आज ६० वर्षांनंतर बालनाट्य उद्दिष्ट, वयोगट यानुसार वेगवेगळ्या रुपात, प्रकारात बघायला मिळतंय.
१. मनोरंजक बालनाट्य- मनोरंजन हाच प्रधान हेतू असलेली ही बालनाट्ये सुट्टीत नाट्यगृहात सादर होतात. प्रयोगाच्या अवाढव्य खर्चामुळे तिकीट लावून या बालनाट्यांचे प्रयोग होतात. चांगले नेपथ्य, वेशभूषा, रंगभूषा, संगीत, गाणी यांनी बालनाट्य सजते. ‘विनोद’ किंवा हास्य रसाने ओतप्रोत अशी ही बालनाट्ये मुलांना आवडतील, रुचतील, पचतील अशा पध्दतीनेच सादर केली जातात.
२. शालेय नाट्य प्रबोधन हाच प्रधान हेतू असलेली ही बालनाट्ये शाळांच्या संमेलनात आणि आंतरशालेय स्पर्धांत पहायला मिळतात. स्पर्धेत बक्षिसं मिळवण्यासाठी शालेय नाट्याचा प्रयत्न, मनोरंजकतेवर मात करतो. सध्या शालेय नाट्य ‘समस्या’ मांडण्यातच गुंग असल्यामुळे सामान्य बालप्रेक्षक या नाटकांच्या वाटेला सहसा जात नाही. शालेय नाट्याचे कौतुक फक्त बक्षिस मिळवण्यापुरते राहिले आहे. महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत ३०० च्या आसपास संस्था नाटकं सादर करतात. पण ती नाटके प्रेक्षकांच्या प्रतिसादाशिवाय परीक्षकांसमोर निव्वळ बक्षिसांसाठी सादर होतात.
३. बाहुली नाट्य ३ ते ५ वयोगटाला – आकर्षित करणारं, आवडणारं हे बाहुली नाट्य प्रसंग किशोर कुमार गटालाही प्रभावित करतं असा अनुभव आहे. बाहुली नाट्य करणारे संख्येने फारच कमी आहेत. जे आहेत, ते निष्ठेने काम करत आहेत. बाहुली नाट्याचे प्रयोग १० ते २० मिनिटांचे असतात. बहुधा शाळांमधून हे प्रयोग वर्षभर होतांना दिसतात. ‘निरागसता’ हा बाहुली नाट्याचा प्रधान गुण. यामुळे जे सांगायचे आहे ते हसत खेळत आणि सहजतेने मांडावे लागते. बाहुली नााट्याला खरं तर भरपूर वाव आहे. पण ते जाणीवपूर्वक करणारे संख्येने कमी आहेत.
४. ग्रीप्स नाट्य मोठ्यांनी लहान होऊन, लहानांच्या मनोरंजनासाठी, प्रबोधनासाठी सादर केलेले नाट्य म्हणजेच ग्रीप्स नाट्य. ही जर्मन नाट्यवर्तुळाची संकल्पना आहे. पुण्यात, मुंबईत या बालनाट्य प्रकाराचे प्रयोग रंगतात. पण संख्या अत्यल्प आहे. कारण बालनाट्यात बालकांचा सहभाग असावा ही भारतीयांची मानसिकता आहे. ग्रीप्स चळवळ लोकप्रिय ठरु न शकण्याचे कारणही हेच आहे.
५. विशेष मुलांसाठी नाट्य विशेष मुलांना घडविण्यासाठी ‘नाट्याचा उपयोग होतो हे सिध्द झाल्यामुळे… अपंग/दिव्यांग मुलांच्या विकासासाठी बालनाट्याचा नेमका उपयोग आता होऊ लागला आहे. तो इतका वाढला आहे की बालनाट्याचा एक वेगळा आणि स्वतंत्र प्रकार म्हणून आदराने त्याकडे पाहिलं व अभ्यासलं जातंय. राज्य सरकारने बालनाट्यस्पर्धेत अशा नाटकासाठी स्वतंत्र गट करुन वेगळे बक्षिस ठेवले आहे. अनेकदा विशेष मुलांचे नाटक सामान्य मुलांपेक्षाही सरस आणि वरचढ ठरते. विशेष मुलांसाठी मेहनत घेणाऱ्या सर्व शिक्षकांचे कौतुक करायलाच हवे.
