नातं असंच टिकत नसते, त्यासाठी मनापासून निस्वार्थपणे जीव लावावा लागतो..!
‘नाती’ एक छोटासा शब्द. पण त्यात जगातला प्रत्येक माणूस सामावला जातो. आयुष्यात आल्यावर माणसाला प्रत्येक गोष्ट कळते अगदी माया, ममता, समता आणि बंधुता सुद्धा कळते. कोणत्याही नात्याच्या गाठी ह्या आधीपासूनच बांधलेल्या असतात. रक्ताने बांधला जाणारा कदाचित एखादाच असतो, पण मैत्री आणि प्रेम या दोन धाग्याने गुंफला जाणारा वर्ग मात्र मोठा असतो.
खरं सांगायचं तर प्रेमाच्या नात्यांची समीकरणच वेगळी असतात. वैचारिक, तार्किक, सामाजिक, व्यावहारिक नाही तर ‘भावनिक परिमाण’ लावूनच त्यांचा विचार केला पाहिजे… कारण एक तर व्यवहार हा प्रचंड रुक्ष असतो, नियमात बांधलेला असतो तर प्रेम ही भावना ह्या सगळ्याच्या पलीकडे असते… कोणतंही प्रेमाचं नातं तुमच्या बुद्धीचा नाही तर मनाचा प्रतिसाद असतो.
कोणत्याही नात्याची गाडी प्रेमाच्या मार्गाने धावते तोपर्यंत सगळं मनासारखं आनंदी आनंदी वाटतं. पण कधी कधी एक चाक स्टेशन वर अडकून पडतं आणि दुसऱ्याला तर पुढे जाण्याची घाई झालेली असते. अशावेळी थांबलेल्या गाडीचा अपघात होण्याची शक्यता असते. कोणतंही नातं जपण्यासाठी अत्यंत महत्वाचे म्हणजे एकमेकांवरचा विश्वास, संवाद आणि सॊबत वादही.. पण एका मर्यादेत..! नात्यात विश्वास हवा पण गृहीत धरणे नसावे. कारण आपण एकमेकांच्या आयुष्यात सहभागी झालो असलो तरी, प्रत्येकाला स्वतःचं आयुष्य स्वतःच्या पद्धतीने जगावं लागतंच.
‘नाती तेव्हा कधीच उत्तम बनत नाहीत जेव्हा योग्य माणसं एकत्र येतात. नाती तेव्हाच उत्तम बनतात जेव्हा भिन्न माणसं एकमेकांच्या वैविध्याचा आनंद घ्यायला शिकतात.’ वेगळी मतं, वेगळा दृष्टिकोन यामुळे होणाऱ्या वादात आपण कितीही चिडलो, रागावलो तरी ते आपल्या भल्यासाठी आहे याची जाणीव असते. त्यामुळे अविश्वास, संशय यांचा प्रश्नच येत नाही.
जीवनात विसंवादाचे अनेक प्रसंग येतात, मनंही दुखावली जातात पण नात्यातलं खरं प्रेम हे नेहमीच क्षमाशील राहतं, स्वतःच्या अहंकारापेक्षा ते नातं जपणं अधिक महत्वाचं मानतं. प्रत्येक नाते एकमेकांमध्ये कितीही मिसळून गेले तरी ते एकमेकांपासून स्वतंत्र असतेच, हे मान्य करून आपण नात्यात पझेसिव्हपणा न ठेवता, एकमेकांना हवी असणारी ‘स्पेस’ दिली पाहिजे. ‘फक्त शब्द म्हणजे संवाद नाही तर शब्दांच्या पलीकडेही असलेल्या मौनाच्या संवेदनशील संवादासाठी देखील मनाची दारं नेहमी खुली ठेवता आली पाहिजेत.’
कधी शाब्दिक तर कधी आत्मिक संवादाची एक हळुवार प्रोसेस ही कुठल्याही नात्याला आकार देत असते. नात्यात प्रत्येकवेळी नव्याने पदर उलगडताना काळजी घेतली पाहिजे, आपल्यापेक्षा आपल्या सोबत असणाऱ्या व्यक्तीला आपल्या बरोबर घेतलं पाहिजे. म्हणजे ही गाडी सुसाट धावली म्हणून समजा..!!
जी नाती मनाने जोडली जातात ती कधीच तुटत नाहीत मग ते प्रेम असो की मैत्री… कोणत्याही नात्याच्या रेशीमगाठी घट्ट करण्यासाठी आभाळाचंच मन लागतं, जे फक्त तुमच्यावर निस्वार्थपणे प्रेम करणाऱ्या माणसांकडेच असतं……..
Leave a Reply