(महाभारतातील कथानकावर आधारित)
कौरवांनी पांडवांना कुंतीसह ठार मारण्याचा प्रयत्न केला. पण ते वाचले. पांडव ब्राह्मणाचा वेश धारण करून एकचक्रा नगरीत एका ब्राह्मणाच्या घरी येऊन राहिले. कुंती व भीम घरी रहात. बाकीचे चौघे पांडव भिक्षा मागून आणीत.
ते ती भिक्षा कुंतीकडे देत. त्यातला एक भाग ती भीमाला देई आणि बाकीच्या भागात कुंती, धर्मराज, अर्जुन, नकूल आणि सहदेव आपला उदरनिर्वाह करीत.
एके दिवशी ते चौघे पांडव नेहमीप्रमाणे भिक्षेसाठी बाहेर पडले. काही वेळाने ब्राह्मणाच्या घरात आक्रोश चाललेला कुंतीने ऐकला. तिने आत जाऊन चौकशी केली. ब्राह्मणाच्या कुटुंबावर कोणते संकट आले आहे, हे तिला समजले.
नगराबाहेर एका गुहेत अत्यंत क्रूर आणि भयंकर बलाढ्य असा बकासूर नावाचा राक्षस रहात होता. तेरा वर्षांपूर्वी त्याने त्या शहरावर हल्ला केला होता. राजा पळून गेला आणि सर्व राज्य बकासुराच्या हाती आले. त्याला भूक लागली की, तो गुहेतून बाहेर येई, आणि त्या शहरातील पुरुष, स्त्रिया व मुले यांना ठार मारून खात असे. त्याची धाड केव्हा येईल याचा नेम नव्हता. लोकांनी धास्ती घेतली. सर्व उद्योग थंडावले. तेव्हा लोकांनी त्या बकासुराशी एक करार केला. आठवड्यातून एकदा त्यांनी बकासुराला भरपूर भात, दही, पक्वान्न, मांस पाठवायचे. त्याने ते खावे; त्याबरोबरच गाडीचे दोन बैल, व गाडी आणणारा माणूस यांचाही फडशा उडवावा. मात्र गावात येऊन वाटेल तशी कत्तल करू नये. बकासुराने परकीय हल्ल्यापासून नगरीचे रक्षण करावे. ही व्यवस्था कित्येक वर्षे चालू होती. आज अन्नाची गाडी घेऊन जाण्याची पाळी त्या ब्राह्मणावर आली होती. म्हणून घरात रडारड चालली होती.
ही सर्व हकिगत कुंतीला सांगून ब्राह्मण म्हणाला, “आम्ही गरीब आहोत, आम्हांला पैसे देऊन आमच्याबद्दल दुसऱ्या कोणास पाठविता येणार नाही.
तेव्हा आम्हा सर्वांना एकदम खाऊन तरी त्याची भूक भागू देत. आता यातून सुटकेची आशा नाही.”
कुंतीने हे सारे ऐकले. तिला वाईट वाटले. तिने भीमाला हे सांगितले. तो गाडीबरोबर जाण्यास तयार झाला. कुंती पुन्हा ब्राह्मणाकडे आली आणि म्हणाली, “ भटजीबुवा, तुम्ही भिऊ नका. मला पाच पुत्र आहेत. त्यांच्यापैकी एक अन्न घेऊन बकासुराकडे जाईल.
ब्राह्मणाला अत्यंत आश्चर्य वाटले. त्याने कुंतीचे म्हणणे ऐकले नाही. तो म्हणाला, “माझ्याकरिता दुसऱ्याचा बळी देणे मला नको.” कुंती म्हणाली, “माझ्या मुलाच्या अंगी अचाट बळ आहे. त्याने असले अनेक राक्षस मारले आहेत. तो मंत्रामुळे मिळालेल्या शक्तीने बकासुराला ठार मारील. मात्र तुम्ही हे कोणासही सांगू नका. तुम्ही सांगितले तर त्याची शक्ती नाहिशी होईल.” पुष्कळ दिवसांनी आपणांस राक्षसाबरोबर दोन हात करण्याची संधी मिळणार, म्हणून भीमास आनंद झाला. भिक्षेहून इतर चौघे पांडव परत आले. भीमाला आनंदात पाहून त्यांना आश्चर्य वाटले. आपल्या आईकडून त्यांना त्याच्या आनंदाचे कारण समजले. तेव्हा धर्मराजास आईचा राग आला. आईने भीमाचा जीव उगाच धोक्यात घातला असे त्याला वाटले. त्याने आईला तसे सांगितले देखील. तेव्हा कुंती म्हणाली, “आपण इतकी वर्षे या ब्राह्मणाच्या घरी राहात आहोत, त्याच्या उपकाराची फेड करणे हा आपला धर्म आहे. तेच मानवाचे भूषण. भीमाच्या शक्तीबद्दल आपली खात्री आहे. भ्यायचे काही कारण नाही. आश्रयदात्याच्या उपयोगी पडण्यात धन्यता आहे.
