चारी वेद ज्याची कीर्ती वाखाणिती । बांधवी तो हातीं गौळणींच्या ॥१॥
गौळणी त्या गळा बांधिती धारणी । पायां चक्रपाणि लागे तया ॥२॥
तयाघरीं रिघे चोरावया लोणी । रितें पाळतूनि शिरें माजीं ॥३॥
माजी शिरोनिया नवनीत खाय । कवाड तें आहे जैसे तैसे ॥४॥
जैसा तैसा आहे अंतर्बाह्यात्कारिं । म्हणउनि चोरी न संपडे ॥५॥
न संपडे तया करितां खटपट । वाउगे बोभाट वर्माविण ॥६॥
वर्म जाणती त्या एकल्या एकटा । बैसतील वाटा निरोधूनि ॥७॥
निवांत राहिल्या निःसंग होऊनि । निश्चळ त्या ध्यानीं कृष्णध्यानें ॥८॥
नये क्षणभरी योगियांचे ध्यानी । धरिती गौळणी भाविका त्या ॥९॥
भाविका तयांसी येतो काकुलती। शहाण्या मरती न संपडे ॥१०॥
नलगे वेचावी टोळी धनानांवें । तुका म्हणे भावें चाड एका ॥११॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम कांहीं कळा ||धृ||
Leave a Reply