उभी कोपऱ्यात शहराच्या,
ती वस्ती लाल दिव्याची.
अभिशाप भोगत असते,
रात्रीच्या अभिसाराची.
सकाळ होई दुसऱ्या प्रहरा,
शीण कायेचा तो सारा.
अंमल वारुणीचा असे अजूनही,
वस्त्रांचे भान ते नसे जराही.
झटकुनी दुखऱ्या देहाला कोनी,
कवळिती तयांना छातीशी धरूनी.
बिलगती कुस मिळे मायेची,
कसर रात्रभराच्या विरहाची.
स्नान करूनी हात जोडुनी,
देवाला सजविती फुलांनी.
करेल काय?निराकार तो ही,
चुरगळा फुलांचा पहात राही.
दिवस सरतो, सांज उगवते,
वस्तीची लगबग आता वाढते.
माय संपली मादी सजली,
पान्ह्यास दुरावती सानुली.
रांगोटी झाली माळून गजरा,
लपून गेला भकास चेहरा.
अधर रंगले तांबुल विड्यानी,
नटली वस्ती गिऱ्हाईकानी.
एक – दोन – तीन – चार,
वासनेने भरलेला बाजार.
मन मेलेला शृंगार कुणाशी,
व्यवहार रोकडा शेजेशी.
सरते रात्र अशीच एक ती,
निपचित होतसे सारी वस्ती.
उरते एक कुडी थकलेली,
खपाटल्या पोटाची भुकेली.
प्रासादिक म्हणे,
— प्रसाद कुळकर्णी.
Leave a Reply