वैकुंठीच्या लोकां दुर्लभ हरिजन । तया नारायण समागमें ॥१॥
समागम त्यांचा धरिला अनंतें । जिहीं चित्तवित्ते समर्पिलीं ॥२॥
समर्थ ते गाती हरिचे पवाडे । येर ते बापुडे रावराणे ॥३॥
रामकृष्णे केलें कौतुक गोकुळी । गोपाळांचे मेळी गाई चारी ॥४॥
गाई चारी मोहोरी पांवा वाहे पाठीं । धन्य जाळी काठी कांबळी ते ॥५॥
काय गौळियांच्या होत्या पुण्यराशी । आणीक त्या म्हैसी गाई पशु ॥६॥
सुख तें अमुप लुटिले सकळी । गोपिका गोपाळी धणीवरि ॥७॥
धणीवरि त्यांसी सांगितली मात । ज्यांचे जैसें आर्त तयापरी ॥८॥
परी याचे तुम्ही आइका नवल । दुर्गम जो खोल साधनासी ॥९॥
शिक लावूनिया घालिती बाहेरी । पाहाती भीतरी सवेचि तो ॥१०॥
तोंडाकडे त्यांच्या पाहे कवतुके । शिव्या देता सुखे हासतसें ॥११॥
हासतसे शिव्या देता त्या गौळणी । मरता जपध्यानी न बोले तो ॥१२॥
तो जें जें करी ते दिसे उत्तम । तुका म्हणे वर्म दावी सोपें ॥१३॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम कांहीं कळा ||धृ||
Leave a Reply