लोकमान्य टिळक आणि सावरकर हि गुरु शिष्याची एक आदर्श जोडी होती. न. चि केळकर यांनी ८ ऑगस्ट् १९४१ च्या केसरीत लिहिले होते की “ सावरकर यांच राजकारण टिळकांच्या कित्त्यावर तेलकागद ठेवून काढलेल्या पुस्तीसारखे आहे “ खरे तर राजकारण नव्हे तर अनेक बाबतीत गुरुशिष्या सारखे होते. देश पारतंत्र्यात नसता तर टिळक तत्वज्ञान, उच्च गणित, प्रमेय आदि विषयात रमले असते तर सावरकर साहित्य व काव्य यात रमले असते. पण दोघानी स्वातंत्र्य मिळवणे ही ध्येय मानून आपल्या उपजत आवडी बाजूला ठेवल्या. स्वराज्य हे मागून मिळणार नसत तर ते लढून मिळवावे लागते ही समजून होते. शत्रूची अडचण, तो आपला सुवर्णक्षण ही दोघेही समजून होते. दोघेही सडेतोड बोलणारे होते. मुंबईचे गव्हर्नर विलीन्डन यांनी १९१६ मध्ये टिळकांना भेटायला बोलावले व म्हणाले “तुम्ही अवैध व क्रांतिकारक उपायांनी ब्रिटिश सरकार उखडून टाकणार “ टिळक म्हणाले “ होय,हे शक्य असते तर तसेच केले असते, पण असले आयरीश मार्ग चोखाळणे सध्या तरी अशक्य आहे,म्हणून सध्या वैध मार्गानेच झुंजणार “ १९३९ साली लॉर्ड लिनलिगथो यांनी सावरकरांना चर्चेला बोलावले,तेव्हा त्यानीही ताडकन सांगितले “चालू युद्धात प्रत्येक राष्ट्र आपल्या स्वार्थासाठी लढत आहेत, मीही अजून क्रांतिकारकच आहे,म्हणून सैनिकीकरणाच्या प्रचाराने स्वदेश रक्षणार्थ तुमच्याशी सहकार्य करीत आहोत.”
स्वातंत्र्याच्या दृष्टीने नेपाळचे महत्व टिळक व सावरकर दोघेही ओळखून होते. सातारचे राजे आबासाहेब, यांचे चिरंजीव भाऊ महाराज यांच लग्न नेपाळच्या आदिराजांच्या मुलीशी लावून दोन घराण्याचा संबंध जोडावा यासाठी टिळक यांनी प्रयत्न केले होते. सावरकर यांच्या अथक प्रयत्नांमुळे नेपाळचे ठाकूर चंदनसिंग हिंदुमहासभेच्या अकोला अधिवेशनाला उपस्थित होते. १९४१ मध्ये ग्वाल्हेरच्या महाराजांनी नेपाळ राजकन्या लेखादेवीशी विवाह केला,( या लेखादेवी म्हणजेच जोतिरादित्य शिंदे यांच्या आजी,राजमाता विजयाराजे शिंदे.) त्यावेळी सावरकर यांनी त्यांचे अभिनंदन केले व म्हणाले “ महाराष्ट्र नि नेपाळ या दोन लढाऊ प्रदेशाचे संघटन होत आहे”.अस्पृश्यता नष्ट व्हावी म्हणून टिळक व सावरकर दोघेही आग्रही होते. दोघांकडे अभ्यासू वृती होती.मन्डाले येथे गीतारहस्य लिहिण्या आधी टिळकांनी सुमारे ४०० ग्रंथ अभ्यासले होते. सावरकर यांनी अंदमानात ग्रंथालय उभारले होते व अनेक ग्रंथ अभ्यासले होते.
— रवींद्र वाळिंबे
संदर्भ व आभार-(शतपैलू सावरकर-लेखक हरिश्चंद्र त्र्यंबक देसाई )
Leave a Reply