नवीन लेखन...

बहुगुणी बालकलाकार- ओमकार तोडकर

“अभिनय हा गुण, त्याच्यात अगदी जन्मत:च भिनलाय, त्याच्या बोलण्यातून इतकी सहजता जाणवते,जी रुपेरी पडद्यावरील कोणत्याही भूमिकेला साजेशी ठरेल; तर असा अभिनयसंपन्न बालकलाकार ओमकार तोडकर सांगतोय त्याच्या आगामी छावणी चित्रपटातील त्याच्या भूमिकेविषयी, आणि आजवरच्या त्याच्या चित्रपट,नाटकं व इतर “प्रोजेक्ट्स” विषयी फक्त आणि फक्त मराठीसृष्टी.कॉम ला दिलेल्या या खास मुलाखतीतून…”

प्रश्न : अभिनयाची सुरुवात कधी,कुठे,कशी झाली?
ओमकार: माझी बहिण अभिनयाच्या शिबीरात जात असे, कालांतराने मी सुध्दा त्या शिबीरास जाऊ लागलो, तेव्हा माझ्या वडिलांना, आणि तेथील शिक्षकांना कळलं की माझ्यात ही अभिनयाचे गुण आहेत मग तिथुन या कलेला आणखीन चालना ब प्रोत्साहन मिळत गेले, तसंच काका आणि वडिलसुध्दा लेखक-दिग्दर्शक असल्यामुळे वेळोवेळी मार्गदर्शन मिळत गेले, बहिणसुध्दा नृत्यांगना असल्याने तिने त्या पध्दतीने मला प्रशिक्षण दिले; खरंतर सांगलीतुनच मी कारर्कीर्दीला सुरुवात केली ती म्हणजे नाटकांमधून; पुढे “ध्यास-एक नवी ओळख”, “करुणा शिवशंकरा” सारखे चित्रपट मी केले, यामध्ये बालकलाकार म्हणून माझ्या मुख्य भूमिका होत्या.
प्रश्न : तुझा पहिलाच चित्रपट “ध्यास-एक नवी ओळख”साठी सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून म.टा. सन्मान चा पुरस्कार मिळाला तर त्याकडे तु कशा रितीने पाहिलंस?
ओमकार: एकतर सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून नामांकन मिळाल्यानंतर खुप आनंद झालेला होता, मनापासून वाटतही होतं की पुरस्कार मिळेल. पण पुरस्कार सोहळ्याच्यावेळी माझ्या वडिलांना अनेकांनी सांगितलं की ओमकार ला पुरस्कार मिळणार नाही, कारण त्याच्या तोडीस-तोड अनेक बालकलाकार आहेत, मग मी काही काळ अपेक्षाच सोडून दिली होती. पण ज्यावेळी एकदम घोषणा झाली “सर्वोत्कृष्ट बालकलाकार ओमकार तोडकर” ध्यास-एक नवी ओळख या सिनेमासाठी तेव्हा खरंच खुप आनंद झालेला, कारण अचानक इतका मोठा सन्मान आपल्याला मिळणं मग तिथून मी आणखीन नावारुपास येत गेलो, इंडस्ट्रीत सुध्दा यामुळे ख्याती मिळाली.
प्रश्न : “ध्यास-एक…”नंतर तुला अनेक चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली तर त्या भूमिका आणि चित्रपटसृष्टीतला वावर तुला किती आव्हानात्मक वाटला?
ओमकार: पहिला चित्रपट यशस्वी ठरल्यानंतर,दुसर्‍या चित्रपटाची ऑफर आलेली, मग वाटलं की आपण हे आव्हान कसं काय पेलणार पण सवय होत गेली. कलाकारांशी ओळखी वाढत गेल्या, तसंच मैत्रीपूर्ण वातावरणामुळे आणि सर्वांच्या सहकार्याने मी खुप शिकलो. आता कॅमेर्‍या समोर अगदी सहज अभिनय होतो; मुळात आत्मविश्वास निर्माण झालेला आहे. त्यामुळे सिनेसृष्टीत वावरण्यासाठी सध्यातरी आव्हानात्मक असं काही वाटत नाही.
प्रश्न : सध्या तु “छावणी” या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेस?काय सांगशील या सिनेमातील तुझ्या रोल विषयी?
ओमकार: हा चित्रपट दुष्काळग्रस्त परिस्थितीवर भाष्य करतो; पावसाविना होरपळून गेलेला शेतकरी, प्राण्यांचं जीवन, तसंच दुष्काळाच्या नावानं होणारा भ्रष्टाचार यावर हा चित्रपट आधारीत आहे; मी या चित्रपटात निवृत्ती नावाची व्यक्तिरेखा साकारतोय. “निवृत्ती”च्या वडिलांनी त्याला सावकाराकडे कामासाठी ठेवलय कारण त्यांना दुष्काळी परिस्थितीत सुध्दा स्वत:ची “चैन” महत्वाची वाटतेय; वास्तवपूर्ण अशी भूमिका उभं करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे.
प्रश्न : चित्रपटाची कथा वास्तवदर्शी आहे, तर व्यक्तीश: तुझ्या निवृत्ती या भूमिकेसाठी किती अभ्यास केलास?
ओमकार: हा चित्रपट वास्तवदर्शी असला तरीपण निवृत्ती या भूमिकेसाठी कोणतीही पुस्तकं उपलब्ध नव्हती, किंवा कोणत्याही दुष्काळी भागातील माणसं त्याविषयी काय सांगूसुद्धा शकत नव्हते. म्हणून मी स्वत: दुष्काळी भागातील माझ्या वयाच्या मुलांशी चर्चा केली, काही काळ त्यांच्यात वावरलो त्यामुळे त्यांचं जगणं कसं आहे हे लक्षात ठेवून “निवृत्ती” हे कॅरेक्टर छावनीतुन उभं करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
