धावतच गोपीका यशोदेच्या घरात शिरल्या. सर्वांनी एक सुरात कृष्णाच्या लिलांचे वर्णन सुरू केले. कृष्णाने कसे वस्त्र चोरले, कृष्णाने कशी मटकी फोडली, कृष्णाने कसे दही-लोणी चोरून नेले. एक ना अनेक तक्रारी ऐकल्यानंतर यशोदेनेही रागातच कृष्णाचा हात धरून ओढत नेले आणि घरातल्या एका खांबाला दोरीने बांधून ठेवले. ज्याने जन्मल्याबरोबर कंसाच्या कारागृहातील साखळदंड तोडले, तोच कृष्ण यशोदेने बांधलेल्या दोरीच्या बंधनात अडकला. आईने बांधलेलं हे बंधन कृष्ण तोडु शकला नाही. अर्थात कृष्ण नंतर राधेच्या निर्व्याज प्रेमाच्या बंधनातही अडकलाच होता म्हणा. बंधनं ही अशीच असतात दिसत नसली तरी ती मजबुत असतात आणि माणसाला बांधुन ठेवतात. दिसणारी बंधनं सहजी तोडता येऊ शकत असतीलही पण न दिसणारी बंधनं कशी तोडणार. अशी कितीतरी अदृश्य बंधनं आपल्या अवती-भोवती तयार झालेली असतात ती तोडु म्हणताही आपल्याला तोडता येत नाहीत. कडक लाकुड पोखरुन काढणारा भुंगा कमलदलाच्या पाकळ्यांच्या बंधनात स्वत:ला कोंडुन घेतो. काही बंधनं अशीच असतात, जी आपल्याला तोडवत नाहीतच मुळी.
लहान मुलांच्या पायात आई करदोड्याचं बंधन घालते, तिची समजुत असते की माझ्या मुलांना करदोड्यामुळे कोणाची नजर लागणार नाही, त्याचे काही वाईट होणार नाही. दोन रुपयाला मिळणाऱ्या करदोड्याला आईच्या प्रेमाचं बळ मिळतं, मुलांनाही आईच्या प्रेमाचं हे बंधन हवहवस वाटू लागतं. रक्षाबंधनाला बहिण भावाच्या हातावर राखी बांधते. भाऊ देखील मायेनं बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारतो, रक्षाबंधनाचे कर्तव्य पार पाडतो. एक मित्र दुसऱ्या मित्राच्या मदतीला उभा राहतो, मित्रत्वाचे हे बंधन कायम राहते, नात्यांचे बंधन कायम राहते, शेवटपर्यंत. लग्नात अग्निला साक्षी मानुन पती-पत्नी एकमेकांना स्वीकारतात. आयुष्यभर एकत्र राहतात, एकमेकांची सुखदु:खे स्वीकारता, जगतात. त्यांना आयुष्यभर कोणतं बंधन बांधुन ठेवतं…! कोण बांधतं ते.
बंधनाची व्याख्या अधिक व्यापक आणि विस्तृत संजीवनी भाटकर यांनी त्यांच्या कवितेतून केलीय. भाटकर यांची कविता अशी :
प्रेमास प्रेम द्यावे, तुटतील ना कधीही
हे बंध रेशमाचे
जात-धर्म-नाते न तुटतील कधीही
रक्तास रक्त देऊनी
बांधुनी बंध रेशमाचे
शरीराहुनी निराळी रक्तास ओढ झाली
जलाहुनी निराळी पवित्र भावनेचे
न तुटतील कधीही हे बंध रेशमाचे
ठेऊ जपून जीवा, धागा अतूट हाच
रेशम जपून ठेव, हे बंध रेशमाचे
– दिनेश दीक्षित
Leave a Reply