६. शिबिर नाट्य बालनाट्य शिबिरांची संख्या वाढली तशी शिबिर नाट्यांची संख्याही वाढली. शिबिरात मुलांकडून जे नाटक बसवून घेतले जाते. ते शिबिर नाट्य. मुले एखादा विषय उत्स्फुर्तपणे सादर करतात. शिबिर नाट्याला अनेकदा लिखित संहिता नसते. मुले बोलीभाषेत संवाद बोलतात. आशय आणि विषय महत्त्वाचा, नेपथ्य, वेशभूषा, प्रकाश, रंगभूषा यांच्याशिवाय ही नाटके रंगमंचाशिवाय मुलांसमोर सादर केली जातात. शिबिरांमुळे नाटय कलेची ओळख होते. शिबिर नाट्यामुळे मुलांना नाट्यप्रयोगाचा थोडा फार अनुभव मिळतो. शिबिर नाट्याच्या मर्यादा आहेत.. पण शिबिर नाट्याची उपयुक्तता मात्र अमर्याद आहे.
७. अभ्यास नाट्य शाळेत एखादा विषय मुलांना कळावा म्हणून जेव्हा नाटकाची मदत घेतली जाते. अशा नाट्यास अभ्यास नाट्य असे संबोधतात. नाटकाद्वारे गणित, विज्ञान, इतिहासातील अवघड पाठ्यक्रम मुलांना सहज, सोपा करुन देण्यासाठी काही मुलेच लेखक-दिग्दर्शक-अभिनेता व प्रेक्षकांची भूमिका बजावतात. अभ्यास नाट्याचे तंत्र शिकून अनेक शिक्षक अभ्यास नाट्याचा वापर शिक्षणात करीत आहेत. अभ्यास नाट्यामुळे शिक्षणाची प्रक्रिया आनंददायी होण्यास मदत मिळते. अभ्यास नाट्याचा अंतर्भाव सर्व शाळांमध्ये होणे आवश्यक आहे. यासाठी मुलांची मदत देखील घेतली जाऊ शकते.
८. कुमार नाट्य वयोमानानुसार बालनाट्य कुमारनाट्य हे प्रकार पडतात. बाल गट (वय ३ ते ६) किशोर गट (वय ७ ते १२) हे बालनाट्यासाठी योग्य वय समजले जाते. परंतु कुमार गटासाठी (वय १३ १७) आपल्याकडे फारसा विचार होतांना दिसत नाही. राज्यनाट्य स्पर्धा यास अपवाद आहे. महाराष्ट्र राज्याच्या बालनाट्य स्पर्धेत बाल व किशोर गटांऐवजी कुमार नाट्य अधिक संख्येने पहावयास मिळते. प्रौढ नाटकांचे विषय आणि बालनाट्यांचे विषय सर्वांनाच परिचयाचे आहेत. मात्र कुमार नाट्याच्या सिमारेषा धूसर असल्यामुळे विषयांच्या आणि सादरीकरणाबाबत कुमार रंगभूमीवर गोंधळ आहे. कुमार नाट्याचा प्रचार व प्रसार अद्यापही झालेला नाही. बालरंगभूमीवरील ज्येष्ठ रंगकर्मीयांनी याबाबत पुढाकार घेणं आवश्यक आहे.
