गजानन महाराजांच्या पोथीची पारायण मी काहीवेळा केली आहेत . दररोज त्याचा एक तरी अध्याय वाचायचा असेही कितीतरी वेळा केले आहे . त्याची CD अखंडपणे ऐकत कितीतरी वेळा प्रवासही केला आहे . पण याआधी कधी झाले नाही असे आज़ झाले . मी आत्ता यातले काहीही करत नसतानाही अचानक माझ्या मनात आले की संतकवी श्री दासगणू महाराज क्रुत ” श्री गजानन विजय ” या पोथी मधल्या अनेक ओव्या शेअर – बाजारांच्या संदर्भात लागू पडतात .
आता हेच बघा ना ! या पोथिच्या दहाव्या अध्यायाच्या १६१ व्या ओवीत एक ओळ आहे . . .
” बहुरुप्याचे राजेपण ¦
कोठून टिके बाजारी ”
ही ओळ आता अचानक आठवली आणि असं पटकन मनात आले की हे कोणत्याही काळातील , कोणत्याही स्थितितील , कोणत्याही देशातील शेअर – बाजाराचे हे किती चपखल वर्णन आहे . आजमितिला आपल्या शेअर – बाजाराचा निर्देशांक अशा पातळीवर आहे की त्याबाबत जरा नीट विचार करा असे कोणी कोणाला सांगायला गेले तर लगेचच त्याची संभावना ” नतद्रष्ट ” अशी केली जाईल . पण अशा बाजारात हौशी – नवशे – गवशे असे शेअर्स आणि गुंतवणूकदार असे दोघेही एकदम दिमाखात , तोर्यात मिरवत असतात . कारण अशा बाजारात इंद्राचा ऐरावत आणि श्यामभटाची तटानी या दोघांचेही भाव चढे असतात . त्यामुळे एखादा शेअर घेताना जरी चूक झाली तरी ती चूक अशा बाजारात निस्तरताना सुध्दा नफा पदरी पडतो . आणि म्हणूनच अशा बाजारात वावरताना याच पोथिच्या तिसऱ्या अध्यायातील ९९ व्या ओवितिल एक ओळ लक्षात ठेवणे आवश्यक आहे . ती ओळ अशी :
” उगीच पाहून पिवळेपण
सोने पितळेस मानू नका ” .
कारण उतरत्या बाजारात सोने आणि पितळ यातला फरक उघड होत राहतो . तेजिच्या बाजारात पितळ बहुरुप्यासारख सोने म्हणून कितीही वावरले तरी याच ओविचा पूर्वार्ध आठवावा लागतो . तो पूर्वार्ध असा :
” म्हणून बहुरुप्या कारण
जपण आहे अवश्य जाण ” .
अशी जाणीव आपल्याला होत राहण्यासाठी अनेकदा तद्न्य सल्लागारांची मदत घ्यावी असे सांगितले जाते . ते योग्यच आहे . पण असा सल्लागार निवडताना त्याबाबतचे निकष काय असावेत याचे विवेचन गजानन महाराजांच्या पोथिच्या तिसऱ्या अध्यायातील ८८ व्या ओवित फार छान पध्दतीने सांगितले आहे . ती ओवी अशी :
” मात्र औषधी देणारा
शास्त्रात असला पाहीजे पुरा
औषधीचा पसारा
आहे अवगत जयासी ” .
कदाचित अशा मदतीची या क्षेत्रातील माहिर माणसांना आवश्यकता वाटत नसेलही . कारण त्यांची अवस्था या पोथिच्या चौदाव्या अध्यायातील १४५ व्या ओविच्या
” स्वानुभवाच्या ठायी जाणा
वाव न तर्काकारणे ”
अशी तरी असते नाहीतर याच पोथिच्या एकोणिसाव्या अध्यायातील १०६ व्या ओविच्या
” मुक्कामास गेल्यावर
मार्गांचा न उरे विचार ”
अशी असते . पण ” अर्थ ” असो नाहीतर ” परमार्थ ” अशी चांगल्या अर्थाने ” पोचलेली ” माणसे कमीच असतात . बाकी सगळेच तुमच्या – माझ्यासारखे . रास्ता शोधणारे . त्यामुळे याच पोथीत एकोणिसाव्या अध्यायाच्या १२३ व्या ओवित म्हणले आहे तसे
” जो मुक्कामास जाई
त्याचे कौतुक करणे असे ”
अशीच भूमिका स्वीकारने योग्यच असते . पण हे कौतुक केवळ शाब्दिक असून पुरत नाहि . तसे प्रयत्न ही करावे लागतात .
हे लिहीत असताना मला ” यश हे प्रयत्नांती असते ; वाच्यान्ती नव्हे ” या लोकमान्य टिळकांच्या विधानाची अतिशय आठवण होत आहे . नाहीतरी या पोथीच्या पंधराव्या अध्यायाचा जवळजवळ निम्मा भाग लोकमान्य टिळक यान्च्याविशयीच आहे ना ! एखाद्या आध्यात्मिक पोथीत असे स्थान मिळवणारा लोकमान्य टिळक सोडले तर दुसरा कोणताही भारतीय राजकीय नेता नसेल . असो .
