नवीन लेखन...

बांधणी भाषेची आणि दडलेले अंतरंग

मराठी भाषा,भाषेचे उच्चार, लहेजा, त्यामधून डोकावणारं आणि ऐकणाऱ्याला जाणवणारं वेगळेपण, भाषेचे वळसे, वेलांट्या, वळणं आणि त्यामधून बाहेर येणारं पोटातलं या सगळ्याची एक गंमत असते नाही ?
घाबरून जाऊ नका ! मी काही मराठी भाषा आणि तिच्यावर साधक बाधक चर्चा यामध्ये अजिबात शिरणार नाहीय.
आता हेच पहा ना,
“काय ग, लुकतुक्यांची सुमी….. यावर्षी दहावीच्या परीक्षेला बसली होती ना…?????”
आता ही नुसती चौकशी असते का ?? प्रश्नाकडे वरवर पाहता असच जाणवेल, पण अंतरंगात काय लपलेलं असतं?? तर,
“झाली का पास”??
“सुमी पास झाली असेल…च तर बाई… देवच पावला.” किंवा
“ती मठ्ठ कसली पास होतेय?”
असे अनेक अर्थ, प्रश्र्नांशी मिळत्या जुळत्या उत्तराची वाट पहात वळवळत असतात.
एखाद्या व्यक्तीबद्दल काहीतरी उडत उडत कानावर आलेलं असतं. कळल्याशिवाय राहावत नसतं, मग
“अरे आपल्या सोसायटीमधले काकडे भेटले होते का हल्ली ?” काकडे म्हणजे अगदी सज्जन माणूस, इकडचं तिकडे करणं त्याच्या रक्तातच नाही. काय म्हणतात ? तुझे शेजारी ना, म्हणून विचारलं. बरे आहेत ना ?”
प्रश्न विचारल्यावर मुखावरती भरभरून उभी राहिलेली आतुरता.
आता प्रश्न ज्याला विचारलेला असतो, त्याला खरंच काहीच माहिती नसतं म्हणा किंवा त्या बातमीतच काही तथ्य नसतं म्हणा, म्हणून तो म्हणतो,
“हो रे, परवा सरवणकर भेटले होते, ते ही अगदी हेच म्हणत होते……
‘म्हणजे सरवणकराला सुद्धा बातमी लागली होती तर ? नुसत्या चौकश्या करत राहायचं हेच यांचं काम ‘ (प्रश्नकर्त्याच्या मनातलं)
……नाही पण खरंच, फार चांगला माणूस काकडे. ती पूर्ण फॅमिलीच well mannered. कधी घरी गेल्यावर वहिनी चहा घेतल्याशिवाय जाऊ देणारच नाहीत.”
विचारणाऱ्या व्यक्तींची फारच निराशा झालेली असते. त्याला काकड्याच्या कौतुकात अजिबात रस नसतो.
आता एखाद्या घरातली भाषेची वळणं पहा,
बायकोची, सतत पिरपिर करून पिडणारी आणि पिडुस वच्छी आत्या यायची असते राहायला. बायकोला विषय कसा काढावा कळत नसतं.
“अहो, मी काय म्हणत होते, आपली वच्छी आत्या आता खूपच बदललीय बरं! ”
नवरा ऑफिसला जाण्याच्या गडबडीत असतो, त्यामुळे नको तो विषय समोर आल्यामुळे वैतागतो,
“वच्छी आत्याचं काय अचानक ? डोक्यात जाते ती म्हातारी माझ्या.”
“तू सकाळी सकाळी का तिचा विषय काढतेयस?”
आपण नवरे बिचारे सरळमार्गी, आपल्याला काय कळतोय विषायमागचा हेतू ?
आपल्या आत्याला इतकं घालून पाडून बोलल्यावरही, बायकोचा स्वर, चेहऱ्यावरचा शांतपणा भाषेची नजाकत आणि अतूट संयम जराही कमी होत नाही.
“अहो, तसं नाही, आजकाल निवांत पडून असते आपली, कुण्णाच्या अध्यात मध्यात पडत नाही.”
नवरा – “, बरं झालं, घरातले जरा निवांत जगतील, चल मी निघतो”
बायको हसून, “कालच तिचा फोन आला होता, म्हणाली काय म्हणतात जावईबापू ? तस्सेच आहेत की बदललेयत जरा ?”
नवरा – “बघ तिचा प्रश्न बघ, आणि तू म्हणतेयस म्हातारी बदललीय.”
“म्हणजे, तुमची अगदी मायेने खुशाली घेत असते हो. मी म्हटलं तिला, लांबून काय चौकशी करतेयस जावयाची, त्यापेक्षा ये ना चार दिवस राहायला.”
आणि अचानक या शेवटच्या वाक्यातून नवऱ्याला आतापर्यंत चाललेल्या कुशल शब्दबांधणीचा उलगडा होतो.
म्हणजे न आवडणारी गोष्ट धाडकन सांगितली की शब्दाशब्दी, वाद होणार की नाही ? त्याऐवजी नेमकी शब्दबांधणी करत, आपल्या मनातलं तडीस न्यायचं, हे वाक् चातु्र्य स्त्रियांशीवाय कुणाकडे असू शकतं सांगा ?
एखादा लेख बातमी यामध्ये, त्यातल्या संदर्भांमध्ये ठामपणा नसेल तर कसं लिहिलं जातं ?
उद्या शहरामध्ये वादळी पावसाची शक्यता ???
म्हणजे पोकळ विधान म्हणून घ्या, प्रश्न म्हणून घ्या अथवा शंका म्हणून.
