लीलावती भागवत या माहेरच्या लीला पोतदार. त्यांचा जन्म ५ सप्टेंबर, १९२० रोजी झाला.
मराठी आणि हिंदी भाषांवर प्रभुत्व असलेल्या लीलावती भागवत यांनी काही काळ शिक्षिका म्हणून काम केले. आकाशवाणी मुंबई केंद्रामध्ये त्यांनी वनिता मंडळ हा कार्यक्रम यशस्वी केला. या वनिता मंडळामुळे अनेक प्रतिभावंत स्त्रियांचा समाजाला परिचय झाला.
आहारशास्त्रावर बोलण्यासाठी लीलावती पुष्कळदा वसुमती धुरू यांना बोलवायच्या. त्यांतूनच वसुमती धुरू या पुढे मराठीतील पाकशास्त्राच्या नामवंत लेखिका म्हणून पुढे आल्या.
लीला पोतदार यांचा विवाह भा.रा. भागवत यांच्याशी ९ मे १९४०रोजी झाला, आणि त्या लीलावती भागवत झाल्या. बालमित्र या मुलांसाठीच्या मासिकामध्ये त्यांनी त्यांच्या पतींसमवेत समवेत काम केले. भा. रा. भागवत आणि लीलाताई या दोघांनी मिळून १९५१ मध्ये जेव्हा हे मासिक सुरू केले.
त्यावेळी बँकेत त्यांच्या नावावर फक्त ३५० रुपये होते. वेळ आल्यास दागिने मोडू, परंतु मुलांसाठीचा हा उपक्रम चालू ठेवू, असा निर्धार लीलाताईंनी दाखविला. त्या काळात मुलांसाठी विशेष मासिके नव्हती.
मुलांसाठी मासिके विकत घेण्याची पालकांची मनोवृत्तीही नव्हती.तरीही मुलांच्या वाचनाची भूक भागविण्यासाठी त्यांनी हे मासिक चालू ठेवले. नामवंत लेखकांचे लेखन व द.ग. गोडसे यांची चित्रे यांमुळे ‘बालमित्र’ खरोखरीच मुलांचा बालमित्र बनले. मात्र आर्थिक नुकसान वाढत गेल्याने नाईलाजाने ते मासिक बंद करावे लागले. मासिक बंद झाले तरी लीलावती आणि त्यांचे पती यांचे लेखन चालूच राहिले आणि बहराला येत गेले. पुढे भा.रा. भागवत यांच्या साहित्याचे संपादन लीलाताईंनी ‘भाराभार गवत’ या पुस्तकाद्वारे केले.
अखिल भारतीय बालकुमार साहित्य संस्थेच्या उभारणीत लीलावती भागवतांनी मोठा वाटा उचलला. साहित्याबरोबरच संस्थात्मक कार्यातही त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. आपल्या वयाच्या नव्वदी नंतर सुद्धा त्या सक्रिय होत्या. त्या वयात त्यांचे ‘मुलांसाठी दासबोध’ हे पुस्तक प्रकाशित झाले. लीलावती भागवत यांचे २५ नोव्हेंबर २०१३ रोजी निधन झाले.
-संजीव_वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
ही व माझ्या इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.
Leave a Reply