हे ऐकून धर्मराज काहीच बोलला नाही. आईचे म्हणणे त्याला पटले. नंतर नगरातील लोक ब्राह्मणाच्या घरी आले. त्यांच्या बरोबर भात, दही, पक्वान्न, मांस यांनी भरलेली दोन बैलांची गाडी होती. भीम बाहेर येऊन गाडीत बसला; आणि त्याने गाडी गुहेच्या रस्त्याने चालवली. पुढे वाजंत्रीवाले निरनिराळी वाद्ये वाजवीत होते. ही मिरवणूक नेहमीच्या जागी आल्यावर नागरिक परत गेले. एकटा भीम काय तो गाडीवर राहिला.
त्याने समोर पाहिले. गुहेपुढचा भाग मांस, हाडे, तुटलेले अवयव, रक्त, कृमी-कीटक यांनी भरलेला होता. वर गिधाडे घिरट्या घालीत होती. भीमाने गाडी थांबवली. त्याला वाटले की, बकासुराची व आपली झुंझ सुरू झाली की, आपल्या सर्व अन्नाचा नाश होऊन जाईल. बकासुराला मारल्यावर स्नान वगैरे होईपर्यंत आपणास काही खाता येणार नाही. तेव्हा आधीच आपण हे खाऊन टाकावे. असा विचार करून तो भराभर अन्न खाऊ लागला.
आधीच उशीर झाल्यामुळे बकासूर रागावला होता. भीम अन्न खात आहे, असे पाहून तो भयंकर सांतापला. भीमाने बकासुराला पाहिले. अजस्त्र देह, लाल दाढीमिशा, केसांच्या जटा झालेल्या आणि या कानापासून त्या कानापर्यंत पसरलेला जबडा, हे सर्व भीमाने पाहिले. पण आपले खाणे चालूच ठेवले. बकासूर भीमावर चालून आला. भीमाने त्याला डाव्या हाताने दूर सारले. बकासूराने भीमाच्या पाठीवर गुद्दे लगावले. “छान अंग रगडतो आहेस हं” असे भीम हसत म्हणाला. बकासुराने एक वृक्ष उपटून भीमावर फेकला. भीमाने डाव्या हाताने तो बाजूला ढकलला, आणि आपला उद्योग चालूच ठेवला. सर्व अन्न खाऊन झाल्यावर ढेकर देत भीम उठला. त्याची आणि बकासुरची झुंज सुरू झाली.
एखाद्या मुलाने चिंध्यांच्या बाहुलीशी खेळावे, तसा भीम त्या राक्षसाशी खेळला. त्याने त्याला खाली आपटले, आणि वर उडवले. शेवटी त्याने त्या राक्षसाला जमिनीवर पाडले. आणि त्याच्या पाठीवर गुडघा टेकून त्याची हाडे मोडली. बकासूर रक्त ओकून मरण पावला. बकासूराची शेवटची किंकाळी तेवढी हवेत घुमत राहिली. भीमाने ते प्रचंड धूड ओढत नगराच्या वेशीपाशी आणून टाकून दिले. तो ब्राह्मणाच्या घरी आला. त्याने स्नान केले व आनंदित झालेल्या आपल्या मातेला साष्टांग नमस्कार केला.
[“बालसुधा’, पुस्तक ३ रे, कर्नाटक सरकार, १९७७, पृ. ७०-७३]
Leave a Reply