अमुक गोष्ट अशी घडल्याचं कानी आलं……
एका सुप्रसिद्ध अभिनेत्याने आपल्या पत्नीसोबत घटस्फोट घेतला आणि तो दुसऱ्या बंधनात अडकला… ???….. अशी बातमी कानावर आली.
मराठी भाषेची गळचेपी होतेय का ????
म्हणजे सगळं आपल्यावर टाकायचं, कारण स्वतःचा अभ्यास, गृहपाठ नसतो, मग, भाषा वळवावी तशी वळते या विधानाला अनुसरून, प्रश्न निर्माण करायचे आणि आपण नामानिराळं व्हायचं.
हल्ली समाजमाध्यामावर एक नविन फॅड आलंय, एखादी प्रसिद्ध अभिनेत्री, अभिनेता, इतर क्षेत्रातील कुणी लोकप्रिय व्यक्ती यांचा फोटो आणि त्याखाली एखादं वाचकांची उत्सुकता वाढवणारं अर्धवट वाक्य. फोटोही त्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात शंका उत्पन्न होईल असे दिलेले असतात. आत गेल्यावर बातमीमध्ये काहीही तथ्य नसल्याचं कळतं. किंवा दोन अभिनेत्रींचे मुखावर मादक भाव असलेले फोटो, आणि त्यावर ओळ,
“या दोघी काही काळ एकत्र…………
अनेक वाचकांचे डोळे चमकतात आणि शिरतात बापडे आत. एकत्र… पुढे वाक्य जोडलेलं असतं,
“गुण्यागोविंदाने रहात होत्या.”. पुढे….. यामध्ये वाचकांना काहीच रस नसतो.
अहो, हे कशाला, अनेकदा बायको सहज म्हणते,
“तुमचा चॉईस ना मला फार आवडतो. जे विकत घेता ते अगदी युनिक असतं. कसं हो सुचतं तुम्हाला ?”
आपण काय पाघळतो लगेच.
“अगं तू पण काय, जरा अतीच कौतुक करतेस…”
परिस्थिती आपल्या हातात येऊ लागलीय हे तिला लगेच कळतं,
“अहो नाही, परवाच ना बंडूला( बायकोचा हुश्शार भाऊ) भेट देण्यासाठी…..
माझा? प्रश्नार्थक चेहरा पाहून…
“अहो, तो पुढच्या महिन्यात U.K. ला चाललाय ना…..
?(माझ्या चेहऱ्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून)
म्हणून दुकानात काही वस्तू पहात होती, पण अहो काही सुचेचना. शेवटी म्हटलं तुम्हालाच घेऊन यावं सोबत, म्हणजे काही बेस्ट चॉईसचं gift घेतलं जाईल, आणि तुम्हीच म्हणता ना, cash कशाला ठेवायची ? कार्ड ने करायचं payment. म्हटलं, योग्यच बोलता तुम्ही. आणि ऐका ना, मला ना वहिनीला सुद्धा घ्यायचंय काही साडी वगैरे. आजच जाऊया का ??”
कार्ड ने payment करावं वगैरे आपण कधी म्हटलं होतं याचा बिचारा नवरा विचार करत असतानाच, आपण शब्दांच्या चक्रव्युहात पूर्णपणे अडकल्याचं त्याच्या लक्षात येतं. म्हणजे समर्पक भाषा, तिचा नेमका उपयोग, मुद्देसूद शब्दबांधणी आणि या सगळ्यामधून केलेला अचूक लक्ष्यवेध, तो ही अगदी सहज साळसूदपणे.
भाषेचा आपल्याला हवा तसा उपयोग करण्यात राजकारण्यांचा हात तर कुणीच धरू शकणार नाही. मुखातून सगळ्यांसमक्ष निघालेले शब्द व्यवस्थितपणे फिरवून अगदी निर्विकारपणे आपल्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावला जातोय, असा कांगावा करत आपणच केलेल्या विधनापासून नामानिराळं व्हायचं यासाठी फार मोठी तपश्चर्या आणि कोडगेपण असावं लागतं.
अनेकदा ओठावर एक आणि पोटात दुसरं अशी स्थिती असते, म्हणजे हा संवाद बघा,
“परवा वंदूच्या सासूचा साठी सोहळा छान झाला नाही ??”
“सगळं अगदी गोऽऽऽऽड, मस्त, मज्जेत पार पडलं. प्रत्येक जण इतकं भरभरून बोलत होतं नाही का ग???”
“वंदूची सासू सुध्दा आहेच तशी !”
या सगळ्यातला गर्भितार्थ काय सांगा बरं ?
तर, “गोड बोलण्याची आणि कौतुक करण्याची स्पर्धाच लागली होती अगदी. वंदूच्या सासूची ऐकूनच sugar वाढली असेल. कित्ती ती अतिशयोक्ती करायची ? आणि ती सुद्धा वंदूच्या सासूची, देवा कसं इतकं खोटं बोलवतं कोण जाणे.”
हा गर्भितार्थ चेहऱ्यावरअसतो आणि शब्द मात्र वेगळी बांधणी करत असतात.

प्रासादिक म्हणे
प्रसाद कुळकर्णी
९७६९०८९४१२

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..