गोपाळां उभडु नावरे दुःखाचा । कुंठित हे वाचा झाली त्यांची ||१||
झाले काय ऐसे न कळे कोणासी । म्हणती तुम्हापासी देव होता ||२||
देवासवे दुःख न पवतें ऐसे । कांही अनारिसे दिसे आजि ||३||
आजि दिसे हरि फांकला यांपाशी । म्हणऊनि ऐशी परि झाली ||४||
जाणविल्याविण कैसे कळे त्यांसी । शहाणे तयांसी कळो आले ||५||
कळो आले तिहि स्फुंद शांत केला । ठायीचाच त्याला थोडा होता ||६||
होता तो विचार सांगितला जना । गोपाळ शहाणा होता त्याने ||७||
सांगे आता हरि तुम्हा आम्हा नाही । बुडलासे डोहीं यमुनेच्या ||८||
यासी अवकाश नव्हेचि पुसता । झालिया अनंता कोण परि ||९||
परि त्या दुःखाची काय सांगो आता । तुका म्हणे माता लोकपाळ ||१०||
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम कांहीं कळा ||धृ||
Leave a Reply