दक्षिण बालीत जम्बरन येथे असलेली व अग्निरूप म्हणून ओळखली जाणारी ही गणेशाची पाषाणमूर्ती दोन हाताची असून ती सातव्या किंवा आठव्या शतकातील असावी. बलीत इतरत्र ब्रान्झ धातूच्या मूर्ती असताना हीच मूर्ती फक्त पाषाणाची आहे, हे पहिले वैशिष्टय होय. अशा स्वरूपातील मूर्ती बालीतच नाही तर जगातही कोठे अजून मिळालेली नाही. मूर्तीत बाली संस्कृतीची खास पद्धत व वेगळेपणा दिसून येतो. जगातील एकमेव मूर्ती म्हणून हिचा उल्लेख केला जातो.
ज्योतींच्या सिंहासनावर बसलेल्या ह्या मूर्तीच्या पायाचे तळवे जावा पद्धतीनुसार एकमेकांना स्पर्श करतात. गणपतीच्या उजव्या हातात मशाल असून डाव्या हातात खाद्य पात्र आहे. मोठे तोंड आणि गोल मोठे डोळे असून कपाळावर कमळ आहे. मुकुटाची घडण अत्यंत कलाकुसरीने युक्त आहे. मुकुटात मौल्यवान खडा आहे. सोंड आखूड असून ती मानेजवळ वळलेली आहे. सोंडेच्या बाजूला ज्वाळा आहेत. गळ्यांत सर्पाचे जानवे असून त्याचे तोंड डाव्या खांद्याकडे आहे. हातातील दागीन्यावरही कलाकुसर केलेली आहे. कमरपट्टा इंडोचीन पद्धतीचा असून मांडीवरील वस्त्रावर जरीचे भरतकाम केले आहे. शेला पायावरून सिंहासनापर्यंत लोंबत आहे.
ज्वाळायुक्त सिंहासन व हातातील मशाल याच्याबाबत काहीच माहिती उपलब्ध नाही. बालीत श्रीगणेश सुर्यरूप म्हणून ओळखला जातो. त्याचे प्रतिक म्हणूनच ही गणेश मूर्ती असावी असे वाटते. स्वर्ग प्राप्तीत येणारे अडथळे विघ्नहर्ता गणेश दूर करतो. असा बालीतील जनतेचा समज आहे. राजा राणीच्या मृत्युनंतर त्यांचे पुतळे बनवून त्यांना देवपणा देण्याचा येथे प्रघात आहे. अशा पुतळ्याच्या जुजाव्या हाताला गणेशाची मूर्ती ठेवतात. त्यामुळे विघ्नहर्ता गणेश राजा-राणी ह्यांची सर्व विघ्ने दूर करून त्यांना देवपण प्राप्त करून देईल असे जनतेला वाटते. दुष्टांचा संहार करून मार्ग दाखविणारी देवता म्हणून हातात मशाल असावी असे अनुमान काढता येते.
अग्निरूप स्वरुपात किंवा अग्निवाहक रुपात असलेल्या या मूर्तीत बालीची संस्कृती, आचार, विचार व तेथील जनतेच्या भावना स्पष्ट स्वरुपात व्यक्त होतात.
जावा इंडोचायना, चीन यांच्या कलेचा प्रभाव जरी या मूर्तीवर पडत असला तरी विघ्नहर्त्या गणेशाची ही मूर्ती भारतीय संस्कृतीचे बाली येथील प्रभुत्व व प्रमुख स्थान सिद्ध करते.
अत्यंत दुर्मिळ व एकमेव मूर्ती म्हणून बालीतील हा गणेश जगात फार प्रसिद्ध आहे.
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply