जन्माला आल्यापासून बालपणात प्रवेश करेपर्यंत आपण, रांगलो, बसलो, चाललो आणि ‘मॉन्टेसरीत’ सुद्धा जाऊ लागलो! रस्त्यातूत चालताना, जाताना, घराच्या बाल्कनीत उभा राहून आपण अनेक व्यक्ती न्याहाळल्या. तेंव्हा आपल्याला आपल्याला त्यांचे संदर्भहि कळत नव्हते आणि सौंदर्य सुद्धा कळत नव्हतं.. पण आज प्रौढ वयात मागे वळून पाहताना त्यांतील मजाच काही और वाटते आणि स्मृती चाळवल्या जातात. लहानपणीचे संस्कार जसे आयुष्यभर टिकतात ताशा या आठवणी आणि स्मृती सुद्धा! माझे बालपण ‘गिरगाव’, येथील एका ‘मोक्याच्या जागी , अगदी रहदारीच्या रस्त्यावरील आंग्रेवाडीत संपन्न झाले. त्यात एकत्र कुटुंबात वाढलेली आम्ही भावंडे त्यामुळे आमच्या आठवणीसुद्धा तितक्याच भिन्न भिन्न , गमतीच्या, आनंदाच्या आणि नवलाईच्या.
महाराष्ट्राच्या ‘लोक कला जीवनातील आख्यायिका आणि त्यांचे बालपणी घडलेले दर्शन हि माझी स्मृती चित्रे झाली आहेत.
‘वासुदेव
सर्वात पहिल्यांदा आठवतंय ते ६०- ६२ वर्ष्यापूर्वी पाहिलेले, ‘वासुदेवाची’ – ‘लोककलाकाराचे’ रूप! कृष्णाची थोरवी गात, घरोघरी फिरणारा, ‘वासुदेव आला’, हो वासुदेव आला’, असा “नाद घुमवीत’ आली वासुदेवाची स्वारी” म्हणत, चिपळ्या वाजवत येणाऱ्या वासुदेवाला पाहावयाला आम्हा लहान मुलांना फार आवडत असे. आईकडून ‘तांदूळ, आणि पैसे देण्यासाठी आमची मोठी ‘ लगबगच असायची! सर्वात अधिक आकर्षण म्हणजे या वासुदेवाची ‘मोरपिसांची’ उंच टोपी”. आता हा वासुदेव इतिहास जमा झाल्याने वाईट वाटते. आता तो, त्याच गाणं आणि नाचण लहान मुलांना, विशषतः शहरातील मुलांना फक्त, ‘ऑन लाईन’ ‘किंवा’ ‘गुगल वरच’, बघायला मिळेल!
दुसरं ‘रूप’ म्हणजे ‘कडकलक्ष्मी’
केस वाढवलेला, उघडा, कपाळावर मोठं लालभडक कुंकू, गळ्यात आणि दंडावर, ‘कवड्यांच्या माळा’ घातलेला ! बरोबरच्या ‘स्त्रीच्या’ डोक्क्यावर’ ‘देवळासदृश’ तसबीर’ वगैरे, वगैरे. हातातला ‘पिळदार आसूड’, तो गरगर फिरवीत , जोरात जोरात आवाज करीत, अंगावर आसुडाचे फटके मारीत घेत गोल आकारात फिरायचा .
क्षणभर चांगलीच भीती वाटायची . श्वास रोखला जायचा आणि अंगावर काटेच उभे राहायचे पण त्याच भयचकित स्थितीत तसेच पहात राहायचो!
‘माकडवाला’ आणि ‘डोंबारी’ !
नक्कीच आवडणारी आणि आनंद देणारी ती माणसे होती!
माकडवाल्याच्या बरोबर दोन माकड. – एक मोठं तर दुसरं ‘छोटं, ‘भागाबाईच्या’ लुगड्याची गोष्ट डमरू वाजवत, स्वतः भोवती माकडाला फिरवीत, तो गोल फेऱ्या मारत असे. भागाबाईवरचा राग व्यक्त करण्यासाठी कापड फेकून देणे, ते जमिनीवर आपटणे असे त्याचे खेळ आम्हाला इतके आकर्षित करून घेत असत कि ‘बस”! अगदी जवळून बघायला मिळत असे हा माकडवाला ‘मदारी’.
तसेच ‘डोंबारी’-
कुठून येतात हे डोंबारी‘? हा लहानपणी नेहमी पडणारा प्रश्न असे! त्यांच्या कोलांट्या उड्या, ‘उंच दोरीवरून, दोन हातात काठी धरून, आपला तोल राखत जाणारे तिचे तिचे व्यक्तिमत्व आम्हा पोरांना इतके भावत असे कि आमच्या खेळांमध्ये त्याचे प्रतिबिंब पडत असे. आम्हीसुद्धा आमचे डोंबारी झालो आणि गोलांट्या उद्या मारण्याचे प्रयत्न करू लागलो. जमिनीवर हात पसरून चालण्याची नक्कल ! त्यांच्या कडून, जीवनावर ‘उदार’ होऊन, आयुष्यात समतोल साधण्याची कला , त्यांचे, गुण, संयम आणि शिस्त मनात रुजली असेल का? पण खरं म्हणजे त्यांची ‘समतोलाची शिकवण आणि शहाणपण ‘मोठेवपणी समजली!
नागोबाचा गारुडी
त्याच बरोबर ‘नागपंचमीच्या’ दिवशी बंद टोपल्यांमधून ‘नागांना घेऊन येणार ‘गारुडी’, – ‘नाग’ वाला. ‘नागोबाला’ दूध द्या म्हणून कळकळीची विनंती करणारा. आमची आई नागाची पूजा करीत असताना मी मात्र तिच्या ‘पदराआडून’, पाहत पाहत धीट होऊन हळू हळूच पुढे सरकणारी आणि नागाच्या फड्यावर १० चा आकडा आहे का म्हणून विचारणा करणारी. आता संकल्पनाच बदललेल्या आहेत पण १० क्रमांकाचा आकडा दिसला कि आम्हाला काय आनंद व्हायचा. अश्यावेळी त्या गरीब बिचाऱ्या ‘नागवाल्याकडे आम्ही आश्चर्याने ‘बघताच बसत होतो मुळी.
‘संकासुर’ म्हणजे ‘शिमग्याचा ‘विदूषक.
सणासुदीला येणार, विशेषतः: बाल्यांबरोबर येणार राक्षस विदूषक म्हणजे ‘संकासुर’ आणि स्त्री वेष परिधान केलेला तो पुरुष. त्यांची जोडी म्हणजे कमालीचं हसू आणणार . ‘ध्यान”. काही क्षणांची करमणूक करणारी हि साधी सुधी ‘निस्वार्थी’ माणसं. शिमग्याची लोककला हि अजूनही ‘कोकणाने’ जपून ठेवली आहे.
भगवान विष्णूने ज्या असुराचा ‘वध’ केला तो असुर म्हणजे ‘संकासुर’, पण काही कथांमध्ये तो श्रीकृष्णाचा अवतार सुद्धा मानला जातो! त्यांचे पोशाख, डोक्यावरची टोपी, नृत्य प्रकार यांच्यामुळे संकासुर ‘वैविध्यपूर्ण झाला आहे. सणासुदीला येणार, विशेषतः: बाल्यांबरोबर येणार राक्षस विदूषक म्हणजे ‘संकासुर’ आणि स्त्री वेष परिधान केलेला तो पुरुष. त्यांची जोडी म्हणजे कमालीचं हसू आणणार . ‘ध्यान”. काही क्षणांची करमणूक करणारी हि साधी सुधी ‘निस्वार्थी’ माणसं.
चार मिनार सिगरेटची अनोखी जाहिरात
घराच्या गॅलरीत मी अशीच फेऱ्या मारत होते. दुसरीतली एक कविता पाठ करत होते. तेवढ्यात आमच्या दुसऱ्या मजल्या पर्यंत उंचच उंच, ताडमाड पस्तीस चाळीस फूट उंचीची चार माणस रस्त्यावर उभी राहून माझ्या गॅलरीच्या दिशेने येताना दिसली! गोष्टीतल्या राक्षसांप्रमाणे पण रंग रंगोटी केलेले, डोक्यावर टोप्या घालून रंगी बेरंगी चेहरे पाहून मला आश्चर्याचा धक्काच बसला.
