नवीन लेखन...

पाचशे दातांचा सरीसृप

टेरोसॉरच्या या नव्या प्रजातीचा शोध काहीसा अनपेक्षितपणे लागला. जर्मनीतील बामबर्ग नॅचरल हिस्टरी म्यूझिअम या संग्रहालयातर्फे, सन २००४पासून नियमितपणे दरवर्षी पाच-सहा आठवडे, फ्रँकोनिअन जुरा या परिसरात उत्खनन करून, प्राचीन सरीसृपांसारख्या प्राण्यांचा शोध घेतला जात होता. या उत्खननात टेरोसॉर तसंच इतर विविध सरीसृपांचे अवशेष सापडले आहेत. अशाच २०११ सालच्या शोधमोहिमेत, डेव्हिड मार्टिल आणि त्यांचे सहकारी संशोधक, मगरीचे पूर्वज असलेल्या क्रोकोडायलोमॉर्फ या प्रकारातील प्राण्याचे अवशेष उत्खननाद्वारे बाहेर काढत होते. हे उत्खनन चुनखडीच्या खाणीत केलं जात होतं. या जमिनीतून बाहेर काढली गेलेली माती आणि खडक बाजूला ढिगाऱ्याच्या स्वरूपात जमा झाले होते. इथली जमीन चुनखडीच्या थरांनी बनली असल्यामुळे, इथले खडक हे फरशांच्या स्वरूपात बाहेर काढले जातात. अशाच एका ढिगाऱ्यातल्या चुनखडीच्या फरशीवर या संशोधकांना, ठशाच्या स्वरूपातले सजीवाचे अवशेष दिसून आले. हे अवशेष अवघ्या तळहाताएवढ्या आकाराचे होते. त्या फरशीची अधिक पाहणी केल्यानंतर, हा ठसा एका प्राण्याच्या संपूर्ण शरीराच्या ठशाचा भाग असल्याचं लक्षात आलं. सुमारे साठ सेंटिमीटर लांब व सुमारे पन्नास सेंटिमीटर रुंद असणाऱ्या या फरशीचा कालांतरानं तपशीलवार अभ्यास केला गेला. या अभ्यासात फरशीवरच्या ठशाचं काटेकोर निरीक्षण केलं गेलं. हे निरीक्षण नेहमीच्या प्रकाशात तर केलं गेलंच, परंतु त्याचबरोबर अतिनील किरणांचा वापर करून केलं गेलं, तसंच क्ष-किरणांद्वारेही केलं गेलं. या तपशीलवार निरीक्षणांवरून त्या प्राण्याचं वैशिष्ट्यपूर्ण स्वरूप स्पष्ट झालं. हा प्राणी एक टेरोसॉर, म्हणजे उडणारा सरीसृप होता. मुख्य म्हणजे त्याला दातच दात होते – जवळपास पाचशे!

टेरोसॉर हे उडणारे सरीसृप असल्यानं, त्यांचं वजन कमी असणं गरजेचं होतं. त्यामुळे त्यांची हाडंं बऱ्याच प्रमाणात पोकळ असायची. हाडांच्या या काहीशा नाजूक स्वरूपामुळे, टेरोसॉरचे अवशेष संपूर्ण स्वरूपात सापडणं कठीण असतं. बहुतेक वेळा हे अवशेष अखंड स्वरूपात न आढळता, तुकड्यांच्या स्वरूपात आढळतात. तुकड्यांच्या स्वरूपातील या अवशेषांचा अभ्यासही खूपदा जिकिरीचा ठरतो. मात्र डेव्हिड मार्टिल आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सापडलेले, टेरोसॉरचे हे अवशेष व्यवस्थित टिकून राहिले होते. या टेरोसॉरचं शरीर, त्याच्या मृत्यूनंतर लगेचच, म्हणजे कुजण्याच्या अगोदरच गाडलं गेलं असावं. त्यामुळे या टेरोसॉरचं पूर्ण शरीर अखंड शाबूत राहून, त्याच्या संपूर्ण शरीराचा ठसा निर्माण होऊ शकला.

या ठशात या प्राण्याची हाडं, हाडांचे सांधे, विविध अस्थिरज्जू, सर्व काही दिसत आहे. त्यामुळे त्याच्या शरीराची मोजमापं घेणंही काहीसं सोपं ठरलं. आकारानं साधारणपणे लेसर फ्लेंमिगो या पक्ष्याइतका असणाऱ्या या टेरोसॉरच्या, कवटीची लांबी सुमारे सतरा सेंटिमीटर असून, पंखांचा एकूण पसारा हा एक मीटरपेक्षा थोडासा जास्त आहे. हा टेरोसॉर भक्ष्यासाठी उथळ पाण्यात वावरत असावा व त्यातील छोटे जलचर हे त्याचं खाद्य असावं. हा टेरोसॉर ज्या जीवशास्त्रीय कुळातला आहे, त्या कुळातल्या इतर प्रजातींचे टेरोसॉर यापूर्वी इथल्या जमिनीत सापडले आहेत. परंतु टेरोसॉरची ही प्रजाती मात्र आतापर्यंत अज्ञात होती. हे अवशेष सुमारे पंधरा कोटी वर्षांपूर्वीच्या काळातले असावेत. भूशास्त्रीयदृष्ट्या ‘जुरासिक काळ’ या नावे ओळखला जाणारा हा काळ तेव्हा सरत आला होता. (टेरोसॉर हे डायनोसॉरप्रमाणेच तेवीस कोटी वर्षांपूर्वी निर्माण झाले व सुमारे साडेसहा कोटी वर्षांपूर्वी नामशेष झाले.)