प्रश्न : तुझे वडिलदेखील एक कलाकार आहेत तेव्हा त्यांचं मार्गदर्शन कश्यारितीनं मिळत गेलं?
ओमकार: मी आजवर इथपर्यंत पोहोचलोय त्यामध्ये निश्चितच वडिलांचं खुप मोठं योगदान आहे, ऑडिशन ला तयारी कशी करायची ते स्टेजवर कसं वावरायचं हे मला वडिलांमुळे समजलं. सुरुवातीला मला सांगावं लागत असे की कशी भूमिका साकारायची, पण आता मी बर्‍यापैकी शिकलेलो आहे, याचं सारं श्रेय माझ्या वडिलांना जातं.
प्रश्न : इतक्या कमी वयात अनेक मान्यवरांसोबत तु काम केलस, तसंच मुंबईचं वातावरण हे सर्व तुला किती अनुरुप होतं?
ओमकार: सांगली सारख्या छोट्या शहरातील असल्यामुळे निश्चितच माझ्यासाठी या इंडस्ट्रीतील प्रत्येक गोष्ट नवखी होती. मुंबई विषयी फक्त ऐकून होतो पण पहाण्याची इच्छा खुप होती. तसंच सिनेसृष्टीत पदार्पण केल्यानंतर मी आधी इथल्या परिस्थितीचा थोडक्यात आढावा घेतला; प्रोफेशनल लाईफ व पर्सनल लाईफ याचा ताळमेळ कसा साधायचा हे मला कळलं; इथल्या सर्वच कलाकारांनी मला खुप मार्गदर्शन केलं, मला उपयोगी पडतील अशा “टिप्स” देखील दिल्या; आणि अशा तर्‍हेनं मी या इंडस्ट्रीतील वातावरण व राहणीमान आत्मसात केले.
प्रश्न : सध्या तु दहावीत शिकतोयस तर “शुटींगचं शेड्युल” आणि “अभ्यास” यातील ताळमेळ कसा साधतोस?
ओमकार: खरं तर वर्षाच्या सुरुवातीलाच ठरवलेलं की यावर्षी मी कोणतीही फिल्म किंवा नाटक यापैकी काहीही करणार नाही पण “छावणी” चित्रपटाचं चित्रीकरण बाकी होतं तसंच विषयात वेगळेपण आहे, भूमिका आव्हानात्मक असल्यामुळे केवळ हा चित्रपट पूर्ण करायचा हे माझ्या डोळ्यासमोर होतं; शाळेतून देखील मला शिक्षकांचा खुप चांगला पाठींबा मिळाला; अभ्यासात अडचण आलीच तर नक्कीच मार्गदर्शन मिळत असे, त्यामुळेच मी निर्धास्तपणे हा चित्रपट करु शकलो.
प्रश्न : अभिनय आणि अभ्यासा व्यतिरिक्त तुला जेव्हा मोकळा वेळ मिळतो, तेव्हा कोणते उपक्रम असतात किंवा “तुझ्या” छंदाविषयी काय सांगशील?
ओमकार: अभ्यासा व्यतिरिक्त खेळ तसंच नृत्य करायला आवडते त्याशिवाय विविध वस्तु बनवतो “रोबोट्स”, “मशीनवर चालणारी जहाजे”. म्हणजे टेक्नॉलॉजीशी निगडीत वस्तु बनवणं मला भावतात.
प्रश्न : मनोरंजन व कलेच्या माध्यमातच कारकीर्द घडवायची असा निश्चय तु केला आहेस का? किंवा याव्यतिरिक्त सुध्दा आणखीन काही विचार आहेत?
ओमकार: मनोरंजन, अभिनय, कला हे माझं पहिलं प्रेम आहे. त्यामुळे नाटकं, चित्रपट मी करत राहीन. पण अर्थार्जनाच्या दृष्टीनं वेगळा विचार केला आहे, कोणतातरी उद्योग,किंवा स्वत:चा व्यवसाय व मनाला भावेल अश्या क्षेत्रात करियर घडवण्याची निश्चितच कुप इच्छा आहे.
प्रश्न : अॅडफिल्म, मालिका करायला आवडतील का?
ओमकार: अॅडफिल्म मध्ये मी बर्‍यापैकी कामं केलेली आहेत. मालिकांमध्ये ही काम करायला आवडेल पण सध्या मला अभ्यासावर लक्ष केंद्रीत करायचय, मालिकांच्या अनेक ऑफर्स येत असतात, पण चित्रीकरण मुंबईत होत असल्यामुळे प्रत्यक्षात तिथे जाता येणं शक्य नाही. म्हणून तुर्तास तरी मी मालिकांचा विचार बाजुला ठेवलाय. एकदा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर त्यासाठी मी पुढाकार घेईनच, कारण हे सर्व मला “ट्राय” करायचं आहे.
(ही मुलाखत छावणी या चित्रपटाच्या शुटींग दरम्यान ओमकार तोडकर याने मराठीसृष्टी.कॉम ला खास वेळात वेळ काढून दिली. त्याबद्दल त्याचे आभार आणि त्याच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा)


— सागर मालाडकर

Avatar
About सागर मालाडकर 111 Articles
श्री. सागर मालाडकर हे आकाशवाणीवरील निवेदक असून ते मराठीसृष्टीसाठी नियमितपणे लेखन करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..