मी भीतीयुक्त आश्चर्याने आणि औत्सुक्याने घरातल्या माणसांना हाक मारून बाहेर बोलावले! ती माणस अधिक जवळ आल्यानंतर खाली डोकावून पाहिल्यानंतर लक्ष्यात आले कि ‘चार मिनार’ सिगरेटची जाहिरात करणारी उंचच उंच काठ्यांवरून चालणारी सामान्य माणसेच आहेत ही. पण माझ्या मनाच्या कोपऱ्यात ती अद्भुत अशी चौकडी म्हणून अजूनही ‘ठाण’ मांडून बसली आहेत.
दे दान सुटे गिराण
दे दान सुटे गिराण म्हणत ‘ग्रहण’ सुटता सुटता, आठ- आठ, दहा – दहाच्या घोळक्याने, गटांनी, डोक्यावर आणि हातात भांडी आणि झोळ्या घेऊन स्त्री आणि पुरुष दोघेही आमच्या इमारती समोरच्या रस्त्यावरून अन्न दान’, ‘वस्त्र दान’ असे मोठ्याने ओरडत आले कि आम्हाला प्रश्न पडत असे, ही माणसे आहेत तरी कोण? ती वर्षभर करतात तरी काय , कुठे राहतात असे प्रश्न माझ्या कोवळ्या मनात उचंबळून येत असत.
पण माझी आई , अत्यंत साधी भोळी आणि दानशूर. आश्चर्य म्हणजे ‘त्यांना द्यायच्या कपड्यांची बोचकी तिच्याकडे आधीच तयार असायची. त्यातल्या त्यात त्यांच्या अधिक ‘गरीब’ कोण दिसतायत आणि वाटतायत ? आम्हा दोघी बहिणींना सूचना करून आई आम्हाला खाली पाठवायची- ‘कपड्यांचे दान’ द्यायला! जास्तीत जास्त लोकांना कपडे देण्यात आम्हाला केवढे समाधान वाटायचे! आम्ही रुबाबात असायचो, कि आता ‘गिराण’ सुटणार आणि सर्व काही सुखरूप होणार. आज पाहून वाईट वाटते ‘लोकांची’ अवस्था पाहून! आज ६० वर्षांच्या नंतर हे आठवले तरीही तोच अनुभव असतो.
वेड लागणे म्हणजे आणि ‘वेडा आणि वेडी’ म्हणजे काय ?
बालपणी वेडा आणि वेडी म्हणजे काय हे कळण्याच्या पलीकडे असते. पण त्याच्या प्रथम पाहिलेल्या आणि दिसलेल्या दोन घटनांची आठवण शहरे आणणारी आहे. आमच्या दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीतून प्रार्थना समाज ते फडके मंदिर पर्यंतचा रस्ता दिसत असे. एका सुंदर पर्मवेड्या तरुणीचे एका तरुणावर प्रेम बसले आणि काही महिने प्रेम प्रकरण चालू असताना त्या तरुणीने त्या तरुणाकडे लग्नाची मागणी घातली. त्या तरुणाचे लग्न करिन म्हणून दिलेले आश्वासन तिने गृहीत धरले. पण तो विवाहित आहे अशी कबुली त्याने देताच उध्वस्त झालेली ती तरुणी – युवती. वेडाच्या भरात तिने करून घेतलेले हाल पाहून आणि वेडातील हालचाली पाहून “प्रेम म्हणजे काय” असा प्रश्न मला पडला. तसेच एका दुसऱ्या तरुणाची कथा. हा तरुण फडके मंदिर पासून सुसाट धावत सुटे . मोठं मोठ्याने बडबड, ओरडत जाणाऱ्या तरुणाला वेड कशाने लागले हे कोडेच होते . पण जाणा येणारे लोक त्याची टवाळी उडवीत , वेडा – वेडा, वेडा वेडी, हे चिडवण्याने आमची माने हादरली, हलली आणि वाईट वाटणे म्हणजे काय याची जाण आली.
अश्या माझ्या ६ ते १० वय वर्षांतील या माणसांच्या, व्यक्तींच्या आठवणी मला काहीतरी ‘कानात’ सांगून जातात . या माणसांच्या स्मृतींनी माझ्या मनात सुख दुःखांच्या स्मृतींच्या लाटा निर्माण करतात . या ‘स्मृती चित्रांनी’ ‘ मला समृद्ध केले , संदेश दिले, आणि शिकवले.
— सौ. वासंती अनिल गोखले
Leave a Reply