रामदास व सावरकर या दोघानी लहानपणी बलोपासना केली. समर्थ रामदास रोज बाराशे नमस्कार घालीत तर सावरकर जोर बैठका , पोहणे,धावणे डोंगर चढणे असा व्यायाम करीत. त्यामुळे दोघांचेही शरीर काटक व सोशीक बनले होते. लहानपणी दोघेही देव भक्त होते. मोठेपणी दोघांनाही खरा देव कोणता याची ओळख पटली. समर्थांना विश्वव्यापाक रामाचे रूप समजले. सावरकरांना मूर्तिपूजा गौण व मातृभूमीची सेवा महत्वाची ही समजले. दोघेही प्रयत्नवादी होते. समर्थ म्हणत “जितुके काही आपणास ठावे l तितुके हळूहळू शिकवावे l शहाणे करून सोडावे बहुत जन l हेच सूत्र सावरकरांनी अंदमानात अवलंबिले बनद्यांना लिहा वाचायला शिकवले. राजबंदीना राज्यशास्त्र, अर्थशास्त्र याचा अभ्यास करायला प्रोत्साहन दिले.
दोघेही एकांतप्रिय होते.एखादे कार्य करत असत तेव्हा सामर्था सभोवती शिष्य असत, पण ते संपल्यावर ते एकांतात जात “एकांती चाळणा करावी l धारणा उदंड धरावी l नाना विचारणा करावी l अरिमित्रांची l सावरकर सुद्धा कार्यकर्त्यांचा गराडा संपल्यावर एकांतात चिंतानासाठी जात. अखंड सावधानता ही सुद्धा दोघांची विशेषता होती. समर्थ सांगत “ प्रसंग हा तूफान रे l नकोचि वेवधान रे l डॉक्टर शामाप्रसाद मुखर्जी काश्मिरात जाऊन सत्याग्रह करणार ही कळल्यावर एका विश्वासू माणसाच्या हाती सावधानतेचा इशारा देणारे पत्र एका कार्यकर्त्यासोबत पाठवले टपालाने नाही. समर्थ कुबडीत शस्त्र बाळगत तर सावरकर खिशात लहान खंजीर बाळगत. आपल्या १८५७ वरील पुस्तकावर इंग्रज बंदी घालणार ही सावरकरांना ठाऊक होते म्हणून त्यांनी ते पुस्तक हॉलंड मध्ये छापले व गुप्तपणे सगळीकडे पाठवले.
— रवींद्र वाळिंबे
संदर्भ व आभार-(शतपैलू सावरकर-लेखक हरिश्चंद्र त्र्यंबक देसाई ).
Leave a Reply