नुकत्याच सरलेल्या वर्षात एक नको असलेली घटना घडली. मुंबईहून प्रसिद्ध होणार्या आणि प्रतिष्ठित वर्गात मोडणार्या “लोकसत्ता”च्या संपादकांनी शेतकर्यांच्या कर्जमाफीच्या निमित्ताने “बळीराजाची बोगस बोंब” हा अग्रलेख लिहिला. या अग्रलेखाला सर्वच थरांतून प्रखर विरोध झाला. वातानुकुलित चेंबरमध्ये बसून उन्हातान्हात कष्ट उपसणार्या शेतकर्याच्या दु:खावर डागणी देण्याचा हा प्रयत्न ठरला. ज्याच्या श्रमावर आपण रोजचं खाणं खातो त्याचा कोणताही विचार न करता चाबूक हाणण्याचा हा प्रकार झाला.
शेतकर्यांना दिली जाणारी कर्जमाफी आणि विविध कारणाने झालेल्या नुकसानभरपाईची पॅकेजेस हे विषय अत्यंत गंभीर आहेत, त्यांच्याविषयी चर्चा व्हायलाच पाहिजे यात कुणाचे दुमत नसेल. या नुकसानभरपाईचा नक्की लाभ कोणाला होतो? ती खरोखरच गरजूंपर्यंत पोहोचते का? वगैरे विषयांबाबत अनेक वाद-विवाद होऊ शकतात, मतमतांतरे असू शकतात. मात्र वर्षानुवर्षे चालू असलेली ही गोष्ट आत्ताच का खटकली? आतापर्यंत कॉंग्रेसच्या राजवटीत किती कोटींची कर्जमाफी झाली आणि किती पॅकेजेस दिली गेली तेव्हा हा प्रश्न का उपस्थित झाला नाही? प्रश्न असा पडतो की कॉंग्रेसचे राज्य गेल्यावर केवळ सहा महिन्यांच्या राजवटीत नव्या सरकारला झोडपून काढायचे जे धोरण सत्ताभ्रष्ट झालेल्यांनी चालविले आहे त्यालाच हातभार लावण्यासाठी तर नाही ना लिहिला हा अग्रलेख?
भारतासारख्या “कृषीप्रधान म्हणवून घेतल्या जाणार्या” देशात आज शेतकर्यांची जी भयानक अवस्था “मायबाप सरकार” नावाच्या व्यवस्थेने करुन ठेवली आहे ती भारताला अत्यंत लाजिरवाणी आहे. “कृषीप्रधान म्हणवून घेतल्या जाणार्या” असा उल्लेख करण्याचे कारण हेच की खरोखरच आपला देश आता कृषीप्रधान आहे का याचा विचार करण्याची वेळ आलेली दिसते. आपल्या “कृषीप्रधान” देशातील शेतकर्याची परिस्थिती गेली कित्येक दशके राज्य करत असलेल्या या “मायबाप” नावाच्या “सरकार”ने इतकी हलाखीची करुन ठेवली आहे की त्याला थेट आत्महत्येचाच मार्ग अवलंबायला लागला आहे. भारत “कृषीप्रधान” वगैरे असता तर आज शेतकरी राजासारखा राहिला असता. मात्र या “कृषीप्रधान” देशाची अवस्था गेल्या काही वर्षात “दलालप्रधान” करुन ठेवण्यात आमच्या राज्यकर्त्यांचा मोलाचा हातभार आहे आणि त्यामुळे समस्त शेतकरी वर्गाने त्यांचा भव्य-दिव्य सत्कार केला पाहिजे.
परदेशातील शेतकरी अत्यंत सधन असतो. तो यांत्रिक शेती करतो. टनावारी माल उत्पादन करतो आणि खोर्याने पैसे कमावतो हे वास्तव आहे. मात्र भारतातल्या बहुसंख्य शेतकर्यांची परिस्थिती तशी नाही हे “जमीनीवर” असलेले शेंबडे पोरदेखील सांगेल. अर्थात याला अपवाद आहेत ते म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील बागायती शेती करणारे काही शेतकरी. मात्र त्यांचा पहिला धंदा हा राजकारण करण्याचाच असतो… शेती हा कदाचित जोडव्यवसाय. राज्याचे अर्थकारण आणि राजकारण हाती एकवटल्यामुळे पैसे आणि सत्तेचा माज डोक्यात शिरलेल्या या काही सधन शेतकर्यांमुळे आज संपूर्ण शेतकरीवर्ग नाहक बदनाम होत आहे ही वस्तुस्थिती आहे. मात्र याकडे सर्रासपणे दुर्लक्ष होतंय.
शेतकर्यांचा, शेतीचा कोणताही अभ्यास न करता परिस्थितीचं वास्तव समजून न घेता केलेल्या या लिखाणाला लोकांनी जेव्हा ठेचून काढलं तेव्हा “आम्ही एका विचारमंथनाला सुरुवात करुन दिली” असं गोंडस रुप या वृत्तपत्राने दिलं. आपली भूमिका लोकांना पटली नाही तर निदान त्याबद्दल दिलगिरी दाखवण्याचा मोठेपणा दाखवला असता तरी “जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगली” असं म्हणता आलं असतं.