९.खेळ नाट्य भातुकली चा खेळ मुले खेळतात.त्यात रंगून जातात.खेळ नाट्य हा बाल नाट्य प्रकार तसाच आहे.मुलांना मुक्त आविष्कार करू दिला पाहिजे.खेळ नाट्य ही संकल्पना त्या साठीच आहे.मी स्वतः ही संकल्पना राबवली आहे.खेळ नाट्य ला मुलांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. येथे मुले नाटक करतात.तेच प्रेक्षक असतात.तेच ठरवतात.खेळतात.नाटक नावाचा खेळ एन्जॉय करतात.मोठ्यांना इथे स्थान नाही. मोठ्यांनी दुरूनच फक्त त्यांचा नाट्य खेळ बघावा,ही अपेक्षा.
खेळ नाट्य….ही खरी खुरी बाल रंगभूमी.बालकांना स्वातंत्र्य ,मोकळीक आणि निर्मितीचा आनंद देणारी खरी खुरी बाल रंगभूमी…
१०. व्यवसायिक,कॉर्पोरेट बालनाट्य- २०१८ मध्ये अलबत्या गलबत्या…हे बाल नाट्य व्यवसायिक रंगभूमीवर सादर करण्यात आलं.ह्या बालनाट्य निर्मितीसाठी आणि मार्केटिंग साठी काही कॉर्पोरेट कंपन्या एकत्र आल्या.आणि खास बाल प्रेक्षकांचा मनोरंजनाचा विचार करून,व्यवसायिक नफा हे उद्दिष्ट्य ठेऊन, भव्य दिव्य नेपथ्य आणि प्रकाशाने,तंत्रज्ञाने, सजलेले आणि सेलिब्रेटींची भूमिका असलेले बाल नाट्य सादर करण्यात आले.राज्यात ह्या बालनाट्य प्रकाराला उत्तम प्रतिसाद मिळाला.त्या नंतर अशीच दोन कॉर्पोरेट बाल नाट्य व्यवसायिक रंगभूमीवर आली.त्यांनाही आर्थिक यश मिळालं.
आता या पुढे सेलिब्रिटी काम करत असलेली,आधुनिक वळणाची भव्य दिव्य नाटकांची परंपरा या पुढेही प्रकर्षाने दिसेल. कॉर्पोरेट बालनाट्य बाल प्रेक्षकांची संख्या वाढविण्यास उपयुक्त आहे.परंतु बालकांच्या कला गुणांना वाव देण्यास ते असमर्थ आहे.ते बालकांना प्रेक्षकांच्या भूमिकेत बसवून ठेवते.
कॉर्पोरेट बालनाट्य क्षेत्राची सूत्रे नफेबाज कंपन्यांच्या ताब्यात असतात. मुले आणि पालक ह्याकडे केवळ मार्केट ह्या दृष्टीने पाहिले जाते. उत्तम दर्जाचे मनोरंजन हवे असणारे पालक,कॉर्पोरेट बालनाट्य आपल्या मुलांना दाखवतात.
बालनाट्य ही जबाबदारीने करण्याची गोष्ट आहे. जे मुलांमध्ये खेळू शकणार मिसळू शकतात, मुलांची समरस होऊ शकतात अशा मोठ्यांनीच या क्षेत्रात यावे. पैसा देणारे साधन म्हणून जे बालनाट्य क्षेत्राकडे बघतील त्यांची निराशा होण्याची शक्यताच जास्त आहे. बालनाट्य ही आजही एक चळवळ आहे उद्याही राहील असा मला विश्वास आहे.
— राजू तुलालवार.
टीप:(या लेखात बालनाट्य विषयी आपणास उपयुक्त माहिती मिळते आहे का?कोणते मुद्दे जाणून घ्यायचे आहेत?काही शंका,प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये लिहा.तसेच लेख माले बद्दल आपली मते आणि अभिप्राय देखील कृपया नोंदवावे.)
Khup sundar ani informative article ahe..tumhi corporate baalnatya baddal lihlela agdich khare ahe.
Aaplyala Mumbai madhe baal natya saunstha mahit aslyas plz kalva..Dhanyavaad.