या टेरोसॉरला असलेले जवळपास पाचशे दात हे एखाद्या, भरगच्च दात असलेल्या कंगव्यासारखे दिसतात. या टेरोसॉरच्या वरच्या व खालच्या, अशा दोन्ही जबड्यांच्या दातांच्या रचनेत विलक्षण साम्य आहे. दोन दातांतल्या फटीही छोट्या आहेत. या दातांच्या, हिरड्यांच्या बाहेर असणाऱ्या भागाची लांबी वेगवेगळी आहे. ती सुमारे दोन मिलिमीटरपासून एक सेंटिमीटर इतकी आहे. या टेरोसॉरचा जबडा लांबलचक असून, त्याला वरच्या बाजूला बाक आहे. या जबड्याची पुढची बाजू चमच्यासारखी चपट आहे. त्याच्या जबड्याच्या पुढच्या बाजूला दात नाहीत. परंतु त्याच्या जबड्याच्या दोन्ही बाजू, अगदी आतपर्यंत दातांनी व्यापल्या आहेत. यांतील पुढच्या भागांतले दात एखाद्या आकड्यासारखे वळलेले आहेत. हे दात कदाचित आजच्या कोळंबीसारखे छोटे जलचर प्राणी पकडण्यासाठी वापरले जात असावेत. हे खाद्य तोंडात आल्यानंतर हा टेरोसॉर आपला चोचीसारखा जबडा दाबून, खाद्याबरोबर तोंडात शिरलेलं पाणी बाजूच्या दातांतील फटीतून बाहेर ढकलून देत असावा. बदकं आणि फ्लेमिंगो अशाच प्रकारे आपलं अन्नभक्षण करतात. देवमाशाच्या दातांची रचनाही अशाच प्रकाच्या खाद्यभक्षणाच्या दृष्टीनं विकसित झालेली आहे. या टेरोसॉरपेक्षा अधिक दात असलेला एकच टेरोसॉर आतापर्यंत साडला आहे. अर्जेंटिनामध्ये सापडलेल्या या टेरोसॉरच्या वरच्या दातांच्या आणि खालच्या दातांच्या ठेवणींत मात्र फरक आहे. त्याचे वरचे दात लहान आणि बोथट असून, खालचे दात मात्र लांब आहेत.

आपल्या जबड्याचा नरसाळं किंवा गाळणीसारखा वापर करणाऱ्या या वैशिष्ट्यपूर्ण टेरोसॉरचे ठशाच्या स्वरूपातले हे अवशेष आता बामबर्ग नॅशनल हिस्टरी म्यूझिअममध्ये ठेवले आहेत. या टेरोसॉरचं नामकरणही झालं आहे. टेरोसॉरची ही जाती तर नवी आहेच, परंतु ही जाती ज्या प्रजातीखाली येते ती प्रजातीही नवी आहे. त्यामुळे या टेरोसॉरला पूर्ण नवं नाव लाभलं आहे. या टेरोसॉरची प्रजाती यापुढे ‘बॅलाइनोग्नॅथस’ या शास्त्रीय नावानं ओळखली जाईल, तर जाती ही ‘बॅलाइनोग्नॅथस मायुसेरी’ या शास्त्रीय नावानं ओळखली जाईल. जातीच्या नावातल्या पहिल्या भागाचा अर्थ ‘देवमाशाचं तोंड’ असा आहे. कारण देवमासाही काहीसं अशाच प्रकारे आपलं भक्ष ग्रहण करतो. या नावातला दुसरा भाग हा या संशोधनात सहभागी झालेल्या मॅथिआस म्यॉझेर या संशोधकाच्या नावावरून दिला गेला आहे. या शोधनिबंधाचं लेखन चालू असतानाच, या संशोधनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मॅथिआस म्यॉझेर यांचं निधन झालं. त्यांच्या स्मरणार्थ टेरोसॉरला हे नाव दिलं गेलं. यामुळे मॅथिआस म्यॉझेर यांचं नाव या वैशिष्ट्यपूर्ण टेरोसॉरशी कायमचं जोडलं गेलं आहे.

(छायाचित्र सौजन्य –Megan Jacobs / University of Portsmouth / Martill et al/Paläontologische Zeitschrift)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..