असे क्रुतिशील प्रयत्न न करणाऱ्या मंडळी विषयी ( अर्थात पोथी तील ओविला शेअर – बाजार अपेक्षित नाही ) या पोथीच्या पाचव्या अध्यायातील १०६ व्या श्लोकात एकदम झणझणते अंजन घालण्यात आले आहे . ती ओवी अशी :
” तुझ्यासारखे निरुद्योगी
जन्मले आमच्यात जागजागी
म्हणून झालो अभागी
आम्ही चहू खंडात ” .
त्यामुळे हे किटाळ टाळण्यासाठी काय मार्गाने जायचे याचा विचार करावा लागतो . मुक्कामाला पोचलेल्याला मार्गाचे महत्व नसले तरी इतरांना असतेच असते . या पोथीच्या एकोणिसाव्या अध्यायाच्या १०६ व्या ओवीत याचे वर्णन अशा शब्दांत केले आहे :
” जो मार्गी चालतो नर
महत्व त्याचे त्यास
मार्ग असो कोणताही
त्याचे मुळी महत्व नाही . ”
असा मार्ग कसा आणि काय असावा याचे अतिशय मार्मिक वर्णन या पोथीच्या अनेक ओव्यात जागोजागी येत राहते . याची काही उदाहरणे खालील – प्रमाणे :
१ . ” शक्याशक्य विचार ¦सुद्न्ये करावा निरंतर
उगीच पूल सागरावर ¦ बांधवया जाऊ नये ”
( अध्याय विसावा , ओवी १४९ . )
२ . ” कोल्हा न राही उपोशीत ¦ उसाचिया फडामधे
वा पाहून बाटूकाला ¦ बैल नाही पुढे गेला ”
३ . ” हीरे गारा एक्या ठायी ¦ मिसळल्या असती जगा ठायी
पारखी तो निवडूनी घेई ¦ गार टाकून हिर्याते ” .
(पहिला अध्याय , १०७ वी ओवी )
४ . ” स्थान एक आहे म्हणुनी ¦ किंमत नाही समान
तेज हिर्याचे हिर्यालागून ¦ भूषवी न गारेला ”
( तिसरा अध्याय , ११३ वी ओवी ) .
५ . ” मोगरा , निवडूनग आणि शेर ¦ ही जमिनीची लेकर
परी किंमतीचा प्रकार ¦ निरनिराळ तो तिघांचा ”
(तिसरा अध्याय , १४५ वी ओवी ) .
असो .
हा झाला संकल्पनात्मक भाग .
गुंतवणूक क्षेत्रात सहभागी होत असताना , कार्यरत राहताना बाळगायच्या ” आचार – संहिता ” ( Code of Conduct ) किंवा ” क्रुति – आराखडा ” ( Action Plan ) याचा विचार केला तर . . . .
अर्थातच संतकवी श्री दासगनू महाराज यांच्या ” श्री गजानन विजय ” या पोथीच्या आधारे .
असा विचार करत असताना आपण एकंदरीतच गुंतवणूक क्षेत्रात , त्यातही विशेषतः शेअर – बाजारात , सहभागी होत असताना या बाजारात तर राहायचे पण आपली वैचारिक तटस्थता सोडायची नाही हे पथ्थ्य न विसरता सांभाळत राहावे लागते . तरच या क्षेत्रात यशस्वी होता येते आणि यशस्वी राहताही येते . याबाबतचा अतिशय सुंदर द्रुश्तान्त या पोथीच्या सहाव्या अध्यायातील ६८ व्या ओवीत दिला आहे . ती ओवी अशी आहे :
” गार पाण्यात राहते ¦ परी न पाणी शिरू देते
तैसेचि वागते साचे ¦ या प्रपंच माझारी ”
ही ओवी इतकी स्वयं – प्रकाशित आहे की त्याचे आणखी विवरण करण्याची आवश्यकताच उरत नाही .
हे जमवून आणणे सहज – सोप निश्चितच नाही . निदान आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांसाठी तर नाहीच नाही . कारण आपल्या सगळ्यांचीच अवस्था ” आऊ गेली देवापाशी , चित्त तिचे चपलान्पाशी ” अशीच असते . एकनाथ महाराजांच्या अनेक भारुडातही त्याच मोठ बोलके वर्णन वारंवार येत असते . पण हे जमणारच नाही असंही नसतं ना ! त्यासाठी सातत्याने प्रामाणिकपणे प्रयत्न मात्र करत राहावं लागते . त्याचं पहिले पाऊल म्हणजे काम करत राहणे . हा पैलू या पोथीच्या सहाव्या अध्यायातील ११९ व्या ओवीत असा शब्दबद्ध होतो :
” कर्ममार्ग सोडू नको ¦ विधि निरर्थक मानू नको
मात्र त्यात होऊ नको ¦ लिप्त बाळा केंव्हाही . ”
यात असणारी सगळ्यात मोठी अडचण म्हणजे आपले स्वतचे मन . अगदी
” मन सदा आशाळभूत ¦ ते ना कदा स्थिर होत
नाना विकल्प मनात ¦ येऊ लागती वरच्यावरी . ”
( अध्याय सातवा , सातवीं ओवी ) अशीच परिस्थिति .
