पुणे शहर म्हटलं तर सगळ्यात पहिले डोळ्यांसमोर येते ती “पेशवाई”. तसं पहावयास गेलो तर पुणे ही ‘विद्यानगरी’ म्हणून प्रसिद्ध आहे. अशा वैभवसंपन्न पुणे शहरात आणखीन ही काही वास्तू आहेत ज्या पुणे शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवतात. अशीच एक वास्तू म्हणजे “बालगंधर्व रंगमंदिर”. पुण्यातील संभाजी पार्क विभागात ही वास्तू दिमाखाने उभी आहे.
इतिहास :
या नाट्यगृहाची स्थापना २६ जून १९६८ रोजी करण्यात आली. त्यावेळी समारंभाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक मा. आचार्य अत्रे हे होते. हे नाट्यगृह कसे उभारायचे या संकल्पनेत ज्येष्ठ साहित्यिक पु.ल. देशपांडे यांचे विशेष योगदान लाभले होते. या वास्तूचे उद्घाटन सन्मा. यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते भारताचे गृहमंत्री होते. येथे असलेल्या कोनशिलेचा उद्घाटन सोहळा ८ ऑक्टोबर १९६२ रोजी झाला.
या नाट्यगृहाची आसन क्षमता ९८९ इतकी आहे. त्यातील ६६९ आसन खालील बाजूस व बाल्कनीमध्ये उर्वरीत ३२० आसन आहेत. खालील बाजू ६७’*७७'(५१५९ चौरसफूट) व बाल्कनी ३०’*८३’ (२४६० चौरस फूट) इतकी भव्य आहे. या नाट्यगृहातील रंगमंचाचे आकारमान ६०’*४०’ म्हणजेच २४०० चौरस फूटांचा आहे.
या वास्तूत मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यावर थोडंसं चालल्यावर खालच्या मजल्यावर भव्य तिकीट खिडकी लागते. येथे शक्यतो आगाऊ बुकींग जास्त केल्या जातात. येथे पैसे भरून गाड्या वाहनतळावर उभ्या करण्याची सोय उपलब्ध आहे. या वाहनतळाचे साधारणत:आकारमान ६०’*३००'(संपूर्ण) इतके आहे. स्वच्छ असे कॅफेटेरिया व उपहारगृह उपलब्ध आहे. या वास्तूत नाटक कंपन्यांचे नेपथ्य ठेवण्याकरिता ही सदनिका उपलब्ध आहेत. नाट्यगृहात कलाकारांकरिता रहाण्याची व खाण्याचीदेखील उत्तम सोय आहे. वास्तूमध्ये कोणी खास पाहुणा येणार असल्यास त्याच्याकरिता व्ही.आय.पी. खोलीदेखील उपलब्ध आहे. नाट्यगृहात कार्यक्रम चार सत्रांमध्ये होतात, त्यातील सकाळच्या सत्राची वेळ ९:०० ते ११:००, दुपारच्या सत्राची वेळ १२:३० ते ३:३०, संध्याकाळच्या सत्राची वेळ ५:०० ते ८:०० व रात्रीच्या सत्राची वेळ ९:३० ते १२:३० इतकी आहे.
वास्तूत विशेष पहाण्यासारखे :
तिकिट घराकडून नाट्यगृहाच्या दिशेने जात असताना समोरील शेवटच्या भागावर नारायणराव श्रीपाद राजहंस (बाल गंधर्व) यांची भव्य आकाराची प्रतिमा आहे. या प्रतिमेची शोभा येणार्या प्रत्येकाचं लक्ष वेधून घेतल्याशिवाय रहात नाही. वास्तूत वरच्या मजल्यावर एक भव्य कलादालन आहे. येथे अनेक कलाकार विविध स्वरूपांची प्रदर्शनं भरवतात. या कलादालनात दोन कक्ष आहेत. या दोन्ही कक्षांचं एकत्रित आकारमान ८२’*४०’ म्हणजेच ३२८० चौरस फूट इतके आहे.
पुणे शहराचे वैभव अनुभवण्यासाठी नक्कीच या वास्तूला भेट द्यावी, तो वर पुण्याला भेट देणार्यांनी पुण्याचे खरे वैभव अनुभवले असं म्हणता येणार नाही.
पत्ता : झाशी राणी लक्ष्मीबाई चौक, शिवाजीनगर, पुणे (महाराष्ट्र), ४११००५
संपर्क : ०२० – २५५३२९५९
— आदित्य दि. संभूस (कलाकार, दिग्दर्शक, लेखक)
Leave a Reply