र त्र्यंबक देसाई)
Leave a Reply