हे शेअर – बाजारात तर सततच होत असते . कारण तिथे गन्मतीने म्हणायचे तर लोकशाहीचा अतिरेक सुरू असतोच असतो . ” नाना मति , नाना रीति ” अशी सदा स्थिति . पण यावर आपले मत अभ्यासांती तयार करून त्यावर स्थिर राहावे असे सांगताना या पोथीची सातव्या अध्यायातील ५२ वी ओवी सहजच म्हणते की :
” जन्बुकाच्या चेष्टला ¦ गजपती न मानी भला
श्वानाचिया भुंकणयाला ¦ व्याघ्र न दे किंमत ” .
हे जमले नाही तर ” दारिद्रयाचे मनीच्या मनी , जाती जिरोनि मनोरथ ” हे विधिलिखितच !
अर्थातच अशा ओव्या लिहिताना संतकवी श्री दासगनू महाराजांना गुंतवणूक क्षेत्र किंवा शेअर – बाजार अभिप्रेत नव्हता हे उघडच आहेत . पण वेळ ही गोष्ट , आणि त्यातही वेळ साधणे ही गोष्ट , आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आणि तेही प्रत्येक क्षेत्रात महत्वाची ठरते . ” Time is essence of contract ” हा गुंतवणूक क्षेत्राचा पायाभूत सिध्दांत आहे . त्याचं समर्पक वर्णन याच पोथीच्या चौथ्या अध्यायाच्या ११४ व्या आणि ११५ व्या ओवित अशा शब्दांत येते :
” तरूणपणी ब्रम्हचारी ¦ म्हातारपनी करसी नारी
अरे वेळ गेल्यावरी ¦ नाही उपयोग साधनाचा
जे करणे ते वेळेवर ¦ करावे की साचार
घर एकदा पेटल्यावर ¦ कूप खणण निरर्थक . ”
असे प्रयत्न करतांना वेळ जशी आणि जितकी महत्वाची आहे आणि असते , तेवढीच आणि तितकीच अपेक्षा वास्तव असण्याची नितांत गरज असते . हे संपूर्ण आयुष्याबाबतीत लागू पडनारे आहे . याला शब्दान्कीत करतांना या पोथीच्या २० व्या अध्यायातील १४९ वी ओवी सांगत राहाते :
” शक्याशक्य विचार ¦ सुद्न्ये करावे निरंतर
उगीच पूल सागरावर ¦ बांधावया जाऊ नये ” .
हे जमवायचे असले तर ” अहो साजेल ते बोलावे , जे का पचेल तेच खावे ; उसने ना कधी आणावे , अवसान ते अंगात ” ( अध्याय अकरावा , ओवी १५३ ) हे जसे खरे तसेच असे वास्तव अपेक्शान्चे अविरत प्रयत्न कुठे करायचे तेही ठरवणे महत्वाचे निश्चितच असते . कारण
” बीज पेरता खडकावरी ¦ ते वाया जाते साचार
त्यास कधी ना येणार ¦ मोड हे ध्यानी धरावे . ”
( तेरावा अध्याय , चोविसावी ओवी . )
अशा प्रयत्नातून मिळणाऱ्या यशाची अपेक्षा मोठी ठेवण्यास काहीच आडकाठी नाही हे सांगायला ना गुंतवणूक क्षेत्र विसरत ; ना ही पोथी . श्री गजानन विजय या संतकवी श्री दासगनू महाराज विरचित या पोथिची १५० वी ओवी निःसंदिग्ध पणे सांगते कि
” कल्पवृक्षाच्या तळवटी ¦ बसून इच्चिली गारगोटी
वा मागितली करवनटी ¦ कामधेनूपासून . ” .
सदा – सर्वकाळ , तिन्ही – त्रिकाल या कसोट्यांवर उतरतो तो राजा .
बाकीचे सगळे बहुरूपी .
बहुरूपी एखाद्या क्षणाला असं काही बेमालूम काम करून जातो कि तो त्या क्षणाला खरंच राजा वाटतो .
तो राजा ” वाटतो . ” ; राजा ” नसतो ” .
तो असतो फक्त बहुरूपी .
शेअर – बाजार तर स्वतःच एक बहुरूपी आहे .
” बहुरुप्याचे राजेपण ¦ कोठून टिके बाजारी ” .
चंद्रशेखर टिळक
C – 402 . राज पार्क
मढवि बंगल्या जवळ .
राजाजी पथ .
डोम्बिवलि ( पूर्व ) .
पिन . . . ४२१२०१ .
मोबाईल . . . . ९८२०२९२३७६ .
E-mail : tilakc@nsdl.co.in
Leave a Reply